Skip to main content
x

परांजपे, झेलम अविनाश

पूर्वाश्रमीच्या झेलम वर्दे म्हणजेच आताच्या झेलम परांजपे यांचे आईवडील हे दोघेही समाजसेवा करणारे कार्यकर्ते होते. त्यांच्या आईचे नाव सुधा आणि वडिलांचे नाव सदानंद शंकर वर्दे. लहानपणी वसंत बापट व रमेश पुरव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्र सेवा दलातून अनेक नृत्यनाटिकांत काम केले. झेलम वर्दे यांनी १९७७ साली स्टॅटिस्टिक्समध्ये एम.एस्सी. केले. ‘भारत दर्शन’, ‘महाराष्ट्र दर्शन’, ‘शिव दर्शन’ आणि ‘आजादी की जंग’ या राष्ट्र सेवा दल पथकाच्या अनेक प्रयोगांत त्यांनी काम केले. १९७७ साली त्यांनी गुरू शंकर बहेरा यांच्याकडे ओडीशी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली.
त्या अविनाश मुकुंद परांजपे यांच्याशी १९७९ साली विवाहबद्ध झाल्या. गुरू पद्मविभूषण केलुचरण महापात्र यांच्याकडे झेलम १९८० पासून ओडीशी नृत्य शिकू लागल्या. गुरू केलुचरण महापात्रांच्या मार्गदर्शनाखाली ओडीशी शिकणे आणि कार्यक्रम करणे हे १९८३ ते २००४ पर्यंत चालू राहिले.
त्यांच्या नृत्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कार्यक्रम केले. उदा. केलुचरण महापात्र पुरस्कार सोहळा, खजुराहो महोत्सव, कोणार्क महोत्सव, दशहरा महोत्सव, एलिफन्टा उत्सव, कालाघोडा महोत्सव, एलोरा महोत्सव, हंपी महोत्सव इ. ‘नृत्यप्रभा’ या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर त्यांनी ओडीशी नृत्य केले. त्या दूरदर्शनच्या प्रथम श्रेणीच्या कलाकार आहेत आणि अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, उदा. २००९ चा ‘विद्या विभूषण’ पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा २००८ सालचा सांस्कृतिक पुरस्कार, २००५ साली ‘संजुक्ता पाणिग्रही’ राष्ट्रीय पुरस्कार. २००१ सालचा ‘महारी’ पुरस्कार त्यांना ओडीशी नृत्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्याबद्दल मिळाला. भीमसेन जोशी यांच्या हस्ते १९९९ चा ‘कुमार गंधर्व’ पुरस्कारही त्यांना मिळाला. आपली बालपणीची मैत्रीण अभिनेत्री स्व. स्मिता पाटील हिच्या स्मरणार्थ साने गुरुजी आरोग्य मंदिराची नृत्यशाखा म्हणून १९८९ साली त्यांनी ‘स्मितालय’ ही ओडीशी नृत्याची संस्था सुरू केली. झेलम परांजपे स्मितालयात १९८९ पासून ओडीशी नृत्य शिकवताहेत. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण नृत्यरचना केल्या आहेत. हुंडाबळी, शिशुकन्या, स्त्री—शिक्षण अशा सामाजिक विषयांबरोबरच ओडीशी नृत्यातील पारंपरिक रचनाही त्यांनी प्रस्तुत केल्या आहेत.
त्यांनी गणिताचार्य भास्कराचार्यांची कन्या ‘लीलावती’(१९९९) ही नृत्यनाटिका बसवली. तर  हिंदी सिनेमा संगीतावर ‘रसमंजिरी’ (२०००),  ‘कुमारसंभवम्’ (२००१) , कालिदासांच्या काव्यांवर ‘उमा’, ‘नर्मदा’ (२००३), हिंदीतील नवीन व जुन्या गाण्यांवर ओडीशी नृत्य हा आधार घेऊन ‘बॉलिवुड हंगामा ओडीशी इस्टाइल’(२००५), ‘स्त्री’ (२००६), ‘पाणी वाचवा’ या विषयावर ‘जलश्री’ (२००८)  व  ‘मेघदूत’ (२००९) हा नेहरू  सेंटरसाठी असे अनेक कार्यक्रम, नृत्यनाटिका त्यांनी केल्या आहेत. स्त्री-शिक्षणावर त्यांनी ‘सावित्री वदते’ (२०१०) हे नृत्यनाट्य प्रेक्षकांसमोर आणले.
दरवर्षी ८ मार्चला ‘स्मितालय’ ही संस्था आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने स्त्रीविषयक अनेक कार्यक्रम सादर करते. झेलम परांजपे यांनी अमोल पालेकर दिग्दर्शित ‘दायरा’, राजेन्द्र तालक दिग्दर्शित ‘सावली’ या चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘ज्याचा त्याचा विठोबा’ या नाटकाचेही नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले आहे. भारताबरोबरच रशिया, कॅनडा, अमेरिका, इटली, स्कॉटलॅण्ड, आयर्लॅण्ड, चीन, हवाई अशा देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत.

अंकुर बल्लाळ

परांजपे, झेलम अविनाश