Skip to main content
x

नेने, गजानन हरी

राजा नेने

     राजा नेने हे प्रभात चित्रपट कंपनीच्या मालकांपैकी दामले यांचे भाचे असल्याने लहानपणापासूनच चित्रपटक्षेत्राशी त्यांचा संबंध आला. त्यामुळे शांतारामबापूंच्या हाताखाली त्यांनी दिग्दर्शनाचे व संकलनाचे धडे गिरविले. दामले-फत्तेलाल हे ‘संत तुकाराम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते; परंतु त्या चित्रपटातील काही महत्त्वाच्या प्रसंगांच्या दिग्दर्शनात राजा नेने यांचे योगदान होते. यानंतर आलेल्या ‘संत ज्ञानेश्वर’ व ‘गोपालकृष्ण’ या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शनात राजा नेने यांनी दामले-फत्तेलाल या जोडीला साहाय्य केले.

      प्रभातच्या पहिल्या सामाजिक चित्रपटात - अर्थात ‘कुंकू’मध्ये - राजा नेने यांनी केशवराव दाते यांच्या वाह्यात मुलाची भूमिका साकारली होती. ‘संत सखू’ या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून दामले-फत्तेलाल यांच्याबरोबर राजा नेने यांचेही नाव होते. यानंतर प्रभातचा ‘दहा वाजता’ हा चित्रपट राजा नेने यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. या चित्रपटात भावगीतांचा वापर प्रथमच केला गेला. या वेळी राजा नेने यांचा ‘प्रति शांताराम’ असा उल्लेख होत असे. नंतर प्रभातने ‘रामशास्त्री’ हा चित्रपट सुरू करून नेने यांच्याकडे दिग्दर्शनाची सूत्रे दिली. परंतु चित्रपटाचा सुरुवातीचा काही भाग चित्रित करून त्यांनी चित्रपट व प्रभात कंपनी दोन्ही सोडले. पुढे गजानन जागीरदार, विश्राम बेडेकर व शेख फत्तेलाल यांनी मिळून हा चित्रपट पूर्ण केला.

     मुंबईच्या रमणिकलाल यांनी राजा नेने यांना व त्यांच्या साथीदारांना मुंबईला बोलावून त्यांच्याकडे ‘तारामती’ या चित्रपटाची सूत्रे सोपवली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बच्चों का खेल’ व ‘फिर भी अपना है’ हे दोन चित्रपट केले. पुढे नेने यांनी स्वत:ची चित्रसंस्था काढून त्याद्वारे ‘शादी से पहले’, ‘संत रामदास’, ‘केतकीच्या बनात’, ‘पठ्ठे बापूराव’ यांसारखे चित्रपट काढले. नंतर आपली चित्रसंस्था बंद करून राजा नेने फक्त अभिनय करीत राहिले. १९६७ मध्ये सदाशिवराव कवींनी त्यांना ‘तुका झालासे कळस’ हा चित्रपट करायला दिला. चित्रपट उत्तम होऊनही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राजा नेने चित्रपटसृष्टीपासून हळूहळू दूर गेले.

      - द.भा. सामंत

नेने, गजानन हरी