Skip to main content
x

निरंतर, गंगाधर भाऊराव

         गंगाधर भाऊराव निरंतर यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. वडिलांच्या गरिबीमुळे गंगाधर व त्यांचे मोठे बंधू या दोघांचे शिक्षण पुण्यात वार लावून झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही दिवस ‘ज्ञानप्रकाश’ ह्या वृत्तपत्रात नोकरी केली. त्यांनी सेवासदनमध्ये पुष्कळ वर्षे काढली, शिकवण्या केल्या व नंतर गांधी ट्रेनिंग कॉलेजमध्ये अध्यापन केले. ‘विवेकानंदांचा सामर्थ्यवान संदेश’, ‘हिंदू धर्मावरील कलंक’, ‘स्वराज्य शिष्टाई’, ‘रशियाचे गांधी’ अशी काही स्वतंत्र, काही रूपांतरित, काही भाषांतरित पुस्तके लिहून त्यांनी एक-एक परीक्षा दिली. ‘त्या-त्या पुस्तकांनी नाव मिळवायचे नव्हते, फक्त पैसे मिळवायचे होते, ते माझ्या अडचणीच्या कुवतीप्रमाणे मिळाले’ असे त्यांनी नमूद केले आहे.

‘अंधारातील दिवे’ (१९३७) ही एक मास्तर व त्याची तरुण मुले यांची ओळख करून देणारी एक वेगळी कादंबरी वगळल्यास, निरंतरांच्या बाकीच्या ‘सौ.मालती’ (१९३४), ‘जीवन मृत्यू’ (१९३७), ‘अर्धांगी’ (१९४०) व ‘भूकंप’(१९४७) या कादंबर्‍या प्राधान्याने वैवाहिक जीवनात उत्पन्न होणारे प्रश्न व त्यांचे स्वरूप यांच्याशी संबद्ध आहे. अरुण व उषा यांच्या सहवासोत्तर विवाहानंतर अरुणच्या मनात अन्य विवाहित स्त्री (सुमित्राबद्दल) उत्पन्न झालेला मोह म्हणजेच ‘भूकंप’ ही कादंबरी होय. त्यांच्या काही कादंबर्‍यांतून स्त्री-पुरुष संबंधाविषयी जी पारंपरिक नैतिक मूल्ये आहेत त्याविषयी प्रतिकूल स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त झालेली दिसते.

‘मनमोकळेपणाचे वेड, वेडापेक्षाही भयंकर आहे’ असा ठसठशीत इशारा देणार्‍या निरंतरांच्या ‘साखरझोप’ या संग्रहात रसिकांसमोर आपले मन मोकळे करणार्‍या लघुनिबंधांची संख्या बरीच कमी आहे. सभोवारच्या नित्याच्या व्यवहाराकडे पाहून या लेखकाने मार्मिक विचारमंथन करताना विविध साहित्य-सर्जनही केले आहे. ‘अ‍ॅक्चुअरी ग.स.मराठे’ चरित्र, ‘टॉलस्टॉय’ (रशियाचे गांधी), ‘इब्सेन’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. प्राचीन काळातील तसेच १८१८ ते १८७४ या अर्वाचीन कालखंडातील मराठी वाङ्मयाचे स्थूल, रूपरेषात्मक दर्शन त्यांनी ‘मराठी वाङ्मयाचा परामर्श’ (१९४९) ह्या ग्रंथामध्ये घडविले आहे. निरंतरांनी ‘ग्रंथांच्या सहवासात’ (१९४५), ‘अपुरा डाव’ ही पुस्तक परीक्षणे केली. ‘गांधी आणि गांधीवाद’ हे बी.पट्टाभिसितारामय्या यांच्या पुस्तकाचे सारांशात्मक अनुवादरूप आहे. ‘नागरिकशास्त्र’ (भाग १ ते ७), ‘नाट्यरूप पेशवाई’, ‘रामायण व महाभारत यांच्या गोष्टी’ (भाग १ व २) ही मुलांसाठी पुस्तकेही त्यांनी लिहिली.

- वि. ग. जोशी

निरंतर, गंगाधर भाऊराव