Skip to main content
x

परांजपे, रघुनाथ पुरुषोत्तम

पुरातन धार्मिक ग्रंथांचे पुन:पुन्हा वाचन करणारे म्हणजे पारायण जप्येम्हणून परांजपे कुलनाम असलेल्या आणि शेती व पिढीजात भिक्षुकीचा व्यवसाय करणाऱ्या घरात परांजपे यांचा जन्म झाला. त्यांना दीर्घायुष्याचा वारसा आईवडिलांकडून, तर शारीरिक व मानसिक क्षमतेचा वारसा आईकडून मिळाला. परांजपे यांच्या घराण्यात वेदाभ्यासाची परंपरा असल्याने चौथ्या इयत्तेनंतर मुलाला वैदिक शिक्षण देण्याचे त्यांच्या वडलांनी ठरविले होते. परंतु अभ्यासात मुलाची प्रगती उत्तम असल्यामुळे त्याला इंग्रजी विद्या शिकू द्या, असा शाळेच्या मास्तरांनी आग्रह धरल्याने परांजप्यांची शाळा चालू राहिली. पुढे त्यांचे आतेभाऊ भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्या शिक्षणात रस घेतला म्हणूनच ते दापोली व मुंबईतील शालेय शिक्षणानंतर पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेऊ शकले. शाळेत तसेच बी.एस्सी.पर्यंतच्या प्रत्येक परीक्षेत ते सतत पहिला वर्ग आणि गणितात पहिला क्रमांक मिळवीत गेले.  

मुंबईला माध्यमिक शाळेमध्ये असतानाच त्यांना पाठ्यपुस्तकेतर वाचनाची सवय लागली होती. त्यात इतिहास, मेकॉलेचे निबंध, मिलचे सबजेक्शन ऑफ विमेन’, स्पेन्सरचे एज्युकेशनअशी पुस्तके असत, तर फर्गसन महाविद्यालयात आल्यावर ना. गोपाळकृष्ण गोखले, प्रा. भानू, प्रा. वासुदेवराव केळकर इत्यादी व्यासंगी प्राध्यापकांचा त्यांच्यावर जो प्रभाव पडला, त्यामुळे वर्गातल्या विषयांशी संबंधित स्कॉटच्या इतर कादंबऱ्या, ‘लाइफ ऑफ स्कॉट’, ‘हिस्टरी ऑफ रोम’, ‘हिस्टरी ऑफ बॉटनी अँड फिजिऑलॉजी ऑफ प्लांट्स’, डार्विनचे ओरिजिन ऑफ स्पेसीज’, अशी अवांतर पुस्तके वाचण्याची लागलेली ही सवय केंब्रिजच्या विद्यार्थिदशेतदेखील त्यांना उपयोगी पडली.

परांजपे बी.एस्सी. झाले त्या वर्षी लगोलग त्यांना विलायतेला जाण्यासाठी हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती मिळणार नव्हती. म्हणून त्यांनी इंटर आर्ट्स होण्यात व फर्गसन महाविद्यालयाने दिलेल्या विद्यावृत्तीच्या मोबदल्यात इंटरला गणित शिकवण्यात एक वर्ष व्यतीत केले. नंतर, १८९६ साली जेव्हा त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा आपल्या महाविद्यालयातल्या कोणाही विद्यार्थ्याला यापूर्वी इंग्लंडला जाण्याची अशी संधी मिळाली नव्हती म्हणून महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष तर केलाच, आणि ते मुंबईला जाण्यास निघाले तेव्हा वसतिगृहातील १०० विद्यार्थ्यांनी पुण्यापासून खडकीपर्यंत त्यांच्यासोबत रेल्वेने प्रवास करून त्यांना हार्दिक निरोप दिला.

केंब्रिज विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमाला मॅथेमॅटिकल ट्रायपॉसम्हटले जाते, त्यासाठी परांजपे यांनी १८९६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात सेंट जोन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा या अभ्यासक्रमाचे दोन भाग होते. पैकी परांजपे यांच्या काळात, पहिल्या भागात विशेष प्रावीण्यासह (ऑनर्स) उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी लावून पहिला क्रमांक मिळविणाऱ्या उमेदवाराला सीनियर रँग्लरही उपाधी मिळे. म्हणून निकालाच्या यादीत जास्तीत जास्त वरचा क्रम, विशेषत: पहिला क्रमांक मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची आपापसात तीव्र चढाओढ असे, आणि वर्गातील व्याख्यानांव्यतिरिक्त महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकांकडून सखोल तयारी करवून घेण्यासाठी खाजगीरीत्या खास मार्गदर्शन घेण्याची अत्यंत आवश्यकता असे. तसे मार्गदर्शन परांजपे यांनी वेब नावाच्या प्राध्यापकांकडून घेतले होते. पुढे विद्यापीठाने १९०९ सालापासून क्रमवारी लावण्याची प्रथा बंद केली.

