Skip to main content
x

पटेल, जब्बार रझाक

      मराठी चित्रपटसृष्टीने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीला जे काही मोजके संवेदनशील चित्रकर्ते दिले, त्यामध्ये जब्बार पटेल यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. नाटक, कथा-चित्रपट, अनुबोधपट या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या. त्यांच्या कलाकृती विषयाने जितक्या ताज्या होत्या, तितक्याच त्या उत्कृष्ट आशयाच्या होत्या. त्यामुळेच त्यांना रसिक आणि समीक्षक या दोघांंकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

     पंढरपूर येथे जन्मलेल्या जब्बार यांचे शिक्षण सोलापूर येथे झाले. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि येथेच त्यांची कारकिर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनमध्ये ते हौशी नाट्यकलावंत म्हणून दाखल झाले. तेथे त्यांनी ‘अशी पाखरे येती’ हे नाटक केले. याच संस्थेने १९७२ मध्ये विजय तेंडुलकरलिखित ‘घाशीराम कोतवाल’ची निर्मिती केली, त्याचे दिग्दर्शक होते डॉ. जब्बार पटेल. पेशवेकालीन कथानकाच्या आधारे केलेल्या या अनैतिहासिक नाटकामुळे पटेल एकदम प्रकाशात आले. त्यातील ऐतिहासिक व्यक्तींच्या बदनामीमुळे या नाटकावर बरीच उलट-सुलट चर्चाही झाली. कालांतराने या नाटकाचे प्रयोग सुरू ठेवण्यासाठी डॉ. पटेल आणि त्यांचे कलावंत मित्र यांनी ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. पुढे या नाटकाच्या परदेशवारीसाठी सरकारने पोलीस संरक्षण दिले. वादग्रस्त ठरले असले तरी डॉ. पटेलांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटक अतिशय समर्थपणे सादर केले होते.

     एक वेगळे नाटक म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ ओळखले गेले. त्यातील प्रसंग चौकटी तर इतक्या चपखल होत्या की, पटेलांच्या याच सर्जनशीलतेमुळे त्यांना लगेचच ‘सामना’ चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मिळाले. ‘तोपर्यंत आपण कधी सिनेमाच्या कॅमेऱ्यातून पाहिलेही नव्हते’, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

     ‘सामना’ (१९७५) हा एक असाधारण मराठी चित्रपट मानला जातो. विजय तेंडुलकर यांची पटकथा आणि संवाद, डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांची अभिनयाची जुगलबंदी आणि डॉ. पटेलांचे कल्पनापूर्ण दिग्दर्शन या ‘सामना’च्या जमेच्या बाजू ठरल्या. सूर्यकांत लवांदे यांच्या छायाचित्रणाला एन.एस. वैद्य यांच्या संकलनाने एक वैशिष्ट्यपूर्ण गती दिली. काहीशा संथ लयीत चालणाऱ्या या चित्रपटाला लोकांनी सुरुवातीला दाद दिली नाही. परंतु भारताने अधिकृतपणे पाठवलेल्या ‘सामना’चे बर्लिन चित्रपट महोत्सवातील प्रदर्शन आणि राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष गेले. डॉ. मोहन आगाशे, स्मिता पाटील, लालन सारंग आणि विलास रकटे या छोट्या भूमिका केलेल्या कलावंतांनीही ‘सामना’ला मोठे योगदान दिले. लौकिक अर्थाने म्हणायचे, तर यानंतर डॉ. पटेलांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

     गो.नी. दांंडेकर यांची सुप्रसिद्ध कादंबरी ‘जैत रे जैत’ (म्हणजे ‘जिंकलो रे जिंकलो’) पटेलांनी रुपेरी पडद्यावर साकारली. याच शीर्षकाने निर्मिती झालेला हा चित्रपट म्हणजे आदिवासींच्या मुक्त जीवनावरील, रुपेरी पडद्यावरची एक लयबद्ध कविताच होती. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली ना.धों. महानोरांची गीते, ठाकरवाडीच्या पाड्यांवरची आणि सुळक्याची दृश्ये, तसेच डॉ. मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांनी रेखाटलेली आदिवासी पात्रे यांमुळे ‘जैत रे जैत’ (१९७७) म्हणजे एक उत्तम रंगचित्र असावे तसा दिसला.

