Skip to main content
x

पळशीकर, वसंत विष्णु

      हैद्राबादला आर्किटेक्ट म्हणून नोकरी करणाऱ्या विष्णुपंत पळशीकर यांचे हे चिरंजीव. विष्णुपंतांना तीन अपत्ये-दोन मुली व एक मुलगा. गांधीजींच्या विचाराला जोडलेले हे कुटुंब. या कुटुंबात हैद्राबाद येथे वसंतराव यांचा जन्म झाला. वसंतराव यांना दोन बहिणी. त्यामधील मोठी बहीण उत्तर प्रदेशात डॉक्टर असून ग्रामीण विकासाचे काम करते. तर धाकटी बहीण हैद्राबाद येथे शिक्षिका होती. आईची हैद्राबाद येथे बालवाडी होती.

      सर्व जाती धर्माची मुले या बालवाडीत शिक्षणासाठी येत. हीच त्या बालवाडीची खासियत होती. सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वारसा वसंतरावांना त्यांच्या आईकडूनच मिळाला. वसंतरावांच्या शिक्षणाचा प्रारंभ या बालवाडीतून झाला.

       प्राथमिक शिक्षण हैद्राबाद येथे ‘विवेक वर्धिनी’ या  महाराष्ट्रीयन शाळेत आले. ५ वी ला ते अहमदनगरला झाले. ५ वी ते ८ वी नगरला सोसायटी विद्यालय (आत्ताचे फिरोदिया) मधे, तर ९ वी चे एक वर्ष मॉडर्न महाविद्यालय पुणे येथे व पुन्हा १०, ११ वी नगरला सोसायटी विद्यालयामध्ये झाले. वडिलांच्या नोकरी निमित्ताने महाविद्यालयीन शिक्षण पुन्हा हैद्राबाद येथे झाले. इंटर सायन्स झाल्यानंतर ते शिकत होते पण त्यांच्या मनात वेगळेच होते.

     सहा महिने शेतकी महाविद्यालयात काढले. त्यांचे मन शिक्षणात नव्हतेच. औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकून ते विनोबांच्या ‘भूदान’ चळवळीत सामील झाले. गावोगावी फिरणे यामधून त्यांना भारताचे वास्तव रूप समजले. ‘भूदान’ चळवळीतही ते फार काळ टिकले नाहीत. ‘स्थिरता’ हा त्यांचा स्वभाव नव्हता. इथंपासून त्यांच्या खऱ्या अनौपचारिक शिक्षणाला प्रारंभ झाला. सर्वोदय चळवळ, भूदान व साधना साप्ताहिक या ठिकाणी विविध अनुभवांची कामे करायला मिळाली. यातूनच त्यांच्या मनाची खरी जडण-घडण झाली. अभियांत्रिकी, वैद्यकीय या अभ्यासाऐवजी ते समाज अभ्यासक झाले. माणसं वाचायला शिकले. याच वेळी त्यांनी पुण्यामध्ये समाज प्रबोधन संस्थेचे काम सुरू केले. हे कार्य करत असताना वसंतरावांचा संबंध शंकरराव देव, देवदत्त दाभोळकर, ग. प्र. प्रधान, भालचंद्र भणगे, अ.भि. शहा, अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, रावसाहेब पटवर्धन, साने गुरुजी, यदुनाथ थत्ते या व्यक्तींशी आला. तो पुढे दृढ झाला व तत् संबंधीच्या कार्यात ते गढून गेले. त्या काळी ‘भूदान’ हे रावसाहेब पटवर्धनांचे मासिक अत्यंत प्रसिद्ध व गाजलेले होते. त्या अंकात रावसाहेब पटवर्धनांचे मुख्य लेखनिक म्हणून वसंतराव पळशीकर होते. आजही त्यांच्या स्वभावात या व्यक्तींच्या विचारांचा ठसा आहे. 

      समाज प्रबोधन पत्रिकेचे काम करता करता त्यांचा संबंध ‘नवभारत’ या मासिकाशी आला व या ठिकाणी म्हणजे वार्ईला ते मे. पु. रेगें यांच्याबरोबर काम करू लागले. सुमारे एक तप म्हणजे १२ वर्षे ते नवभारतचे काम करत होते. हे काम करत असताना त्यांचे वाचन अखंड सुरू होते. विशेषत: वृत्तपत्रातील अग्रलेखांचे वाचन हा त्यांचा आवडता छंद. परिसर संस्था, पर्यावरणाविषयी सम्यक दृष्टी व शिक्षणाच्या कामात त्यांना अधिक रस होता. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेला ते कामगार निर्माण करणाऱ्या शाळा म्हणत. आपली संस्कृती, आपले शिक्षण, आपले विचार हे सगळे इंग्रजांच्या काळात पुसले गेले असे त्यांचे स्पष्ट विचार होते. आपल्याला याचा नव्याने विचार करावा लागेल या भावनेने वसंतराव यांनी माजी शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर व विद्या पटवर्धन यांच्या सहकार्याने कै. नाना नारळकर न्यासाच्या माध्यमातून शिक्षकांसाठी शिबिरे घेण्याचे काम सुरू केले. दोन-तीन शिबिरांनंतर समविचारी व्यक्तींचा गट एकत्रित आला व त्यामधून ‘अक्षरनंदन’ या शाळेचा जन्म झाला. या शाळेच्या व्यवस्थापनाशी वसंतराव शेवटपर्यंत निगडीत होते.

        इंग्रजी वाचन व चित्रपट पाहणे हे त्यांचे आवडते छंद होते. मार्क्सवाद, गांधीवाद, समाजवाद किंवा हिंदुत्ववादी या कोणत्याही विचारात वसंतरावांचा स्वभाव बसत नाही ‘स्वयंसेवी संस्थांचे अधिष्ठान’ पक्के करणे हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र. त्यासाठी सातत्याने विचारांचे खंडण-मंडण करणे, क्षेत्र भेटी व त्यामधून क्षेत्र अभ्यास करणे, वैचारिक प्रबोधन करणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख सूत्र, दिशा होते असे म्हणतात.

      ‘सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण’ हे त्यांचे गाजलेले पुस्तक.‘विकासाची व्याख्या आणि विकासाचा मार्ग’, तसेच ‘विकास आणि तारतम्य’ हे त्यांचे गाजलेले लेख. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार दिला गेला व विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण कधीच नसते त्यामुळे व्यक्तीला पुरस्कार, सन्मान, पारितोषिके देणे या विचारसरणीच्या ते विरोधी आहेत त्यामुळे त्यांनी अनेक पुरस्कार-सन्मान नाकारलेले आहेत. अमृत महोत्सवी वर्षाकडे त्यांचा प्रवास सुरू आहे. आजही शिक्षणाविषयी त्यांचे चिंतन सुरू आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पाँडेचरी, गोवा, केरळ आणि महाराष्ट्र या दक्षिणेकडील राज्यांमधल्या ५० कृतिशील शैक्षणिक कार्यकर्त्यांचा गट म्हणजे ‘नेटवर्क’ आहे. वसंतराव हे याचे प्रमुख आधारस्तंभ व मार्गदर्शक होते. वयाच्या ८० व्या वर्षी नाशिक इथं त्यांचं निधन झालं. 

        - डॉ. अ. ल. देशमुख

पळशीकर, वसंत विष्णु