Skip to main content
x

पाटील बोरकर, बालाजी देवराव

       बालाजी देवरावजी पाटील यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव या छोट्याशा गावात झाला. देवरावजी व जानुकाबाई हे त्यांचे माता - पिता होते. तलाव बांधणे व शेती हा जरी वडिलांचा व्यवसाय असला तरी एकूण घरची गरिबी होती. छोटी - मोठी कामे करतच ते मोठे झाले. गंगाबाई व भागिरथी अशा त्यांना दोन पत्नी होत्या. पण केवळ स्वतःच्या संसारात रमणारे ते नव्हते. त्यांचा पिंडच राष्ट्रभक्तीचा, समाजसेवेचा होता. तरुणपणीच डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, स्वा. सावरकर, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, म. गांधी इत्यादींच्या विचारांचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला. त्यातूनच ते समाजोपयोगी कामे करणाऱ्या रा. स्व. संघाचे सक्रीय कार्यकर्ते झाले. नवरगावच्या विकासाचा त्यांनी ध्यासच घेतला होता.

       देश स्वतंत्र करून सुराज्य करायचे असेल तर सर्व तऱ्हेनी समाज प्रबोधन करून देशभक्ती जागृत करण्याचे, समाजात समरसता आणण्याचे महत्त्वाचे काम करणे आवश्यक होते. त्याची पहिली पायरी म्हणजे अति दुर्गम भागातील - नवरगाव सारख्या-दुर्लक्षित खेड्यातील-लोकांवर संस्कार करण्याचे, त्यांच्यातील तऱ्हेतऱ्हेचे भेद नाहीसे करून त्यांना संघटित करण्याचे, सुशिक्षित करण्याचे काम करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांच्या अडीअडचणी आस्थेने समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते.

        उत्तम शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे उत्तम संस्कार करणे. आपल्या अंगच्या गुणांमुळे त्यांनी कीर्तन, प्रवचन, नाटक, भजन या माध्यमातूनही लोक शिक्षणाचे काम केले.

        त्यांच्या व संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विचार विनिमयातून नवरगावला ‘भारतीय शिक्षणसंस्था’ १९५० मध्ये स्थापन झाली. नवरगाव हे मुख्य रस्त्यापासून आत होते. बस, वीज इ. सोयी नव्हत्या. ‘आपली मुले शिकली पाहिजेत’ असे वाटत असले तरी बाहेरगावी शिक्षणासाठी मुलांना पाठवणे शक्य नव्हते म्हणून संघाच्या प्रेरणेतून व गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी ‘भारतीय शिक्षण संस्था’ द्वारा भारत विद्यालय सुरू केले. भारत प्राथमिक विद्यालय सुरू झाले. भारत माध्यमिक विद्यालय सुरू झाले. शाळेसाठी अनुदान मिळणे, मंजुरी मिळणे इ. गोष्टीत सतत अडचणी येत. पण बालाजी पाटलांनी कधी हार मानली नाही. संघविचारांचा प्रभाव असणारे रामभाऊ बोंडाळे, यशवंतराव बाजारे, त्यांचे मानसपुत्र गुरुदासजी अलमस्त असे अनेक शिक्षक त्यांना मिळाले. अलमस्त यांच्या गावी पळसगाव जाट येथे माध्यमिक विद्यालय सुरू झाले. लहान गावात कोणतीही सोय नसताना महाविद्यालयही सुरू केले. आज तेथे भारत वसतिगृह, विज्ञान, कला आणि वाणिज्य या तीनही शाखांचे शिक्षण देणारे ‘श्री ज्ञानेश महाविद्यालय’ उत्तम तऱ्हेने चालू आहे. प्रथमच १९५९ मध्ये संघाच्या विचारांनी भारलेले ध्येय वेडे, धडाडीचे ट्रेन्ड मुख्याध्यापक ( एमएबीटी) म्हणून संघाने  म. दा. देशपांडे यांना पाठविले. त्यांनी नवरगाव ही आपली कर्मभूमी मानून भारतीय शिक्षण संस्थेच्या विकासाला सर्वतोपरी हातभार लावला.

        १५ मार्च १९७५ रोजी श्रीमती ताराबाई कवासे यांनी संस्थेस दान केलेल्या जागेत माजी पंतप्रथान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अमृतवर्षानिमित्त त्यांचा गौरवनिधी देऊन सत्कार करण्यात आला. तो त्यांनी संस्थेस अर्पण केला. 

- निर्मला करमरकर

पाटील बोरकर, बालाजी देवराव