Skip to main content
x

पेठे, मेघना मोरेश्वर

मेघना मोरेश्वर पेठे यांचा जन्म मुंबईत झाला. वडील मुंबईच्या झेविअर्स महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. आई जर्मन भाषातज्ज्ञ होती. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात आणि महाविद्यालयीन शिक्षण सेन्ट झेविअर्स महाविद्यालयात झाले. १९७९ साली बी.ए. ही पदवी संपादन केली. रिझर्व बँक ऑफ इंडियात त्या नोकरी करतात.

सर्वसामान्य वाचकाला त्यांंची ओळख कथाकार, कादंबरीकार म्हणूनच आहे. मात्र त्याहीपूर्वी त्या प्रयोगशील व सकस कवितालेखन करीत. ‘मेघनाच्या कविता’ नावाचे स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले पुस्तक (हस्तलिखित) त्यांनी स्वतःच प्रकाशित केले. १९७४ ते १९८५ सालातील या कविता आहेत. ‘जगण्याला अर्थ आणि निमित्त देणारी कविता ही एक प्रेरणा आहे. पण तिच्याशिवायही जगणे असतेच. जगणे कवितेपेक्षा मोठे  आहे’ असे त्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात. ‘दहा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर मी काही लिहिले नाही’ असे त्यांचे निवेदन आहे. ‘हंस अकेला’ हा त्यांचा कथासंग्रह १९९७ मध्ये प्रकाशित झाला. कुठे थांबायचे, याचे पूर्ण भान या लेखिकेला आहे, हे विशेष. त्यांच्या कविता वाचल्यावर कथा-कादंबरीच्या आशयाचा मूळ गाभा कवितांच्या काही ओळींत वा विचारात असलेला जाणवतो. उदाहरणार्थ-

‘टुमदार घराच्या काचेतून,

दूरवर कोसळणार्‍या दरडी पाहाव्या,

तसे काल आपण समोरासमोर उभे राहून,

शांतपणे एकमेकांचा निरोप घेतला, आता पुन्हा आपण भेटणार नाही,

पुन्हा कधी भेटलो तरी!

त्यांच्या ‘नातिचरामि’ कादंबरीचे (२००४ साली प्रकाशित) मूळ रूप या कवितेत असल्याचे जाणवते. त्यांचा ‘हंस अकेला’ (१९९७) कथासंग्रह खूप गाजला, तो कथांच्या वेगळेपणामुळे. ‘आंधळ्यांच्या गायी’ (२०००) हा दुसरा कथासंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. समाज, कुटुंबरचना, संस्कृतिमूल्ये, नैतिकता आणि व्यक्तिमन यांत गुरफटणारे, धडपडणारे नातेसंबंध वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कथांत येतात. हे संबंध थेट आणि धीटपणे त्या मांडतात. संडासाच्या (शौचकूपात) भांड्यात अडकलेले चिमणीचे पिल्लू यासारख्या प्रतिमा घेऊन, दैनंदिन व्यवहारातील मध्यमवर्गीय जीवनाचे तपशील घेऊन, त्या व्यक्तिमनाचा आणि जगण्याचा घटनापट कथा-कादंबरीतून मांडतात. ‘आई’पणाचे आदर्शत्व झुगारून एखादी स्त्री आपल्या मुलीच्या लैंगिक सुखाचा हेवा करते. असे सांस्कृतिक धक्के आणि मनवर्तनाचे वास्तव त्यांच्या कथा-कादंबर्‍यांत बंदिस्तपणे उभे राहते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीची ही एक प्रभावशाली लेखिका आहे. त्यांना ‘प्रियदर्शनी’ पुरस्कार, ‘भैरू रतन दमाणी’ पुरस्कार त्यांना  प्राप्त झाला आहे.

- प्रा. सुहासिनी कीर्तिकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].