Skip to main content
x

पाटील, ज्ञानदेव यशवंत

डी. वाय. पाटील

ज्ञानदेव यशवंत पाटील यांचा जन्म आपल्या आजोळगावी अंबप येथे झाला. करवीर तालुक्यातील कसबा बावडा या गावातील त्यांचे वडील यशवंत भाऊराव पाटील हे एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित शेतकरी होते. त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींकडे नवस केल्यामुळे मुलगा झाल्यावर त्याचे नाव ‘ज्ञानदेव’ असे ठेवले. वडिलांनी त्यांना कसबा-बावडा गावातील मराठी शाळेत घातले होते. परंतु ज्ञानदेव सात वर्षांचे असताना त्यांच्या आईचे वत्सलाबाईंचे निधन झाले. नंतर वडिलांनी त्यांना कसबा बावडा विद्यालयात घातले. आपला मुलगा अभियंता व्हावा अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे त्यांनी ज्ञानदेव यांना कोल्हापुरातील नामवंत राजाराम विद्यालयामध्ये घातले. तसेच शुक्रवार पेठेतील रावसाहेब दाणी यांच्याकडे इंग्रजी व संस्कृत विषयाची शिकवणी लावली होती. त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण कोल्हापूर येथेच झाले. पण 6 फेब्रुवारी 1954 रोजी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर पाटील यांना अभियंता होण्याचे स्वप्न दूर ठेवावे लागले. त्यांनी घरच्या शेतीच्या व्यवसायात लक्ष घातले व कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवली. पुढे शहाजी कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य के. बी.केळकर व प्रा. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते 1967 मध्ये एलएल. बी. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी दोन वर्षांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठाची एम.ए. ची पदवी द्वितीय श्रेणीत मिळवली.

कसबा बावडा या गावातील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आर्थिक अडचणीत असताना 1955 मध्ये पाटील केवळ 19 वर्षांचे असताना लोकांनी त्यांना तीन वर्षांकरीता या संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडले. त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने कारभार चालवून संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले. पाटील यांनी 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोमात असताना व काँग्रेस पक्षाला मोठा विरोध होत असतानाही काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली व ते जिंकले. त्यावेळेस ते कोल्हापूर महानगरपालिकेतील एकमेव काँग्रेसी नगरसेवक होते.

कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे अध्यक्ष, (1961) करवीर तालुका विभागीय समितीचे अध्यक्ष, (1960-1962) कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष, (1962-1975) अशी पदे त्यांनी भूषविली. कैरो व युगोस्लाव्हिया येथे भरलेल्या युथ परिषदेसाठी 1964 मध्ये संपूर्ण भारतातून अकरा प्रतिनिधी गेले होते. त्यात पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी 1962 मध्ये शेतकरी सहाय्यक मंडळ स्थापन केले. त्यांनी कोल्हापूरमधील ऊस पीक घेणार्‍या शेतकर्‍यांची खाजगी साखर कारखान्यातील पिळवणूक थांबवण्यासाठी कोल्हापूर साखर कारखाना या खाजगी कारखान्याला ऊस पुरविण्यार्‍या शेतकर्‍यांची संघटना स्थापन केली. हा खाजगी कारखाना सहकारी झाला पाहिजे म्हणूनही ते प्रयत्नशील होते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काळम्मावाडी धरण झाले पाहिजे, यासाठी पाटील यांनी 1973 मध्ये शेतकर्‍यांचा ऐतिहासिक अभूतपूर्व मोर्चा काढला व शासनाला खडबडून जागे केले. पाटील यांची 1972 ते 1978 या काळात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शेती महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केली. शेतीला पुरेसे पाणी मिळाले तरच शेतीचे उत्पन्न वाढेल, हे लक्षात घेऊन त्यांनी नद्यांना कालवे काढण्याचे महत्त्वाचे काम केले. याच काळात महाराष्ट्र शासनाने त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर सन्माननीय सदस्य म्हणून नियुक्ती केली. ते 1975 ते 1976 या काळात महाराष्ट्र सिंचन विकास महामंडळाचे सदस्य होते.

पाटील यांनी 1962-1967 या काळात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या निरनिराळ्या समित्यांवर कामे केली. ते करवीर तालुका पर्यवेक्षक कामगार संघटनेचे सभासद, करवीर तालुका प्रभाग विकास मंडळाचे उपाध्यक्ष, कोल्हापूर बाजार समितीचे सभासद, इत्यादी विविध पदांवर कार्यरत होते. त्यांची 1975 मध्ये रेल्वे सल्लागार मंडळावर नेमणूक झाली. तसेच ते हिंदुस्थान पेट्रोलियमचे सदस्य होते. त्यांनी 1981-1984 या काळात दूरध्वनी सल्लागार समितीचे सदस्य व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. तेव्हा त्यांनी ज्योतिबा डोंगरावरील विकासाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेऊन त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मिळवला.

