Skip to main content
x

परुळेकर, सदानंद दत्तात्रेय

     सदानंद दत्तात्रेय तथा बाबूराव परुळेकर यांचे शिक्षण बोर्डीच्या राष्ट्रीय शाळेत झाले. त्यामुळे त्यांच्यावर लोकसेवाव्रताचे संस्कार झाले होते. मुंबईतील दादर पश्चिम परिसरात शिक्षणाची तेव्हा कोणतीही सोय नव्हती. ८ मे १९४९ रोजी बाबूरावांनी या शारदाश्रम वसाहतीत बालक मंदिर सुरू केले. प्रारंभी फक्त नऊ मुले होती. नंतर मुलांची संख्या वाढत गेली व १९५० मध्ये प्राथमिक व पुढच्याच वर्षी माध्यमिक विभाग सुरू करण्यात आला. शाळेची इमारत होईपर्यंत शाळा शारदाश्रम वसाहतीच्या जागेत भरत होती. १९५३ मध्ये वाढत्या शाळेची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेल्या समितीत आचार्य भिसे, एस. एस. तांबे, डॉ. आजगावकर, रावबहादूर के. डी. कोतवाल, डॉ. के. आर. पोतदार होते. संस्थेची घटना बाबूराव परुळेकर व आचार्य भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली.

      शाळेच्या इमारतीसाठी रिझर्व्ह बँकेची व म्हात्रे पेन अँड इंडस्ट्रीजची जागा बाबूरावांनी मोठ्या प्रयत्नांनी मिळविली. अवघ्या चार महिन्यांत शाळेची भव्य इमारत उभी केली. तळमजला मुलांना खेळण्यासाठी ठेवून खांबावर बांधण्यात आलेली शारदाश्रम विद्या मंदिराची इमारत ही मुंबईतील पहिली इमारत. या इमारतीत मराठी व इंग्रजी माध्यम, मुलामुलींसाठी वेगळी शाळा, मुलांसाठी व मुलींसाठी वेगळ्या वसतिगृहांची सोय असून १९६० पासून अनेक नवीन, अभिनव उपक्रम चालू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी अनेक सोयी उपलब्ध आहेत. वाणिज्य, गृहशास्त्र, फाइन आर्टस्, चित्रकला, संगीत शिकविण्याची व्यवस्था आहे. १९६१ पासून तांत्रिक विभाग सुरू करून सुतारकाम, लोहारकाम, टर्निंग, फिटिंग, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे विषय उपलब्ध केल्याने शाळेविषयीचे आकर्षण वाढले. अकरावीला वेगवेगळे बावीस विषय शिकविण्याची सोय संस्थेने केली आहे.

मुंबईत दादर पश्चिम विभागात भवानी शंकर रोडच्या परिसरात १९४९ पासून विद्यादानाचे कार्य अखंडितपणे सुरु आहे.

- वि. ग. जोशी

परुळेकर, सदानंद दत्तात्रेय