पौडवाल, अरुण प्रभाकर
अरुण पौडवाल या प्रतिभाशाली संगीतकाराचा जन्म मुंबई येथे झाला. उपजत असलेल्या संगीतकलेच्या ओढीने ते शालेय शिक्षणाबरोबरच वयाच्या सहाव्या वर्षीच मुंबईतील ‘ऑपेरा हाऊस’ येथे देवधर स्कूल ऑफ म्युझिक या नामांकित संगीत विद्यालयात संगीताचे धडे गिरवू लागले. गायनाबरोबरीने अरुण पौडवाल यांना वाद्यांविषयी विशेष आकर्षक होते. एल्फिन्स्टन महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत असताना अॅकॉर्डियन या वाद्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि अनिल देसाई यांच्याकडून त्यांनी अॅकॉर्डियन शिकण्यास प्रारंभ केला. संगीतविषयक जाण आणि वाद्यांविषयी उत्सुकता यामुळे त्यांनी अॅकॉर्डियनमधील बारकावे शिकत, हळूहळू त्यावर हुकमत मिळवली. महाविद्यालयात शिक्षण सुरू असतानाच वादक जयसिंग भोई यांच्या वाद्यवृंदात अॅकॉर्डियन वादनासाठी त्यांना बोलावणे आले.
कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अरुण पौडवाल देना बँकेत नोकरी करू लागले. एकीकडे त्यांचे अॅकॉर्डियन वादन सुरूच होते. दरम्यान कलाक्षेत्रातील माणसांशी त्यांचा परिचय होत होता. संगीतकार दत्ता डावजेकरांनी अरुण पौडवाल यांच्यातील गुणांना पारखून त्यांना खूप प्रोत्साहन दिले. किशोरकुमार यांच्या परदेश दौर्यामध्ये मुख्य वादकांमध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांचा प्रवेश झाला आणि उत्कृष्ट वादन केल्यामुळे लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपरिहार्य झाला. याच सुमाराला सचिनदेव बर्मन यांच्याकडे प्रथम वादक आणि नंतर संगीत संयोजक म्हणून ते काम पाहू लागले. प्रयोगशील संगीत संयोजक होण्यासाठी सचिनदेव बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या अनुभवी आणि यशस्वी संगीतकारांकडे साहाय्यक म्हणून मिळालेला अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
या काळात त्यांनी जवळपास तीस यशस्वी चित्रपटांमध्ये साहाय्यक म्हणून काम केले. त्यापैकी ‘शर्मिली’ (१९७१), ‘अभिमान’ (१९७३), ‘शराबी’ (१९८४) या चित्रपटांचा विशेष उल्लेख करता येईल.
१९७० साली हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रेरणेने त्यांचे समवयस्क, समविचारी वादक, संगीत संयोजक अनिल मोहिले यांच्याबरोबर ‘अनिल-अरुण’ या संयुक्त नावाने संगीत दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. या संगीतकार जोडीचे मराठी भावसंगीतातले योगदान महत्त्वपूर्ण आहे. आशा भोसले यांनी गायलेली ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’, ‘रुपेरी वाळूत’, ‘येऊ कशी प्रिया’ ही भावगीते, उषा मंगेशकर यांनी गायलेली ‘सूर सनईत नादावला’, ‘आता लावा, लावा शिळा’ ही गीते, तसेच अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ‘सजणा कशासी अबोला’, ‘का हासला किनारा’ ही गीते मराठी भावगीतविश्वाचे अविभाज्य अंग बनली आहे. याशिवाय अरुण पौडवाल यांचे स्वतंत्रपणे असलेले संगीतिक कामही नोंद घेण्याजोगे आहे. स्वत: वादक असल्यामुळे भावसंगीतात आवश्यक वाद्यांचा बाज ओळखून केलेले संगीत संयोजन यांमुळे त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली. त्यांच्या खास, वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून निर्माण झालेली ‘रजनीगंधा’ आणि ‘बंदिनी’ ही भावगीतांची ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाली. घराघरातून ऐकू येणार्या या ध्वनिमुद्रिकांनी विक्रींचा उच्चांक गाठला.
अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या दोघांच्याही कामाचे क्षेत्र विस्तारत गेल्याने ‘अनिल-अरुण’ ही संगीतकार जोडी विभक्त झाली. दरम्यान ‘सचिन पिळगावकर’ या निर्माता, दिग्दर्शकाबरोबर त्यांचे सूर जुळले. त्यांच्या विनोदी चित्रपटाच्या प्रवाहात अनेक मराठी चित्रपटांना अरुण पौडवाल यांनी संगीत दिले. हलक्याफुलक्या, उडत्या, सोप्या चालीच्या गाण्यांनी चित्रपटही लोकप्रिय झाले. ‘माझं घर माझा संसार’ (१९८६), ‘आत्मविश्वास’ (१९८९), ‘गंमत जंमत’ (१९८७), ‘चंगूमंगू’, ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८), ‘माझा पती करोडपती’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ (१९८८), ‘भुताचा भाऊ’ (१९८९), ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घनचक्कर’ (१९९०), ‘आयत्या घरात घरोबा’ (१९९१), ‘ऐकावं ते नवलंच’ (१९९३) अशा चित्रपटांमधून अरुण पौडवाल शैलीचे चित्रपट संगीत लोकप्रिय झाले.
वादक, साहाय्यक संगीत संयोजक, संगीतकार म्हणून एकेक वाट निर्माण करत असतानाच गायिका अलका नाडकर्णी (म्हणजेच आताच्या अनुराधा पौडवाल) यांच्याशी १९७२ साली अरुण पौडवाल विवाहबद्ध झाले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक कामाने हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या नावाभोवती वलय निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले होते. सुपर कॅसेट्सच्या ‘मीरा का मोहन’ या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही अरुण पौडवाल यांनी केले.
अत्यंत सुरेल स्वरसंयोजन, प्रफुल्लित करणारे संगीत, तसेच गाण्याच्या प्रत्येक तत्त्वांच्या सखोल विचारांमधून उतरलेली भावगीते, चित्रपटगीते, बालगीते, भक्तिगीते रसिकांच्या मनात आजही घर करून आहेत. आदित्य पौडवाल आणि कविता पौडवाल या त्यांच्या दोन्ही मुलांना संगीताचा वारसा मिळाला आहे.
अरुण पौडवाल या प्रज्ञावंत कलाकाराचे नवी दिल्ली येथे वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या योगदानाने मराठी संगीतक्षेत्राला एका नव्या वळणावर नेणार्या संगीतकाराच्या अकाली जाण्याने उत्तमोत्तम चालींना संगीतरसिक मुकले. ‘अरुण पौडवाल म्युझिक फाऊंडेशन’ या संस्थेच्या वतीने संगीतविषयक निरनिराळ्या कार्यक्रमांबरोबर पुरस्कारही दिला जातो.