Skip to main content
x

आजगांवकर, जगन्नाथ रघुनाथ

संत कवींचे चरित्रकार श्री.आजगांवकर यांचा जन्म आजगांव, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. प्राथमिक चौथीनंतर इंग्रजी शिक्षणासाठी आजगांवकर १८९३साली कोकणातून कोल्हापुरात गेले. मधली एक-दोन वर्षे सोडल्यास ते सुमारे ५७ वर्षे जन्मभूमीच्या बाहेरच होते. एवढ्या काळात कोल्हापूर, कराची, पुणे, मुंबई वगैरे ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. प्रवासही पुष्कळ झाला. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील बहुतेक सर्व प्रसिद्ध व्यक्तींशी त्यांचा परिचय होता. चालू पिढीतलेही बरेचसे लेखक त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते.

महाराष्ट्र भाषाभूषण ज.र. आजगांवकरांनी आयुष्याची ५० वर्षे खपून २००पेक्षा अधिक  प्राचीन मराठी संत कवींच्या चरित्रांची व काव्यांची ओळख मराठी वाचकांना करून दिली आहे. त्यांनी एकूण २४पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले आहेत. संपादक, प्रभावी वक्ते, संशोधक म्हणून ते प्रसिद्ध होते. पण त्यांच्या कवि-चरित्रांमुळे मराठी सारस्वतांतील त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. महाराष्ट्र कवि चरित्रकार म्हणजे महाराष्ट्र भाषाभूषण आजगांवकर असे समीकरणच होऊन बसले आहे. १९०७ ते १९४७ या कालखंडात आजगांवकरांनी महाराष्ट्र कवि-चरित्रांचे ११ भाग प्रसिद्ध केले होते. ह्याच्यापूर्वीच लिहिलेल्या कवि-चरित्रांच्या  गेल्या ५० वर्षांत उपलब्ध झालेल्या सर्व नव्या व अद्ययावत माहितीचा उपयोग करून नवी सुधारलेली आवृत्ती काढण्यासाठी ५ वर्षे अविश्रांत श्रम करून १ ला खंड  १९५४ साली पूर्ण केला. तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले. महाराष्ट्रातील कवींच्या चरित्राचे व काव्याचे मार्मिक व संकलित रीतीने समालोचन करणारा मराठी भाषेतील हा पहिलाच प्रयत्न होय. मराठी साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी व प्राध्यापक यांची वर्दळ त्यांच्या घरी नेहमी असायची. लहानपणापासून मराठी साहित्याकडे त्यांचा ओढा होता. वाचन व लेखन अखंड चालू असे. ‘मनोरंजन’कार काशीनाथ रघुनाथ मित्र हे तर आजगांवकरांना आपले बंधूच मानीत. मराठी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या आजगांवकरांची भाषा प्रासादिक, रसाळ, अर्थमधुर व वाक्ये सुटसुटीत असत. या वैशिष्ट्यांमुळेच शि. म. परांजपे यांच्या शिफारशीवरून डॉ.कूर्तकोटी शंकराचार्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषाभूषण’ ही सार्थ पदवी दिली. पीएच.डी.चे विद्यार्थीसुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेत असत.

नाटक आणि नाटक मंडळ्या ह्या विषयांवर १९४७ पूर्वी मुंबई नभोवाणीवर त्यांनी केलेली सहा भाषणे उद्बोधक व रोचक होती. याच विषयावर त्यांनी ‘विहार’ मासिकात लेखन केले होते. ‘प्राचीन मराठी संत कवी: खंड पहिला व दुसरा’ या ग्रंथांना जोडलेल्या दीर्घ प्रस्तावनांतूनही आजगांवकरांनी आत्मकथन केले आहे. संत कवींच्या चरित्रातील चमत्कारांवर त्यांचा डोळस विश्वास होता. ते स्वतः पदवीधर नसताना नागपूर व मुंबई विद्यापीठांच्या बी.ए., एम.ए. परीक्षांचे परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या होत्या. अनेक राष्ट्रपुरुषांशी त्यांचे निकटचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. आजगांवकरांचे वडील रघुनाथ मुरारी प्रभू आजगांवकर बहुश्रुत व संत वाङ्मयाचे भोक्ते होते. वडिलांचे छत्र लवकर हिरावले गेल्याने  त्यांची शिक्षणाची परवड झाली. चरितार्थासाठी त्यांनी अनेक नोकर्‍या केल्या. लॉर्ड रे म्युझिअममध्ये त्यांनी क्युरेटरची नोकरी केली.

