Skip to main content
x

पाटील, प्रल्हाद एकनाथ

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मनूर येथील थोर स्वातंत्र्य सेनानी तथा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार एकनाथ संपत पाटील या आपल्या वडिलांचा वारसा चालविणार्‍या सहकारमहर्षी प्रल्हाद एकनाथ पाटील यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारण, अर्थकारण यांचा विचार केला. सहकार क्षेत्रात प्रल्हाद पाटील यांचे कार्य केवळ खानदेश किंवा जळगाव जिल्ह्यापुरते आदर्शाचे नसून संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्याची आजही मोहोर उमटली आहे.

प्रल्हाद एकनाथ पाटील यांचा जन्म मनूर या खेडेगावात अत्यंत धार्मिक वारकरी कुटुंबात झाला. प्रल्हादचे बालपण खेड्यात गेल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्न, कष्ट, व्यथा, अडचणी आणि त्यांची दैन्यावस्था त्यांनी अनुभवली होती. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. सरूवातीला त्यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम कारभार केला. राजकारणात त्यांच्यासमोर शरदराव पवार यांचा आदर्श होता. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तालुका सभापती तसेच शिखर बँकेचे अध्यक्षपद भूषविले.

पाटील यांना राजकारणात गती असली त्यांचा ओढा सहकार क्षेत्राकडे अधिक होता. बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्ज देऊन, सहकार क्षेत्रातील संस्थांना उर्जितावस्थेसाठी सर्वतोपरी सहकार्य करून संस्था आणि कार्यकर्ता कशा उभ्या राहतील, त्यातून सर्वांची उन्नती कशी साध्य होईल हाच विचार त्यांनी केला. त्यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून बँकेची ध्येय धोरणे निश्चित केले.

पाटील यांनी ऐंशीच्या दशकात प्रतिकूल परिस्थितीतील शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी मुक्ताई जलउपसा योजना आखली. त्यांनी जिल्ह्यातील अवर्षणप्रवण तालुक्यांना भेटी दिल्या. अत्यंत कठीण परिस्थिती असलेल्या बोदवड आणि जामनेर तालुक्यातील शेतकर्‍यांची आर्थिक दुर्बलता त्यांच्या शेतीला पाणी मिळाल्यावर बदलेल हा विश्वास त्यांना होता. त्यांनी या परिसरात पाणी आणण्याचा ध्यास घेतला. या योजनेमुळे 40 हजार हेक्टरच्या सिंचनाची समस्या सुटणार होती त्यासाठी योजना तयार झाली. 48 कोटी रुपयांची ही योजना बँकेच्या माध्यमातून राबविताना त्यांना संपूर्ण कौशल्य आणि वजन खर्ची घालावे लागले होते. पुढे ही योजना महाराष्ट्रातील एकमेव महत्त्वाकांक्षी योजना म्हणून नावारूपाला आली. त्यांनी शिखर बँक किंवा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुशिक्षितांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

मुक्ताईनगर ते बोदवड या ठिकाणी तापी नदीवरून पाईप लाईनद्वारे पाणी आणून तेथील शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून दिले. या परिसराचा विकास घडवून आणण्यासाठी उद्योगधंद्याला चालना मिळणे गरजेचे आहे अशी पाटील यांची ठाम भूमिका होती. त्यासाठी त्यांनी मालदाभाडी येथे एमएससी बँकेचे कर्ज घेऊन एक स्टार्च फॅक्टरी सुरू करण्याचा संकल्प केला. या परिसरात उद्योगासाठी लागणारे पाणी उपलब्ध नाही म्हणून त्यांनी जलउपसा योजनेची पाईपलाईन बोदवड येथून पुढे मालदाभाडीपर्यंत वाढविण्याचे ठरविले आणि 1991 मध्ये कारखान्याची कोनशिला बसविली.

हा स्टार्च कारखाना या परिसरात येण्याचे श्रेय शरद पवार यांना द्यावे लागते कारण ही स्टार्च फॅक्टरी बारामतीसाठी मंजूर झाली होती, परंतु शरद पवार आणि प्रल्हादराव यांचे असलेले संबंध यामुळे जळगाव जिल्हा सहकारी स्टार्च उत्पादक संस्था प्रकल्प मालदाभाडीला सुरू करता आला.

पाटील यांनी या परिसरातील शेतकर्‍यांना मका लागवड करण्यास प्रवृत्त करून त्यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी शेतकर्‍यांनी ठिबक, तुषार सिंचनाचा अवलंब करून शेती करण्यास सुरुवात केली. पाटील यांनी शेतकर्‍यांना सर्वतोपरी सहकार्य केले. मक्यावर प्रक्रिया करून स्टार्च आणि त्याचे 28 बाय प्रोडक्ट देखील बनविण्याची त्यांची तयारी होती. परंतु राजकारण, कर्ज व अन्य तांत्रिक कारणांमुळे त्या वेळेस अनेक अडचणी आल्या. त्यांच्या हाताने सुरू झालेले हे दोन्ही प्रकल्प बंद पडले. पैकी हा स्टार्च कारखाना गुजराथच्या एका कंपनीने विकत घेऊन खासगी रित्या सुरू ठेवली आहे.

पाटील शेती, माती आणि माणसाप्रमाणेच पर्यावरणावर प्रेम करणारे होते. म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या अवाजवी वापरामुळे जमीन खराब होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला त्याचा धोका पोहोचत आहे हे त्यांच्या वाचनात आल्यावर त्यांनी पर्यावरणाला कुठलाही धोका न पोहोचविणारे बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक बनविले. या प्लॅस्टिकचे विघटन होणारे प्लॅस्टिकही वापरता येईल, हा विचार घेऊन ते थेट धीरूभाई अंबानींपर्यंत पोहोचले. त्याबाबत त्यांच्या एक दोन भेटीही घडल्या होत्या परंतु दुर्दैवाने या गोष्टीला पुढे चालना मिळू शकली नाही.

पाटील यांनी 1985 मध्ये जळगाव येथे पॉलिटेक्निकसाठी जागा खरेदी केली. पारंपरिक शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करण्याचा उद्देशाने त्यांनी मुक्ताई तांत्रिक महाविद्यालय स्थापना केले. या संस्थेतून आजची तरुण पिढी शहरी भागातील रीतिरिवाजांचे पालन करू शकेल व एक आधुनिक पिढी जन्माला येईल या उद्देशाने त्यांनी जळगाव येथे या महाविद्यालयाची स्थापना केली.

पाटील यांची संत मुक्ताबाईंवर नितांत श्रद्धा होती. त्यापोटी त्यांनी मुक्ताबाईच्या भक्तगणांकडून 20 ते 25 लाखांची देणगी जमवली. या मंदिराची उभारणी 11 फेब्रुवारी 1989 रोजी करण्यात आली. मुक्ताबाईच्या चरणी आपले प्राणोत्क्रमण व्हावे अशी इच्छा बाळगणार्‍या पाटील यांचे तेथेच देहावसन झाले.

पाटील यांच्या पत्नी चंद्रप्रभाताई, चार विवाहित मुली, दोन मुले आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांचे राजकारण व सहकाराचे कार्य त्यांचे पुत्र रवींद्र पाटील पुढे नेत आहेत.

- किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी

पाटील, प्रल्हाद एकनाथ