Skip to main content
x

पेडणेकर, हिराबाई

हिराबाई पेडणेकर या गोव्यातील कलोपजीवी कुळातील एक बुद्धिमान कलाकार होत्या. त्यामुळे अगदी अल्पवयातच त्यांनी संगीतावर प्रभुत्व संपादन केले होते. अंजनीबाई मालपेकर या त्यांच्या जीवश्च कंठश्च मैत्रीण होत्या. त्यांचे वास्तव्य मुंबईत होते. पं. भास्करबुवा बखले यांजकडून त्या रागसंगीत शिकल्याचे उल्लेख मिळतात. हिराबाई पेडणेकरांची सांगीतिक कारकीर्द १९२०-२५ च्या सुमारास अस्तास गेली. अवघ्या १८-२० वर्षांची ही सांगीतिक कारकीर्द होती.
हिराबाईंना त्यांच्या कुळामुळे व उपजीविकेसाठीच्या सामाजिक स्थानामुळे समाजात मान्यता मिळाली नाही. त्यांचे साहित्यिक, सांगीतिक कर्तृत्व हे दर्जेदार व महत्त्वाचे असूनही त्याची योग्य ती दखल घेतली गेली नाही. संगीत रचनाकार म्हणून हिराबाईंनी बरेच काम केले असावे; पण त्याचा पुरेसा स्पष्ट उल्लेख फारसा कुठे आढळत नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीची समाज- मानसिकता, स्त्री-कलावंतांविषयक धारणा यांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून हिराबाई पेडणेकरांची कारकीर्द पाहता येते.   
नाट्यसंगीताच्या संगीतरचनेच्या संदर्भात हिराबाई पेडणेकरांचे काम महत्त्वाचे आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या आत्मचरित्रात हिराबाईंच्या गाण्यांचे आणि रचनांचे उल्लेख सापडतात. हिराबाईंनी ‘दामिनी’ हे संगीत नाटक लिहिले आणि त्यातील सर्व पदांना संगीतही त्यांचेच होते. दामिनी नाटकात एकंदर ७२ पदे होती. एकाही पदात चालीची पुनरावृत्ती नव्हती. हे नाटक ‘ललितकलादर्श’ने रंगभूमीवर आणले. हिराबाईंपाशी चालींचा चांगलाच भरणा होता व त्यांपैकी काही श्री.कृ. कोल्हटकरांनी ‘मतिविकार’ नाटकातील पदे रचताना उपयोगात आणल्या होत्या. कोल्हटकरांच्या ‘प्रेमशोधन’च्याही चाली हिराबाईंनीच दिल्या होत्या. खाडिलकरांनीही त्यांच्याकडून काही चाली घेतल्या होत्या व गडकर्‍यांच्या ‘पुण्यप्रभावा’त त्यांनी दिलेल्या बर्‍याच चाली आहेत.
‘मानापमान’पूर्वी ‘दामिनी’ लिहिले गेले व मानापमानाच्या संगीताचा प्रेरणास्रोत दामिनीत आहे ही गोष्ट मराठी रसिकांच्या लक्षात आली नाही. ‘मानापमान’ आजही तेजाने तळपत आहे व ‘दामिनी’ मात्र विस्मरणाच्या धुक्यात गुरफटून अदृश्य झाले आहे, असे काही जाणकारांचे मत आहे. ‘या तव बघुनि मधुर वचना’ या ‘जयद्रथ विडंबन’ नाटकातील पदाच्या चालीवर पुढे ‘मानापमान’ नाटकातील ‘या नव नवल नयनोत्सवा’ हे पद रचले असल्याचे लक्षात येते.
हिराबाई पेडणेकरांचा संगीताबरोबरचा साहित्याचा व्यासंग ही बाबही त्या काळात विशेष न आढळणारी गोष्ट आहे. त्यांचा संतसाहित्याचा अभ्यास होता व त्या बंगाली भाषाही शिकल्या होत्या हे सर्व सांगीतिक कारकिर्दीच्या संदर्भात नमूद करावेसे वाटते; कारण एकंदर समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा परिणाम कलाकाराच्या जडणघडणीवर व पर्यायाने कलेवर होत असतो. या सर्व गोष्टींवरून हिराबाई पेडणेकर या काळाच्या पुढे विचार करणार्‍या, दूरदृष्टीच्या, स्वतंत्र बुद्धीच्या कलाकार होत्या असे जाणवते.

          डॉ. शुभदा कुलकर्णी

पेडणेकर, हिराबाई