Skip to main content
x

परांजपे, हरी पुरुषोत्तम

              री पुरुषोत्तम परांजपे हे रँग्लर परांजपे यांचे भाऊ. त्यांना भाऊ याच नावाने ओळखत असत. १९१९ला मेसापोटेमियामधील बगदाद बसरा येथे फळबाग तज्ज्ञ म्हणून भाऊ गेले होते. त्याचप्रमाणे त्यांनी कलकत्ता, गोवा, जंजिरा येथेसुद्धा फळबाग तज्ज्ञ म्हणून काम केले.

              भाऊंनी ‘फळझाडांचा बाग’ हे पुस्तक मराठीतून लिहिले (१९२३). या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या काढल्या. अनेक शेतकी महाविद्यालयांमधून या पुस्तकाला मागणी येत असे. नवीन आवृत्ती काढण्यासाठी त्यांनी प्रत्येक पानानंतर एक कोरा कागद घालून पुस्तक बाइंड करून घेतले हो़ते. नवीन उपयुक्त माहिती कळली की, त्यासंबंधीच्या पानाजवळील कोऱ्या पानावर ती लिहीत असत. याचा नवीन आवृत्ती काढताना फार उपयोग होत असे. तसेच त्यांनी १९३२मध्ये निझाम संस्थानांसाठी (हैदराबाद) फळबाग विकास निरनिराळ्या भागात कसा राबवता येईल व कुठल्या पिकास प्राधान्य द्यावे याचा अहवाल १९३० ते १९३२ या काळात सर्वेक्षण करून सादर केला. याचा त्या भागातील शेतकऱ्यांना उपयोग झाला.

              पुण्यात रेशनच्या धान्याबरोबर अमेरिकेतून कॉंग्रेस गवताचे बी रुजून पुणे व महाराष्ट्रात सर्वत्र पसरले. या वनस्पतीमुळे अंगाला अतिशय खाज सुटते. भाऊंनी कृषी महाविद्यालयाच्या हर्बेरिअममध्ये जाऊन त्याचे नाव पार्थोनियम हे शोधून काढले. निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी या वनस्पतींविषयी त्यांनी अनेक ठिकाणी लेख लिहिले. या वनस्पतीचा नाश करण्यासाठी ती फुलोऱ्यावर येण्याआधीच उपटून जमिनीत पुरून टाकावी, नाही तर गुरांसाठी चारासुद्धा परदेशातून विकत आणावा लागेल, असा प्रचार केला. कोकणात बांड रोगामुळे सुपारीच्या झाडांचे नुकसान होत असे. डॉ. जोशी व भाऊंनी यावर झाडाला मोरचूद घालायचा उपाय शोधून काढला. भाऊंनी कोकणात गोबर गॅससाठी खूप प्रचार केला. आपल्या मूळ घरात मुर्डीला भास्कर परांजपे, दुसरीकडे केशव परांजपे यांनी अशी संयंत्रे बसवली आणि लोकांना त्याचा फायदा दिसू लागला. तसेच मुर्डीच्या शाळेला त्यांनी देणगी, पुस्तके व पैसे दिले. ते महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसचे संस्थापक सदस्य होते. एम्प्रेस गार्डन फुलांचे प्रदर्शन, तसेच सकाळच्या फळे-भाजीपाला प्रदर्शनात ते तज्ज्ञ म्हणून अनेक वर्षे जात. गोपिकाश्रमांत त्यांनी लावलेल्या डोंगरी आवळ्याची मोठे व उत्तम आवळे असलेली फांदी अनेकदा प्रदर्शनात ठेवली गेली आणि त्याला बक्षिसेसुद्धा मिळाली होती.

        - अभिमन्यू हरी परांजपे

परांजपे, हरी पुरुषोत्तम