Skip to main content
x

नजीर, खाँ

जीर खाँसाहेबांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जवळील बिजनौर या गावी झाला. त्यांचे वडील उ. दिलावर हुसेन खाँ यांच्याकडे त्यांचे संगीताचे  लहान वयातच शिक्षण सुरू झाले. वडिलांनी या कुशाग्र मुलाला सर्व विद्या देऊन गायकीत निष्णात केले. त्यानंतर गायकी समृद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांनी उ. इनायत हुसेन खाँसाहेब यांच्याकडे गायनाचे धडे घेतले. जयपूरनिवासी डागर घराण्यातील धृपद-धमार गायक डागर घराण्याचे संस्थापक उ. बहराम खाँ यांचे नातू उ. इनायत खाँ यांच्याकडे त्यांनी धृपद गायकीचेही शिक्षण घेतले.

इनायत खाँ हे गायनाव्यतिरिक्त विविध हिंदू शास्त्रांचे विद्वान जाणकार असल्याने त्यांना ‘षट्शास्त्री’ ही उपाधी  मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उ.नजीर खाँनी संगीताचे शास्त्र, हिंदू तत्त्वज्ञान, व्रजभाषा, भारतीय संस्कृती इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास केला.

आपल्या दोन्ही भावांसह नजीर खाँ १८७० साली मुंबईला आले. नजीर खाँ यांचे चौथे बंधू विलायत हुसेन मुंबईत स्थायिक होते व त्यांचा मोठा व्यापार होता. या विलायत हुसेन यांचे घर मुंबईतील भेंडीबाजार या भागात होते. त्या वेळी भेंडीबाजार येथे उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. मोठमोठे व्यापारी, तसेच श्रीमंत लोकांची वस्ती या भागात होती.

नजीर खाँ व त्यांचे दोन बंधू उ. छज्जू खाँ व उ. खादिम हुसेन खाँ यांनी वेगवेगळ्या गुरूंकडून गायनविद्या आत्मसात करून त्यावर चिंतन-मनन करून या विविध गायकींतील सौंदर्यपूर्ण स्थळांचा आपल्या गायकीत समावेश करून आपली स्वतंत्र शैली विकसित केली. या तीनही बंधूंची ही गायनशैली अत्यंत लोकप्रिय होऊन ही गायकी ‘भेंडीबाजार’ घराण्याची गायकी म्हणून प्रसिद्ध झाली.

नजीर खाँसाहेबांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे भरदार आवाज, आवाजातील गुंजन, प्रदीर्घ दमसास, बीनवादनाच्या अंगाने मींडयुक्त आलापी, खंडमेर पद्धतीने वैविध्यपूर्ण बढत, रागाचा विस्तार, ढंगदार सरगम, गमकाचा प्रभावी प्रयोग, तसेच बलपेचाची हुंकारयुक्त तान, तसेच शब्द-स्वर-लय यांचा अनोखा मिलाफ असलेल्या बंदिशी ही त्यांची खासियत होती.

रागाच्या स्वरूपाप्रमाणे रागाचे चलन सांभाळून खंडमेराचा सौंदर्यपूर्ण वापर करणे हे प्रतिभेचे काम आहे. नजीर खाँसाहेबांचे खंडमेर पद्धतीच्या स्वरविस्तारावर कमालीचे प्रभुत्व होते.

गायनाव्यतिरिक्त नजीर खाँसाहेबांना संगीत शास्त्राचीही आवड होती. त्या काळी पारसी समाजाच्या लोकांनी ‘पारसी गायनोत्तेजक मंडळी’ या नावाने एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेत काही लोकांना शिकविण्यासाठी नजीर खाँसाहेब जात असत. 

पं. भातखंडे हे त्या संस्थेचे सभासद होते. ते तेव्हा देशभरातील वेगवेगळ्या गायक कलाकारांकडून विविध राग आणि बंदिशी मिळवून त्यांचा संग्रह करण्याचे कार्य करीत होते. भातखंडे संगीतशास्त्रावर ग्रंथ लिहिण्याची तयारी करत होते. या विषयावर ते पारसी गायनोत्तेजक मंडळीमध्ये व्याख्यानेही देत असत. या व्याख्यानांना नजीर खाँसाहेब उपस्थित राहत असत आणि भातखंडे यांच्याशी शास्त्रावर चर्चाही करत असत. या दोघांमध्ये विचारांची देवाण-घेवाण चालत असे. यातूनच नजीर खाँसाहेब व भातखंडे यांच्यात मैत्रीचे नाते दृढ होत गेले.

भातखंडे यांनी विविध रागांची लक्षणगीते रचली होती. या लक्षणगीतांच्या प्रचारासाठीही नजीर खाँनी प्रयत्न केले. संगीतशास्त्राविषयी कलाकारांमध्ये रुची निर्माण केली. नजीर खाँसाहेबांनी संग्रहातील खास रागांची माहिती, तसेच अनेक बंदिशी पं. भातखंडे यांना दिल्या. इतर कलाकारांना संगीतशास्त्राचे महत्त्व समजावून देऊन पं. भातखंडे यांच्या कार्यासाठी त्यांच्याजवळील राग व बंदिशी देण्यास उद्युक्त केले.

उ.नजीर खाँ स्वत:ची गायनशैली निर्माण करणारे, संगीतशास्त्राविषयी आवड असणारे, त्या काळीसुद्धा नाविन्याचा स्वीकार करणारे असे प्रतिभावान आणि पुरोगामी गायक कलाकार होते हे त्यांचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. शाहमीर खाँ (उ. अमीर खाँचे वडील), चांद खाँ, झंडे खाँ (संगीत दिग्दर्शक), कादरबक्ष, वाडिलाल शिवराम असे अनेक गायक ‘भेंडीबाजार गायकी’ शिकण्यासाठी या तीन बंधूंकडे येत.

उ.नजीर खाँसाहेबांचे चिरंजीव मुबारक अली यांनी आपल्या वडिलांकडे तालीम घेऊन घराण्याची गायकी आत्मसात केली होती. ते तयारीने गात असत. परंतु प्लेगच्या साथीत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

उ.नजीर खाँसाहेबांचे घराण्याच्या गायकीच्या प्रसारातील मुख्य योगदान म्हणजे त्यांची पट्टशिष्या, गानतपस्विनी अंजनीबाई मालपेकर ही गायिका होय. त्यांनी अंजनीबाईंना वयाच्या आठव्या वर्षापासून सलग आठ वर्षे १०-१२ तासांची तालीम दिली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी अंजनीबाई एका महान गायिकेच्या स्वरूपात रसिकांसमोर आल्या.

एखाद्या ॠषीप्रमाणे उ.नजीर खाँसाहेबांनी गायनकलेचे अध्यापन करून विद्यादानाचे कार्य अखेरपर्यंत व्रतस्थपणे केले. त्यांचे मुंबईत निधन झाले.

शरद करमरकर

नजीर, खाँ