परांजपे यांच्या वेळी ट्रायपॉसच्या पहिल्या भागात प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन तासांच्या १४ प्रश्‍नपत्रिका द्याव्या लागत. पहिल्या चार दिवसांत शुद्ध व उपयोजित गणिताच्या प्राथमिक भागावर सात प्रश्‍नपत्रिका तर उरलेल्या सात आणखी चार दिवसांत त्याच विषयांत प्रगल्भ अभ्यासावर द्यावयाच्या, अशी विभागणी असे. मात्र एक आठवड्यानंतर पहिल्या परीक्षेत प्रावीण्य संपादन करतील तेवढेच विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेत बसण्यास पात्र धरले जात. दोन्ही परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका प्रदीर्घ असत. अशा स्थितीत ज्याची तयारी उत्कृष्ट, तोच मोठया मुश्किलीने त्यातील सगळे सैद्धान्तिक प्रश्‍न सोडवू शके आणि त्याखालच्या उपप्रमेयांवरील उदाहरणांवर विचारमंथन करून ती सोडवायला जेमतेम वेळ उरत असे. परिणामी, अत्यंत हुशार विद्यार्थ्यांचेसुद्धा प्रश्‍नपत्रिकेतील काही प्रश्‍न सोडवून होत नसत. त्याशिवाय, प्रत्येक भागात शेवटची प्रश्‍नपत्रिका वीस अवघड उदाहरणांची असे आणि ती ज्याला पूर्णपणे सोडविता आली, असा एकही विद्यार्थी ट्रायपॉस परीक्षेच्या इतिहासात तोपर्यंत तरी न आढळल्याचे परांजपे यांनी नमूद केले आहे. खुद्द परांजपे या  प्रश्‍नपत्रिकेतील फक्त सहाच उदाहरणे सोडवू शकले होते.

एवंगुणविशिष्ट ट्रायपॉस परीक्षेचा प्रावीण्यासह पहिल्या भागाचा निकाल १३ जून १८९९ रोजी लागला आणि यशस्वी उमेदवारांच्या क्रमवारीत परांजपे यांच्याबरोबर जॉर्ज बर्टविसल हा गोराविद्यार्थीदेखील त्यांच्या तोडीचा निघाल्याने, विद्यापीठाने दोघांनाही पहिला क्रमांक देऊन त्या स्थानाचे सीनियर रँग्लरहे अभिधान विभागून दिले. यानंतर ज्यांना गणिताच्या एखाद्या भागात विशेषज्ञता मिळवायची असेल, असे रँग्लर ट्रायपॉसच्या दुसऱ्या भागासाठी प्रवेश घेत असत. १९०० साली दिलेल्या या भागाच्या परीक्षेतही पहिल्या वर्गात येण्याचा आपला रिवाज परांजपे यांनी सोडला नाही.

सीनियर रँग्लर ही उपाधी मिळवून हिंदी लोकदेखील पाश्चात्त्यांच्या तुलनेत बुद्धिमत्तेत यत्किंचितही कमी नाहीत हे दाखवून देणारा परांजपे यांचा हा विक्रम त्रिखंडात गाजला आणि त्याचे तेजोवलय त्यांच्या चेहऱ्याभोवती आजन्म राहिले व त्यामुळे त्यांना उच्चपदांचे विविध मानसन्मान मिळत गेले.

