Skip to main content
x

पलुसकर, दत्तात्रेय विष्णू

गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर आणि रमाबाई यांचे हे बारावे अपत्य. दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांचा जन्म कोल्हापूरजवळील कुरुंदवाड या संस्थानात झाला. पं. विष्णू दिगंबरांच्या महान कार्याचा आणि संगीतकलेचा वारसा दत्तात्रेयांना जन्मजात लाभला. दहा महिने झाल्यानंतर त्यांच्या आई रमाबाई त्यांना नाशिकला घेऊन आल्या. वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षीच पंडितजींनी त्यांना गाणे शिकविण्यास सुरुवात केली. पण कार्यबाहुल्यामुळे व सततच्या फिरतीमुळे पंडितजींनी पं. चिंतामणराव पलुसकर या आपल्या पुतण्याला त्यांस संगीत शिकविण्यास  सांगितले. १९३५ पर्यंत दत्तात्रेय पलुसकरांचे चिंतामणरावांकडे  संगीत शिक्षण सुरू होते. पंडितजींचा मुक्काम जेव्हा नाशिकमध्ये असेल, तेव्हा तेही त्यांना शिकवत असत. गायनाबरोबर पलुसकरांचे शालेय शिक्षणही सुरू होते. पलुसकरांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये व नंतर पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. चिंतामणरावांनी बापूरावांना (दत्तात्रेयांना) तीन-साडेतीनशे चिजा व चाळीस -पन्नास राग चांगल्या तर्‍हेने शिकविले. ख्यालगायनातही त्यांची प्रगती झाली होती.
संगीताच्या पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आई त्यांना घेऊन मुंबईस पं. नारायणराव व्यासांकडे आल्या. त्यांच्याकडे तीन वर्षे शिक्षण झाले; परंतु नारायणराव व्यासांना मैफलीच्या निमित्ताने अनेक वेळा दौर्‍यावर जावे लागत असल्यामुळे पुण्यात विनायकबुवा पटवर्धनांकडे जाण्यास त्यांच्या आईंना सुचवले. पुण्यात विनायकबुवांकडे बापूरावांचे संगीत शिक्षण सुरू झाले. याच वेळी गांधर्व महाविद्यालयात ते शिकवीतही असत. तसेच पं. यशवंतबुवा मिराशी यांच्याकडे व मुंबईला येऊन पं. केशवराव दातार यांच्याकडूनही त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले.
जालंधरच्या हरवल्लभ मेळाव्यात १९३५ मध्ये बापूराव पलुसकरांचे पहिल्यांदाच स्वतंत्र गायन झाले. या गायनामुळे त्यांची बरीच प्रसिद्धी झाली व त्यांना अहमदाबाद, कलकत्ता इत्यादी संगीत परिषदांतून गाण्याची आमंत्रणे येऊ लागली. त्यांचे २१ ऑगस्ट १९३८ रोजी मुंबई रेडिओ (आकाशवाणी) केंद्रावर गाणे झाले व त्यानंतर त्यांना रेडिओवर नियमित कार्यक्रम मिळू लागले.
ते १९४३ पर्यंत पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात नियमित शिकवीत असत. मात्र त्यानंतर निरनिराळ्या संगीत परिषदेसाठी, तसेच आकाशवाणीवर गाण्यासाठी वारंवार जावे लागत असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या व भजनाच्या ध्वनिमुद्रिका १९४४ पासून निघू लागल्या. या ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांचा विवाह १९४४ मध्येच  झाला.
बापूरावांचे शिक्षण पूर्णपणे पलुसकर पठडीतले झाले, तसेच त्यांच्यावर यशवंतराव मिराशीबुवांकडून बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या गायनाचेही संस्कार झाले होते. त्यांचा आवाज अत्यंत भारदस्त व गोड असल्यामुळे त्यांना अतिशय प्रासादिक आणि निर्मळ आवाज  लाभला होता. बोलअंगाचे आलाप व स्वच्छ तान व पद्धतशीर गायन या त्यांच्या अंगभूत गुणांचे वर्णन करताना सुप्रसिद्ध संगीतज्ञ डॉ. अशोक दा. रानडे म्हणतात, ‘‘बापूरावांचं गाणं निर्मळ झर्‍यासारखे. पाण्यातून तळ दिसावा तसं आवाजातून गाणं कळावं अशी त्यांची गायकी होती.’’ आम राग गाण्यावरच बापूराव पलुसकरांचा अधिक भर होता.
शास्त्रोक्त संगीताबरोबरच पलुसकरांनी भजनेही अतिशय भावपूर्ण म्हटली आहेत. ‘रघुपती राघव राजाराम’, ‘पायोजी मैंने’, ‘ठुमक चलत रामचंद्र’ यांसारखी त्यांची भजनेही लोकप्रिय झाली. या सर्व भजनांच्या चाली पं. विष्णू दिगंबरांच्या आहेत. संगीतकार नौशाद यांचे संगीत असलेल्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटात  बैजूसाठी बापूरावांनी आवाज दिला होता. भारत सरकारच्या सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळाचे एक सदस्य म्हणून चीनच्या दौर्‍यासाठी १९५५ साली त्यांची निवड झाली होती.
त्यांच्या शिष्यवर्गात कमल केतकर, शरद साठे, शरद आपटे, कालिंदी केसकर, शांता हेमाडी यांची नावे प्रामुख्याने येतात. ‘श्री’, ‘हमीर’, ‘केदार’, ‘यमन’, ‘गौडसारंग’ इत्यादी रागांमधील त्यांचे ध्वनिमुद्रित गायन, तसेच त्यांच्या भजनांच्या ध्वनिमुद्रिका पलुसकरांच्या निर्मळ व प्रासादिक आवाजाची व पद्धतशीर गायनाचा अजूनही आनंद देतात. वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

मधुवंती पेठे

पलुसकर, दत्तात्रेय विष्णू