Skip to main content
x

पाध्ये, वामन हनुमंत

कोल्हापुरातील अंबाबाईच्या  सुप्रसिद्ध मंदिरात रोज प्रात:समयी उ. अल्लादिया खाँसाहेबांचे गायन होत असे. छोट्या वामनला लहानपणापासून संगीताची गोडी होती. खाँसाहेबांच्या संगीताच्या श्रवणाने त्यांना गाण्याची समज आली.

पुढे पं. विष्णू दिगंबरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयात गेले. तिथल्या शिस्तीप्रमाणे नऊ वर्षे वामनराव गाणे शिकले. ‘संगीत प्रवीण’ ही पदवी त्यांना प्राप्त झाली. मग कोल्हापूरला गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून ते संगीताचे शिक्षण देऊ लागले. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक सुधीर फडके होते.

क्लिष्ट लयकारी करणे हा वामनरावांचा हातखंडा असलेला भाग. त्यांच्या ‘अनाघाती’ (ऑफ बीट) गायकीमुळे ते भारतात विख्यात झाले. सिंध प्रांतातील हैद्राबादच्या ‘हंडा’ या संगीतोत्सवात  पं. विनायकराव पटवर्धन व पं. नारायणराव व्यास यांच्याबरोबर गाऊन त्यांनी सभेला चकित केले. त्यानंतर या तिघांचे मिळून ‘तिगलबंदी’ कार्यक्रम हे आकर्षण ठरले.

वामनराव सिंध प्रांतातील अतिशय लोकप्रिय गायक झाले. गुरुबंधू बाबूराव गोखले यांच्या मुंबईतील ‘महाराष्ट्र संगीत विद्यालया’त ते प्रतिवर्षी हजेरी लावत. पुढे बनारस हिंदू विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे चिरंजीव शशिकांत यांना त्यांनी गायनाची दीक्षा दिली. त्यांनीही संगीत क्षेत्रात कार्य केले. अवघ्या ६० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी गायक म्हणून कारकीर्द गाजवली.

         - डॉ. सुधा पटवर्धन

पाध्ये, वामन हनुमंत