Skip to main content
x

पदकी, मंगेश भगवंत

     दुसर्‍या पिढीतील नवकवी, नवकथाकार म्हणून ओळखले जाणारे मंगेश भगवंत पदकी मूळचे कारवारचे. चंद्रभागा व भगवंत पदकी हे त्यांचे आईवडील. लहानपणीच आईवडील निवर्तल्यावर पदकी मोठ्या बहिणीसह मावशीकडे वाढले. या मोठ्या बहिणीने व चुलत बहिणीने पदकींना शिक्षण घेण्यास खूपच मदत केली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कारवारला झाल्यानंतर, मावसभावाने (केशव पदकी) नोकरी-निमित्त अहमदाबादला बिर्‍हाड केल्यामुळे पदकींचे पुढील बी.कॉमपर्यंतचे शिक्षण अहमदाबादला झाले. पुढे मुंबईत येऊन नोकरी करत त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन एम.कॉम. केले व पुण्यात गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करून तेथेच डॉक्टरेट पूर्ण केली.

पदकींची पत्नी पूर्वाश्रमीची शांता गणेश कुलकर्णी (एम्.ए. संस्कृत) स्वतः कवयित्री, लेखिका. पदकी सारस्वत तर शांताबाई देशस्थ ब्राह्मण. पुण्यात बा.भ.बोरकरांकडे दोघांचा परिचय झाला. दोघेही ‘सत्यकथा’मध्ये कविता लिहीत असत. परिचयातून २५ जून १९५२ रोजी त्यांचा विवाह झाला. पुढे सरिता पदकी या नावाने त्यांनी कविता व अन्य लेखन केले.

‘खारीची पिल्ले’ हा दीर्घकथासंग्रह (नाग विदर्भ प्रकाशन, अमरावती) १९६३, ‘काराभट’ ही कादंबरी (मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे) १९५७ / १९९९; ‘अवतार व इतर कथा’ (२००२); ‘यक्षगान’ (१९६३) आणि ‘विभूत’ (१९७०) हे कथासंग्रह; ‘उद्धव’ (१९६०). आणि ‘राव जगदेव मार्तंड’ (१९७३) ही नाटके असे मंगेश पदकींचे प्रकाशित साहित्य आहे. नऊ अप्रकाशित नाटके, अनेक अप्रकाशित कथा हस्तलिखित स्वरूपात आहेत. कविता-लेखन विपुल केलेल्या पदकींचा कविता-संग्रह मात्र प्रसिद्ध झाला नाही. त्यांच्या ‘उद्धव’ (नाटक) या साहित्यकृतीला राज्य पुरस्कार (१९६०) प्राप्त झाला होता. तसेच हे नाटक विजया मेहतांनी दिग्दर्शितही केले होते. ‘राव जगदेव मार्तंड’ हे त्यांचे नाटक अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केले होते आणि डॉ.श्रीराम लागूंनी त्यात अभिनय केला होता.

बहुभाषक पदकींना गुजराती, कानडी, कोकणी यांसह इंग्रजी भाषा उत्तम अवगत होती. इंग्रजी साहित्य वाचनाचा तसेच भाषांतर करण्याचा छंद पदकींना होता. श्री.ज.जोशींच्या एका कथेचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. त्याला ‘Guest’ या मासिकाचा पुरस्कार प्राप्त झाला.

उत्तम साहित्याचे वाचन करण्याची आणि कवी, लेखक, नाट्यक्षेत्रातील मंडळी ह्यांच्याशी गप्पांची मैफल जमविण्याची त्यांना विलक्षण आवड होती. निसर्ग चित्रे काढण्याचाही छंद होता. दि.बा.मोकाशी, रणजित देसाई, रंगा मराठे ही मित्रमंडळी कायम त्यांच्या घरी येत.

१९७५ साली हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती-अस्वास्थ्य आणि नैराश्य यांमुळे पदकी साहित्यविश्वापासून थोडे दूरच राहिले. साहित्य निर्मिती झाली, तरी त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.

- शशिकला उपाध्ये

पदकी, मंगेश भगवंत