परांजपे यांच्या नेत्रदीपक यशाने लॉर्ड कर्झनसारख्या करड्या व्हाइसरॉयनेदेखील त्यांच्या अभिनंदनाप्रीत्यर्थ फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तार पाठविली आणि तोपर्यंत ज्या जागा फक्त इंग्रजांसाठी राखीव ठेवल्या जात असत अशांपैकी इंडियन एज्युकेशन सर्व्हिसमधील मोठ्या पगाराची एक जागा हिंदुस्थान सरकारने परांजप्यांना देऊ केली होती. परंतु विलायतेला जाण्यापूर्वी परांजपे आजीव सेवक म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी बांधले गेलेले असल्यामुळे संस्थेने जरी त्यांना या बंधनातून मोकळे करण्याची तयारी दाखविली, तरी परांजपे यांनी फर्गसन महाविद्यालयातच राहण्याचा निश्चय कायम ठेवून आपला शब्द फिरवला नाही. स्वाभाविकपणे त्यांच्या या  कृतीने सर्व  ज्येष्ठ आजीव सदस्यांनी एकमताने रँ. परांजपे यांची १९०२ साली, वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती केली.

वीस वर्षांहून अधिक काळ फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य, तीन वर्षे पुणे नगरपालिकेचे निर्वाचित सभासद (१९१४-१९१७), दहा वर्षांहून अधिक काळ (१९१३-२३/२६) मुंबई कायदे कौन्सिल्सचे सभासद, पैकी तीन वर्षे (१९२१-१९२३) मंत्री, करविवेचन व इतर सरकारी समित्यांचे सभासद (१९२४-१९२७), लंडन येथे इंडिया कौन्सिलचे सभासद (१९२७-१९३२), लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू (१९३२-१९३८) ऑस्ट्रेलियात भारताचे पहिले उच्चायुक्त (१९४४-१९४७), पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९५६-१९५९) अशी अनेक सन्माननीय पदे परांजपे यांनी भूषविली.

तसेच त्यांना पुढील सीनियर रँग्लर झाल्याने सेंट जोन्स महाविद्यालयाने १९०१ साली सहा वर्षांसाठी फेलोम्हणून त्यांची निवड केली, तर १९४५ साली त्याच महाविद्यालयाने मानद फेलो म्हणून त्यांचा बहुमान केला. परांजपे दिवंगत झाले तेव्हा या सेंट जोन्स महाविद्यालयाने आपले निशाण अर्ध्यावर उतरवून त्यांना आदरांजली वाहिली.

फर्गसन महाविद्यालयात गणित शिकवताना निरनिराळ्या दृष्टिकोनातून प्रश्‍नाकडे कसे पाहावे, त्याचा विचार कसा करावा, तो सोडविण्यासाठी कशी झटापट करावी ते विशद करून ते मुलांच्या विचारांना चालना देत आणि केंब्रिज पद्धतीने शक्यतो मुलांकडूनच उत्तरे काढून घेत असत. अगदी नाइलाज झाला तरच स्वत: उत्तरे सांगत. त्यांच्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळे उदाहरणांची उकल करणेच नव्हे, तर जीवनात पुढे येणाऱ्या समस्यांशी सामना करून कसा मार्ग काढावा, याचेच शिक्षण विद्यार्थिवर्गाला मिळत असे. शिवाय गणिताचा जो भाग वर्गात शिकवला जाई, त्याचा इतिहास अथवा पार्श्वभूमी सांगून मुलांच्या मनात त्या विषयासंबंधी ते कुतूहल निर्माण करीत असत. थोडक्यात गणिताचे प्राध्यापक आणि फर्गसनचे प्राचार्य या भूमिका निभावताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांचे खरे शिक्षण केले.

गणितावरील पाठ्यपुस्तके लिहिण्यात स्वतंत्र बुद्धीला व स्वकर्तृत्वास वाव कमी असतो आणि त्यात इतर लेखकांच्या पुस्तकातील मजकुरांची फेरजुळणी अथवा उचलेगिरी केली जाते, म्हणून ते कधी पाठ्यपुस्तके लिहिण्याच्या फंदात पडले नाहीत. त्याऐवजी पाश्चात्त्य नियतकालिकांतून येणाऱ्या गणिताच्या नवनवीन दालनात होणाऱ्या प्रगतीची ते माहिती करून घेत असत. मात्र, हिंदी गणितशास्त्राचा इतिहास लिहिण्याचा त्यांचा संकल्प होता. त्यासाठी ते संस्कृतचा अभ्यासही करत होते. परंतु, कॉलेज व सोसायटीच्या कारभारातील गुंतवणूक आणि वेळोवेळी अंगावर पडलेल्या विद्यापीठीय व शासकीय जबाबदाऱ्या यांमुळे त्यांना लेखनासाठी वेळ काढता आला नाही. त्याचबरोबर, देशात उच्चशिक्षणाचा प्रसार करणे महत्त्वाचे आहे, हा ना. गोखले यांचा उपदेश पटल्यामुळे, गणितात पुढे काही भरघोस कृती करण्याची ईर्षा आणि वकूब असून प्राचार्यपदाची धुरा सांभाळून महाविद्यालयाचाच उत्कर्ष करण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वशक्ती खर्ची टाकल्या आणि फर्गसन महाविद्यालयाची इतकी प्रगती केली, की पुण्याबाहेरचे विद्यार्थीसुद्धा फर्गसनमध्ये नाव घालण्यास आतुर असत. विशेषत: परांजपे यांच्या गणितातील कीर्तीमुळे खास गणिताच्या अभ्यासासाठी फर्गसनमध्ये दाखल होऊन पुढे रँग्लर झालेल्या ग.स. महाजनी, न.म. शहा, शिवेश्‍वरकर यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल.

