Skip to main content
x

नवले, विदुरा विठोबा

विदुरा विठोबा नवले यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ताथवडे या गावी झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथेच झाले. त्यांनी बी.कॉम.ची पदवी प्राप्त केली. त्यांनी मामासाहेब मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक कार्याला सुरुवात केली.

नवले यांनी 1967 ते 1980 या काळात जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांनी 1968 ते 1978 अशा दहा वर्षे मुळशी पंचायत समितीचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी 1979 ते 1980 या काळात पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. ते 1980 ते 1985 या काळात मुळशी हवेली मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत कार्यरत  होते. त्यांनी 1979 ते 1984 या काळात इंटक या युनियनचे अध्यक्षपद सांभाळले. त्यांची 1984 ते 1991 या काळात पुणे जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 1984 मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष झाले.

नवले यांनी 1988 मध्ये हिंजवडी येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच त्यांनी सदर साखर कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले होते.

नवले यांना राष्ट्रकार्यातील योगदान व वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल 2001 मध्ये ‘ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्सिल, दिल्ली’तर्फे ‘राष्ट्रीय रत्न’ पुरस्कार मिळाला.

- संपादित

नवले, विदुरा विठोबा