Skip to main content
x

नरवडे, विठ्ठल सखाराम

           विठ्ठल सखाराम नरवडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साविंदे येथील शेतकरी कुटुंबात झाला.  त्यांना लहानपणापासून जनावरांची देखभाल करण्याची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण साविंदे लोणी आणि कवठे या खेडेगावांतच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण घोडनदी (शिरूर) येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते बी.एस्सी.(कृषी) पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर कृषी महाविद्यालयाच्या पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून रुजू झाले. त्यांनी १९६० ते १९७२ या काळात पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र विषयाचे अध्यापन केले. याच दरम्यान त्यांनी दुग्धशास्त्र विषयात  एम.एस्सी. (कृषी) पदवी घेतली.

          नरवडे यांची १९७२ मध्ये म.फु.कृ.वि.च्या मध्यवर्ती परिसरात पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून बदली झाली. ते या विभागातील पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांची १९७३मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित गो-संशोधन प्रकल्पावर नेमणूक झाली. नवी दिल्ली येथील सदर प्रकल्प भा.कृ.अ.प. यांच्या अनुदान आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाला.

          भारतातील ६ राज्यांत समन्वित गो-संशोधन प्रकल्प सुरू केले होते. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात म.फु.कृ.वि.साठी एक प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पात देशी गाय म्हणून गीर या जातीचा वरील संशोधनासाठी व पैदाशीसाठी उपयोग केला गेला. या प्रकल्पासाठी भा.कृ.अ.प.ने गो-संशोधनाने दूध उत्पादनात भरीव वाढ घडवून आणण्यासाठी गीर जातीच्या गाईसाठी विदेशी (होल्स्टिअन, फ्रिजिअन, जर्सी आणि ब्राऊन स्विस) जातीच्या वळूंचे गोठवलेले वीर्य वापरून गाईची नवीन संकरित जात निर्माण करावी असे लक्ष्य होते. अशा नवीन संकरित प्रत्येक गाईचे एका विताचे सरासरी दूध उत्पादन किमान २००० किलो व त्या गाईंच्या कळपांच्या दुधाची सरासरी ३२०० किलो असावी, दुधात घृतांश ३.५%, घृतांशविरहित घन पदार्थाचे प्रमाण ८.५% असे लक्ष्य ठरवण्यात आले. या संकरित गाई स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या असाव्यात व गाईची दूध उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता आणि रोग प्रतिकारक क्षमता उत्तम असावी अशी उद्दिष्टे निश्‍चित केली होती.

          नरवडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने व शास्त्रीय पद्धतीने अथक प्रयत्न करून सर्व उद्दिष्टे पूर्ण केली. या प्रकल्पातील व्यवस्थापनाची, हिरव्या वैरण उत्पादनाची, जनावराच्या देखभालीच्या सर्व निरीक्षणात्मक नोंदी करून निष्कर्षानुसार आदर्श कार्यप्रणाली त्यांनी प्रस्थापित केली. पुढे जेव्हा हाच प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या मदतीने पुढे चालू ठेवण्यात आला, तेव्हा पुढील संशोधनातून प्रथमच कृषी विद्यापीठाने ‘फुले त्रिवेणी’ जातीची नवीन गाय विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली हे नरवडे यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. राहुरी येथील प्रकल्पासारखे यश इतर राज्यांतील प्रकल्पात मिळू शकले नाही. प्रा.नरवडे यांचे संकरित गाईंना लागणारे व्यवस्थापन उत्कृष्ट असल्यामुळे संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण करून गाईमधील एक उन्नत वाण निर्माण होऊ शकला. त्यांची यासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रशंसा करण्यात आली.

- प्रा. मुकुंद श्रीकृष्ण देशपांडे

नरवडे, विठ्ठल सखाराम