Skip to main content
x

पंडित, भवानीशंकर श्रीधर

      वानीशंकर पंडित यांचा जन्म वाई येथे झाला. त्यांचे सर्व शिक्षण नागपूरला येथे झाले. नागपूर व चंद्रपूरला शिक्षक आणि नंतर हिस्लॉप कॉलेज, विदर्भ महाविद्यालय, अमरावती आणि नागपूर विद्यापीठ येथे मराठीचे प्राध्यापक व नागपूर विद्यापीठाचे पाहिले मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कारकीर्द विदर्भातच झाली.

समीक्षक म्हणून मराठी समीक्षाक्षेत्रात भवानीशंकर पंडितांचे नाव महत्त्वाचे आहे, ते एका विशिष्ट परिप्रेक्षात. आधुनिक मराठी काव्य हा त्यांच्या कुतूहलाचा आणि चिंतनाचा विषय होता. ‘आधुनिक मराठी कविता’ (१९५२), ‘समग्र केशवसुत’ (१९६१), ‘केशवसुत पाच चिंतनिका’ (१९६१), ‘संत समागम’ (१९६१), ‘संचय’ (१९६९) असे त्यांचे समीक्षा ग्रंथ आहेत. ‘महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे’ हा समीक्षाग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण आहे. तसाच ‘आधुनिक कवितेचे प्रणेते’ (भाग १,२) हा समीक्षाग्रंथही प्रसिद्ध आहे. ‘पिचलेला पावा’ (१९३३), ‘उन्मेष आणि उद्रेक’ (१९५०), ‘सुवास आणि रस’ (१९५३) हे त्यांचे काव्यसंग्रह रसिकांसाठी तर ‘बीजेची कोर’, ‘पूर्णिमेचे चांदणे’, ‘सदाफुली’ हे काव्यसंग्रह त्यांनी लहान मुलांसाठी लिहिले.

१९५२ साली खामगाव (विदर्भ) येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या भवानीशंकर पंडित यांचे नाव टीकाशास्त्रज्ञांत अतिशय महत्त्वाचे आहे. समीक्षेइतकेच त्यांचे काव्यप्रेम आणि कवितारचना हे महत्त्वाचे घटक आहेत.

- डॉ. सुवर्णा दिवेकर

पंडित, भवानीशंकर श्रीधर