Skip to main content
x

पाटील, पुरुषोत्तम श्रीपती

    पुरुषोत्तम पाटील यांचे मूळ गाव ढेकू (ता. अमळनेर, जिल्हा जळगाव). त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर (ता. पारोळा) या मामाच्या गावी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. मराठी सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण बहादरपूरला झाले. त्यानंतर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधून १९४६ साली मॅट्रिकची त्यानंतर प्रताप महाविद्यालयातून १९४९ साली इंटरची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. याच काळात ते कविता लिहू लागले. इंटरनंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळच्या पुण्यातील समृद्ध वाङ्मयीन पर्यावरणामुळे त्यांच्या काव्यलेखनाला अनुकूल वातावरण लाभले. त्यांच्या कविता ‘सत्यकथे’तून प्रकाशित होऊ लागल्या.

फर्ग्युसनमधील ‘साहित्य सहकार’ या वाङ्मयीन मंडळाचे चिटणीस म्हणून काम करताना वाङ्मयीन चर्चा-चिकित्सा करण्याची सवय त्यांना लागली. एक नवोदित कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ लागली. परंतु कवितेत रमल्यामुळे शैक्षणिक  अपयश त्यांच्या पदरी आले. त्यातून स्वतःला सावरण्यासाठी कवी बा.भ.बोरकर यांचा आधार त्यांना लाभला. १९४८-१९५२ या काळात बोरकरांचे लेखनिक व सचिव म्हणून काम करतानाचा काळ त्यांच्या वाङ्मयीन जडण-घडणीच्या बाबतीत महत्त्वाचा ठरला. 

१९५३ साली मुंबईला ‘दैनिक नवशक्ती’मध्ये संपादक प्रभाकर पाध्ये यांच्या हाताखाली उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी, पाटील यांना मिळाली. परंतु दैनिकाच्या रूक्ष व साचेबंद कामात त्यांचे मन फारसे रमले नाही. ‘नवशक्ती’मधील नोकरी त्यांनी सोडली आणि बहादरपूरच्या रा.का.मिश्र विद्यालयात उपशिक्षकाची नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात ते बी.ए. (१९५४) झाले. शिक्षकाची नोकरी टिकवायची म्हणून बी.टी.ची. पदवी मिळवणे क्रमप्राप्त होते, म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या एम.ए.टिचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन १९५५ साली बी.टी.ची पदवी प्राप्त केली. १९५८ साली पुणे विद्यापीठातून ते एम.ए. झाले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चिंचोली, हातेड येथील विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम (१९५९-१९६१) केले. १९६१ साली धुळे येथील श्रीशिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी त्यांना मिळाली आणि त्याच महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख म्हणून ते १९८८ साली निवृत्त झाले. मधल्या १९७४-१९७६ या काळात दोंडाईचा (जि. धुळे) येथील नवीन महाविद्यालयाचे प्राचार्यपद देखील त्यांनी संभाळले.

१९४७ पासून काव्यलेखन करणार्‍या पाटील यांचा पहिला कवितासंग्रह ‘तळ्यातल्या साउल्या’ १९७८मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘परिदान’ हा दुसरा कवितासंग्रह १९९८साली प्रकाशित झाला. या दोन्ही कवितासंग्रहांमधील कवितांतून प्रामुख्याने दोन मनांतील नाजूक भावबंधांचा अत्यंत हळुवार आविष्कार जाणवतो. संयत खानदानी प्रेमभावनेचा ग्रामीण पातळीवरील आविष्कार, स्त्री-पुरुषांतील प्रौढ आणि संयमी अशा अर्थपूर्ण नात्याचा शोध ही या कवितेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शब्द, भावना यांचा मितव्यय, शब्दांची चोखंदळ निवड, स्वतः शब्द घडविणे अशी मराठी कवितेची सौंदर्यवादी परंपरा समृद्ध करणारी ही कविता आहे.

कवितेसोबतच संपादनाच्या क्षेत्रातही त्यांचे कर्तृत्व लक्षणीय आहे. ‘अनुष्टुभ’ (प्रारंभ १९७७) या वाङ्मयीन नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी १९७८ ते १९८३ अशी साडेपाच वर्षे काम केले. कविता या वाङ्मयप्रकारासाठी एक स्वतंत्र नियतकालिक असावे, असा विचार करून ‘कविता-रती’ (प्रारंभ १९८५) हे द्वैमासिक त्यांनी सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे.

पाटील यांनी दैनिक लोकमत, देशदूत, केसरी यांतून साहित्यिक व सामाजिक विषयांवर उल्लेखनीय सदरलेखनही केलेले आहे. समकालीन घटना-घडामोडी यांवर ओघवत्या शैलीत मर्मभेदक भाष्य करणारे ‘तुकारामाची काठी’ आणि निवडक मराठी कवितांचे मर्म उलगडून दाखविणारे ‘अमृताच्या  ओळी’ ही त्यांची दोन पुस्तके अशा सदरलेखनातून तयार झालेली आहेत.

त्यांच्या ‘तळ्यातल्या साउल्या’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ आणि ‘परिदान’ या संग्रहाला शासनाचाच ‘बालकवी पुरस्कार’ असे सन्मान प्राप्त झाले. साहित्य अकादमीचे मराठी सल्लागार मंडळ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे ते सदस्य होते. १९८५साली प्रजासत्ताक दिनी अखिल भारतीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने सन २००३मध्ये गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला.

- आशुतोष पाटील

पाटील, पुरुषोत्तम श्रीपती