Skip to main content
x

पारगावकर, विठ्ठल शंकर

     विठ्ठल शंकर पारगावकर यांचा जन्म पारगाव (घुमरा), ता. पाटोदा, जिल्हा बीड येथे झाला. त्यांचे शिक्षण इंटर आर्ट्सपर्यंत झाले. १९४७ मध्ये पुण्यात स्थायिक झाल्यावर फर्गसन महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून ते नोकरीला लागले. १९७६पासून याच महाविद्यालयात मुख्य कार्यालयात काम सुरू केले ते निवृत्तीपर्यंत.

     पारगावकरांनी कथा आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारांत विपुल लेखन केले. गंगाधर गाडगीळ आणि अरविंद गोखले या नवकथाकारांच्या नंतरच्या पिढीतील नवकथाकार म्हणून पारगावकर मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. मराठी साहित्य जगतात ‘विशं’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या पारगावकरांनी मराठी साहित्यात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व उत्तमरीत्या केले.

     ‘ललाट’ (१९६२), ‘निगूडा’ (१९६२), (१९८९), ‘वैशाखातील वावटळ’ (१९६३), ‘एक होता राजा’ (१९६५), ‘कालचक्र’ (१९६७), (१९९८) आदी कादंबर्‍या; ‘पंचरंगी स्वप्न’ (१९६०), ‘मरवा’ (१९६२), ‘केळफूल’ (१९६४), ‘आविष्कार’ (निवडक कथा १९८५), ‘उजळती लकेर’ (निवडक १९९८) आदी कथासंग्रह; ‘संध्यामेघ’ (१९६६), ‘जुनागड ते काश्मीर’ (१९६६), ‘पूर्वदर्शन’ (१९६७), ‘जगापुढील प्रश्न’ (१९६७) ही राजकीय विषयांवरील पुस्तके; ‘आस्वाद आणि समीक्षा’ (१९८९) ही समीक्षा त्यांच्या नावावर आहे.

     शीर्षकाने त्यांच्या ‘वि. शं. पारगावकर की कहानियाँ’ या हिंदीत कथा (१९९०) प्रा. डॉ. राजमल बोरा यांनी अनुवादित केल्या. ‘एक होता राजा’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार (१९६५) लाभला. ‘वि. शं. पारगावकर की कहानियाँ’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीचा अनुवादाचा पुरस्कार (१९९१-१९९२) मिळाला.

     मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची प्रातिनिधिक सुख-दुःखे सांगणार्‍या पारगावकरांच्या कथा-कादंबर्‍यांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

- शशिकला उपाध्ये

पारगावकर, विठ्ठल शंकर