पाटील यांची 1975 मध्ये गारगोटी येथील मौनी ग्रामीण विद्यापीठाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मौनी विद्यापीठ हे भारतातील ग्रामीण विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या 65 एकरांच्या विशाल प्रक्षेत्रावर 15 शिक्षणसंस्था, 10 शैक्षणिक इमारती, 10 वसतिगृहे आहेत. एकूण 250 कर्मचारी, दहा हजारांच्यावर विद्यार्थी येथे बालवाडीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात. त्यांनी 1967-1978 या काळात पन्हाळा गगनबावडा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते आमदार म्हणून निवडून आले. ते 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीतही विजयी ठरले, परंतु 1979 व 1980 साली झालेल्या निवडणुकांमध्ये अपयशी ठरले.

त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. विना अनुदानित तत्त्वावर शिक्षणसंस्था उभारण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आर्थिक अडचणी आल्या. बँकांनी कर्ज द्यायला नकार दिला. तेव्हा त्यांनी आपली संपत्ती गहाण टाकली व कर्जे उभारली. त्यांनी 14 ऑगस्ट 1983 रोजी विना अनुदानित तत्त्वावर नवी मुंबई येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आणि एक नवीच संकल्पना महाराष्ट्रात सर्वप्रथम रुजवली. त्यांनी 1984 मध्ये पुणे व कोल्हापूर येथे अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली तर त्यांनी 1989 मध्ये मुंबई, पुणे व कोल्हापूर येथे वैद्यक व दंत महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी नेरूळ येथे 750 खाटांचे भव्य इस्पितळ व कोल्हापूर येथे 500 खाटांचे सर्वसोयींनी युक्त असे इस्पितळही स्थापन केले. त्यांनी नेपाळ येथेही अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले.

पाटील यांनी 1983 मध्ये राजकारण सोडून स्वत:ला शिक्षण क्षेत्रात वाहून घेतले. त्यांना 1988 मध्ये अमेरिकेतील अ‍ॅरिझोना विद्यापीठाची पीएच.डी मिळाली. याचवर्षी ते भारती-मॉरिशस मित्रमंडळाचे अध्यक्ष झाले व तेथे त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील ग्रंथालयाची स्थापना केली. भारत सरकारने 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना 1992 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून मानपत्र देण्यात आले. याचवर्षी त्यांना यमकनमर्डीचे परमपूज्य हरीकाकांकडून शिक्षणमहर्षी किताब मिळाला. तसेच परमपूज्य तोडकर महाराज यांच्याकडून ज्ञानमहंत किताब प्राप्त झाला. ते छत्रपती शाहू पुरस्काराचेही मानकरी ठरले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे 1994 मध्ये त्यांचा सत्कार झाला. त्यांना 1996 मध्ये त्यांना इंग्लंडच्या नॉटिंगहॅम विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय नेत्ररोग चिकित्सा विकास परिषदेत 2000 मध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल त्यांचा सत्कार केला. त्यांना 2000 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मानपत्र देण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय व सातत्यपूर्ण समाजकार्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3140 तर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार दिला. भारत सरकारतर्फे 27 नोव्हेंबर 2009 रोजी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली गेली.

पाटील यांची विजय व अजिंक्य ही मुले उच्चविद्याविभूषित असून मुंबई येथील संस्थांचा कारभार सांभाळत आहेत. विजय पाटील यांना क्रिकेटची आवड असून ते भारतीय क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. नेरूळ येथे जागतिक कीर्तीचे क्रिकेटचे मैदान विजय पाटील यांनीच उभारले. त्यांची कन्या डॉ. नंदिता पालशेतकर ही जागतिक कीर्तीची स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. त्यांची लहान मुलगी प्रियदर्शनी या नेरूळ येथील रूग्णालयाचा कारभार सांभाळत आहेत. पुणे शिक्षण संकुलातील पिंपरी येथील संस्था त्यांचे जावई पी.डी. पाटील सांभाळीत आहेत. आकुर्डी येथील महाविद्यालये त्यांचे सुपुत्र सतेज पाटील तर कोल्हापूर येथील सर्व शिक्षणसंस्था त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजय पाटील अत्यंत कार्यक्षमतेने पाहात आहेत. शिवाजी विद्यापीठाजवळील शांतिनिकेतन ही संस्था त्यांची कनिष्ठ कन्या राजश्री काकडे समर्थपणे चालवत आहे.

- प्रा. नीळकंठ पालेकर 

पाटील, ज्ञानदेव यशवंत