मुंबईच्या ‘गुराखी’ दैनिकात त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले होते. मुंबईच्या ‘इंदुप्रकाश’चे संपादन करीत असताना त्यांनी ‘ज्ञानांजन’ हे स्वतःचे मासिक सुरू केले. काही काळ ते ‘संदेश’ व ‘रणगर्जना’ह्यांचेही संपादक होते. लौकिक अर्थाने त्यांचे जीवन खडतर व जिकीरीचे असूनही त्यांनी कोणाची खुशमस्करी करण्यासाठी, लाचारीसाठी आपली लेखणी चालवली नाही. ते कुटुंबवत्सल, संतसेवक होते आणि चोखंदळ व सत्यप्रिय संशोधक होते. दीन-दुबळ्यांची कणव करणार्‍या संत एकनाथांचे समानधर्मी आजगांवकर वादकुशल व कठोर टीकाकारही होते. कोल्हापुरात ‘दीनबंधू’चे संपादन करताना त्यांनी आपला ‘रामशास्त्री’ बाणा दाखविला. वाणी व लेखणी ह्यांचे पावित्र्य राखून सत्याची बाजूच उजेडात आणली. पुण्याच्या ‘सुधारक’ पत्रात अहमदनगरचे भारदे यांनी ‘आळंदीचा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचा कर्ता नव्हे’ अशी लेखमाला लिहून विचारवतांत खळबळ उडवून दिली. आजगांवकरांनी जुन्या कवितांच्या आधारे त्याला लिहिलेले समर्पक उत्तर ‘केसरी’मध्ये अग्रलेखाच्या शेजारी छापून आले व भारदे चारी मुंड्या चीत झाले. आजगांवकरांचे शिक्षण, वाचन, व्यासंग, लेखन-कौशल्य वगैरे अगदी बेताचे असूनही ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार’ असा हलकल्लोळ त्या वेळी उडाला. या लेखामुळे लोकमान्य टिळकांशी आजगांवकरांचा अकृत्रिम स्नेह जमला. श्री. अ.का.प्रियोळकरांनी मुक्तेश्वरी महाभारताची सुधारित आवृत्ती काढली. त्यात मुक्तेश्वरांवर झालेला अन्याय, प्रियोळकरांचे मित्र असूनही, आजगांवकरांना सहन झाला नाही. त्यांनी लेखनमाला सुरू करून प्रियोळकरी संशोधनाचे वाभाडे काढले. “तुम्हां महाराष्ट्रीयांचे माझ्याविषयी काय मत आहे?” असे महात्मा गांधींनी त्यांना विचारले. त्यावर आजगांवकर म्हणाले, “एक थोर सत्पुरुष या नात्याने आपल्याविषयी सर्व महाराष्ट्रीयांच्या मनात आदरबुद्धीच वसत आहे. परंतु आपले राजकारण आमच्या लोकांस तितकेसे आवडत नाही. आम्हां महाराष्ट्रीयांस आक्रमक राजकारणाची सवय, त्यामुळे आपले राजकारण आम्हांला थोडेसे मिळमिळीत वाटते.” गांधींसारख्या राष्ट्रनेत्याला न आवडणार्‍या गोष्टी तोंडावर सांगणे, हे येरागबाळ्याचे काम नव्हते. निर्भीड आजगांवकरांना ते सहजसुलभ असे. आजगांवकरांच्या कविचरित्राच्या पहिल्या भागावर केसरीत स्वतः टिळकांनी एक स्फुट लिहून त्यांना प्रोत्साहन दिले. देवदेवता व संत हे त्यांचे श्रद्धाविषय. ते संतसेवक होते, ते अंधश्रद्धाळू नव्हते पण धार्मिक होते, पण तरीही धर्मवेडे नव्हते. सनातनी कर्मठपणा त्यांना बिलकूल मान्य नव्हता. त्यांच्याएवढीच साहित्यसेवा केलेला पण त्यांच्याएवढाच नम्र साहित्यसेवक  विरळा. त्यांना यशाचा अहंकार नव्हता. त्यांची रसिकता जिवंत व जातिवंत होती. “आपली साहित्यसेवा ही इतरांच्या कृपाप्रसादाचे व केवळ योगायोगाचे श्रेय आहे,” असे ते म्हणत. त्यांची गप्पांची बैठकही नेहमी रंगत असे. जुने नट, गायक, विद्वान, अनुभव, पुढारी, कविता, संगीत, शास्त्र वगैरे विषयांची उजळणी त्या बैठकीत सारख्याच तल्लीनतेने होई. त्यात चटकदारपणा असे. कुणाची कुचेष्टा, निंदा नसे. प्रा.न.र.फाटक म्हणतात, “त्यांनी कित्येक अप्रसिद्ध कवींना उजेडात आणले... त्यांनी आपल्या बालपणापासूनच्या जुन्या मराठी साहित्याच्या गोडीला संशोधनाची व चर्चेची जोड देऊन ती वाढविली. त्यांची धारणा व स्मरणशक्ती वाखाणण्यासारखी असल्याने ज्ञानेश्वर, नामदेव...मोरोपंत या ठळक मंडळींच्या वाङ्मयातील विवेचनोपयोगी निवडक वेचे ते तोंडाने भराभर म्हणत.” प्रा. फाटक त्यांच्या योगदानाविषयी लिहितात, “मराठी भाषेच्या अध्यापकांना भावे-पांगारकरांप्रमाणेच श्री. आजगांवकरांचे लेखन मार्गदर्शक ठरते व ठरणारे आहे.”

 ‘कवन-कुतूहल काव्य’ (१९०१), ‘भरतपूरचा वेढा’ (इतिहास) (१९०५), ‘नेपाळ वर्णन’ (१९०६), ‘भूतविद्येचे चमत्कार’ (१९१८), ‘मुकुंदराजांचा सार्थ’ परमामृत (गद्य भाषांतरासह) (१९३१), श्री.कृ. कोल्हटकरांच्या ‘मतिविकार’ नाटकावर  टीका, ‘हरिभजनामृत भाग १-२-३’ (१९१६ ते १९१८), ‘नित्यपाठ भजनमाला’ (१९१९), ‘महाराष्ट्र कवि-चरित्र भाग १ ते ८१’, पृष्ठसंख्या सुमारे २५००, ‘महाराष्ट्र संत-कवयित्री’, असे त्यांचे प्रकाशित साहित्य आहे.

- वि. ग. जोशी

 

 

आजगांवकर, जगन्नाथ रघुनाथ