Skip to main content
x

पानसे, रमेश गजानन

र्थशास्त्राचे प्राध्यापक, भूकंप पुनर्वसनाचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार, बालशिक्षण संशोधन व विकास केंद्राचे संचालक, ग्राममंगल या आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षण संस्थेचे संचालक आणि विश्‍वस्त, ‘ऋचाया कवितांच्या मासिकाचे संपादक, गांधी फिल्म फाऊंडेशनचे विश्‍वस्थ, एस.एन.डी.टी. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख अशी विविध कामे सहजी अंगावर घेणारे आणि तितक्याच समर्थपणे पेलणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजेच प्रा. रमेश पानसे.

शिरवळ येथे रमेश गजानन पानसे यांचा जन्म झाला. आई श्रीमती सुशीला पानसे व वडील गजानन पानसे हे होत. सासवड जवळील सोनोरीहे त्यांचे गाव आहे. ठाणे येथील दगडी शाळा (म्युनिसीपालटी शाळा नं. २), मो. ह. विद्यालय येथे शालेय शिक्षण पूर्ण करुन रुईया महाविद्यालय, मुंबई येथे त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षणाबरोबरच ठाणे येथील हनुमान व्यायामशाळेने केलेले खिलाडू वृत्तीचे संस्कार त्यांच्या पुढील आयुष्यावर परिणाम करणारे ठरले. सततचे फिरणे, भाषण देणे, लेखन करणे, नवनवीन आव्हाने अंगावर घेणे त्या सगळ्यात दमणेकधी नाहीच, याचे सारे श्रेय ते व्यायाम शाळेला देतात.

एक व्यक्ती म्हणून माझा विकास, आरोग्य, आचार, विचारासह व्यायामशाळेमुळेच झालाहे त्यांचे सततचे वाक्य असते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर पानसे यांनी एस. एन. डी. टी. महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात केली. एस.एन.डी.टी. मध्ये सरांनी १९६८ ते १९९१ पर्यंत पदव्युत्तर स्तरावर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. याच काळात इतरही अनेक कामे सुरू होती. मराठी अर्थशास्त्र परिषदेचीस्थापना केली. त्यामध्ये त्यांच्याबरोबर डॉ. नि. वि. सोवनी, डॉ. पारिख, डॉ. सबनीस हे सर्व मान्यवर होते. महाराष्ट्र ग्रामीण विकास परिषदया संस्थेच्या स्थापनेमध्ये मधुकरराव चौधरी, शरद कुलकर्णी यांचा सहभाग होता.ग्राममंगलही आदिवासी भागातील संस्था अनुताई वाघ यांच्याबरोबर काम करताना स्थापना केली.ऋचानावाच्या कवितांचा समग्र अभ्यास करणाऱ्या नियतकालिकाचे संपादन केले. १९९१ नंतर म्हणजे नोकरी सोडल्यानंतर महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेची स्थापना केली. ग्रामबाल शिक्षण केंद्र - कोसबाड येथे संचालक, अर्थबोध पत्रिका आणि शिक्षण पत्रिका या मासिकांचे संपादन, महाराष्ट्र राज्य भूकंप पुनर्वसनाचे सल्लागार, अशी शिक्षण, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास या क्षेत्रातील अनेक कामे केली.

पानसे यांनी शिक्षण-आनंद क्षणया प्रकल्पासाठी युनिसेफच्या सहकार्याने महाराष्ट्रातील १२ प्रयोगशील शाळांचा अभ्यास करून त्यावरील ग्रंथाचे लेखन केले. नयी तालीमया महात्मा गांधी यांनी केलेल्या शिक्षणविषयक प्रयोगाचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथाचे लेखन केले, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळे नव्याने विकसित झालेल्या शास्त्रांचा मागोवा घेणारे कर्ता करविताहे मेंदू संशोधनाचा, शिक्षणाच्या अंगाने वेध घेणार्‍या पुस्तकाचे लेखन केले. याशिवाय विचार फुले’, ‘बालशिक्षण स्वरूप व दिशा’, ‘आजचे शिक्षण-उद्याचे जीवनअशी नव शिक्षणाचे सार सांगणारी पालकांचे प्रबोधन करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पुस्तकांना अनेक सन्मानही मिळाले. वर्तमानपत्रातून लेख, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पेपरवाचन, संशोधनात्मक लेख असे सुमारे पाचशे लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांना व त्यांच्या पुस्तकांना अनेक सन्मानही मिळाले आहेत.

या सर्व कामाबरोबर सरांचे सर्वात महत्त्वाचे व मोठे काम म्हणजे ग्राममंगल आणि महाराष्ट्र बालशिक्षण परिषद. या दोन संस्थांकरवी ते अत्यंत दुर्लक्षित अशा बालशिक्षण विषयक जन जागृतीचे काम करत आहेत. संस्थाचालक, चालक व शिक्षक या समाजातील तीनही गटांसाठी प्रबोधनात्मक कार्य करणे आणि अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या वर्गाचा गांभिर्याने विचार करायला लावणे हे शिवधनुष्य त्यांनी सध्या उचलले आहे. त्यासाठी अभ्यास करणार्‍या मंडळींचा गट उभा करणे, प्रत्यक्ष प्रयोग करणे आणि ते प्रयोग सार्वत्रिक करणे अशा तीन पातळींवर सध्या काम चालू आहे. बहुविध बुद्धिमत्त्वांवर आधारित, मेंदू संशोधनाचा आधार घेणारे, अनौपचारिक शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत पोहचविणे हा ध्यास त्यांनी घेतलेला आहे.

आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न असो अथवा इंग्रजी शाळांचे स्तोम असे. प्रत्येकावर उत्तर आहे ते आपण शोधू व समाजापुढे ठेवू हा सकारात्मक दृष्टीकोन फार महत्त्वाचा आहे. प्रचलित पद्धतीला नावे ठेवून चालणार नाही. तर त्यावरील उपाय समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे. प्रश्‍न सामोरे येत गेले, त्यावर आत्ताच्या काळाला सुसंगत आणि शास्त्रीय उत्तरे ते शोधत गेले. या विचारातूनच लर्निंग होमही संकल्पना जन्माला आली. शालेय शिक्षणातील स्पर्धा, पाठांतरातून मिळालेले मार्क यातून विद्यार्थी खरेच ज्ञान मिळवत आहेत का? या विचाराने त्रस्त झालेल्या पालकांच्या सहभागातून लर्निंग होम सुरु झाले. घरातील वातावरणात मुलाचे शिक्षण होते ही त्यातील महत्त्वाची भूमिका आणि त्याला शास्त्राची जोड. अशीच बहुविध बुद्धिमत्तांना वाव देणारी हॉबी होमही संकल्पना. मराठी शाळा गळतीचा प्रश्‍न फक्त इंग्रजी बोलता येत नाही म्हणून असेल तर तो प्रश्‍न द्विभाषाप्रकल्पाच्या माध्यमातून सोडवणे.

विविध विषयाचा अभ्यास एकाच वर्गात बसून करण्यापेक्षा प्रत्येक विषयाचे एक दालन उभारुन त्यामध्ये तो विषय परिपूर्णपणे मुलाला शिकता यावा म्हणून शास्त्रालयही संकल्पना. अशा विविध आयामांनी शिक्षणाचा विचार करणारा एक विचारवंत म्हणून शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे कार्यरत आहेत.

- आदिती नातू 

पानसे, रमेश गजानन