फर्गसन महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतल्यापासूनच परांजपे यांच्या तल्लख बुद्धिमत्तेची ना. गोखले यांना जाणीव झाली. त्यामुळेच ते परांजप्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले. त्यांच्याकडून निबंध लिहून घेऊन त्यांना ते तपासून देऊ लागले, अभ्यासाला पूरक अशी कोणती पुस्तके वाचावीत, ते सांगू लागले. अशी हळूहळू गोखल्यांशी जवळीक निर्माण झाली, म्हणूनच गणिताच्या पुढील अभ्यासासाठी परांजपे यांना विलायतेला जाण्याची संधी मिळावी, म्हणून त्यांच्या हुशारीची न्या. रानडे यांच्याजवळ तारीफ करून त्यांना हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती रानड्यांच्या शिफारशीने मिळवून देण्यात गोखले यांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थिदशेत आणि पुढे फर्गसनचे प्राचार्य झाल्यावर परांजप्यांना गोखल्यांचा जो सहवास घडला, त्यामुळे त्यांच्या मनावर गोखल्यांच्या नेमस्त अथवा उदारमतवादी राजकीय मतप्रणालीचा प्रभाव पडला. परंतु गोखल्यांच्याबद्दल त्यांच्या मनात वेगळाच भाव होता. म्हणूनच १९१६ साली एक स्वयंसेवक म्हणून ते गोखल्यांबरोबर लखनऊ काँग्रेसला गेले.

शिक्षणक्षेत्र सोडून परांजपे जरी पूर्णवेळ राजकारणात उतरले नाहीत, तरी त्यांच्याकडे जी मानाची पदे चालून आली त्यांची शान राखून त्यांनी आपल्या नेमस्त वृत्तीला अनुसरून त्या-त्या प्रसंगी निर्णय घेतलेले आढळतात. उदाहरणार्थ, फर्गसनचे प्राचार्य असताना, इतर विद्यार्थ्यांचा विरोध डावलून एका महार मुलास पूर्ण नादारी देऊन महाविद्यालयातच नव्हे, तर वसतिगृहातसुद्धा प्रवेश दिला, तर मंत्रिपदाच्या काळात ज्या शाळा अस्पृश्य मुलांना त्यांच्या जातीमुळे पक्षपाती वागणूक देतील, त्यांचे सरकारी अनुदान बंद करण्याचा इशारा दिला. १९१३ साली राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून मुंबई कायदे कौन्सिलवर जाताना, नेहमीच सरकारी बाजूला राहीनच असे नाही, या अटीवर ते पद स्वीकारले आणि खरोखरच १७ पैकी १६ वेळा विरोधी मत नोंदवून आपला शब्द खरा केला. मात्र परंपरागत वतने नष्ट करण्याच्या प्रश्‍नी सरकार पक्षास पाठिंबा देऊन त्यांनी आपला समाजवादी दृष्टिकोन दाखवला. तसेच कौन्सिलच्या पुढील काळात त्यांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतनमान सुधारणे व १९२३ साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा मंजूर करून घेणे, ही कामे केली. सारांश, ही सर्व कृती म्हणजे ना. गोखले यांच्या पठडीत परांजप्यांचा पिंड तयार झाला, त्या प्रागतिक विचारसरणीचे हे द्योतक होय.

प्रा. स. पां. देशपांडे

संदर्भ :
१.देशपांडे, स.पां.; ‘रँग्लरचं ग्लॅमर’; ग्रंथाली प्रकाशन; २०००.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].