     त्यानंतर डॉ. पटेलांनी एक राजकीयपट सादर केला - ‘सिंहासन’ (१९७९). ख्यातनाम पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित या चित्रपटाची पटकथा होती. निर्ढावलेले नेते जनतेच्या समस्यांची अजिबात फिकीर न करता स्वत:चाच फायदा कसा करून घेतात, हा या चित्रपटाचा कथाविषय होता. तो मांडताना आपल्या कलावंतांच्या प्रस्थापित प्रतिमांना छेद देत पटेलांनी त्यांच्यातील वेगळ्या प्रतिभेचे दर्शन घडवले. उदा. सतीश दुभाषींना कामगार नेत्याच्या भूमिकेत सादर केले, तर निळू फुले यांची बेरकी पुढाऱ्याची प्रतिमा बाजूला ठेवून त्यांना चक्क एका संवेदनशील पत्रकाराच्या भूमिकेत सादर केले. संपूर्णत: राजकीय बाज असलेल्या या चित्रपटातील अरुण सरनाईक, दत्ता भट, डॉ. श्रीराम लागू, रिमा लागू यांच्या वेगळ्या भूमिकाही प्रेक्षकांना पसंत पडल्या. आपल्या चित्रपटाची निर्मितिमूल्ये स्वत:च्या मनासारखी असावी, म्हणून डॉ. पटेल ‘सिंहासन’पासून निर्माताही बनले. कदाचित त्यामुळेच राजकारण्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आल्यामुळे होरपळणाऱ्या लोकांची घुसमट पटेलांना अतिशय उत्कटपणे दाखवता आली. मधल्या काळात डॉ. जब्बार पटेल यांनी बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ नाटकावर ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘पडघम’ ही नाटके दिग्दर्शित केली. त्यातूनही त्यांचे वेगळेपण दिसून आले.

     १९८१ या वर्षी प्रदर्शित झालेला ‘उंबरठा’ हा पटेल दिग्दर्शित पहिला रंगीत चित्रपट. शांता निसळ यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात स्मिता पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका केली. हौशी, व्यावसायिक आणि ध्येय म्हणून केलेल्या समाजसेवेतील धूसर रेषा या चित्रपटात स्पष्ट करण्यात आली होती. एका बाजूला महिलाश्रमांतून सर्रास चाललेल्या गैरप्रकारांना फोडलेली वाचा, तर दुसऱ्या बाजूला बेघर झालेले आयुष्य सावरण्यासाठी स्वत:च बेघर झालेली ध्येयवादी स्त्री, असे दुधारी अस्त्र पटेलांनी ‘उंबरठा’मधून सोडले. यामध्ये गिरीश कर्नाड, दया डोंगरे आणि कुसुम कुलकर्णी यांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ‘सुबह’ (१९८३) या नावाने हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला.

     अशा सर्जनशील कथा-चित्रपटांच्या जोडीला डॉ. जब्बार पटेल यांनी काही महत्त्वपूर्ण अनुबोधपटांचेही दिग्दर्शन केले. यामध्ये भारतीय नाट्यसृष्टीची ओळख करून देणारा ‘इंडियन थिएटर’, एस.एम.जोशी यांच्या कार्याची महती सांगणारा ‘मी एसेम’, त्याचप्रमाणे संतूरवर लीलया बोटे फिरवणाऱ्या पं. शिवकुमार शर्मा यांची कलात्मकता उलगडून दाखवणारा ‘हंस अकेला’ अशा वैविध्यपूर्ण अनुबोधपटांचा समावेश आहे.

     खूप वर्षांनंतर पु.ल. देशपांडे यांना लिहिते करीत डॉ. पटेलांनी ‘एक होता विदूषक’ (१९९२) दिग्दर्शित केला. यामध्ये त्यांनी तमाशाचा बाज वापरला आणि खानदेशी धाटणीच्या लावण्या सादर केल्या. शिवाय राजकारण्यांकडून लोककलावंतांचा वापर असा संदर्भही त्यांनी या कथानकात उपयोगात आणला. लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर आणि निळू फुले यांनी ‘एक होता विदूषक’मध्ये महत्त्वाच्या भूमिका वठवल्या आहेत.

     अनेक वर्षे कथा-चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर डॉ. पटेल यांनी १९९५ मध्ये ‘मुक्ता’चे दिग्दर्शन केले. राजकारण्याच्या घरातील सुशिक्षित मुलगी एका दलित कार्यकर्त्याच्या प्रेमात पडते आणि त्यामुळे एकच खळबळ उडते. यानिमित्त डॉ. पटेलांनी मागासवर्गीय आणि जातीय राजकारण यांचा ऊहापोह केला आहे.

     २००० मध्ये डॉ. पटेलांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा त्यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट दिग्दर्शित केला. त्यासाठी जगभराच्या अनेक देशांतील अनेक कलावंतांची चाचणी घेतल्यानंतर डॉ. पटेलांनी अखेर प्रसिद्ध दाक्षिणात्य कलावंत मामुटी यांची शीर्षक भूमिकेसाठी निवड केली. त्याकरिता त्यांनी संगणकीय चित्रव्यवस्थेचीही मदत घेतली आणि त्यातून मामुटी हे सर्वात योग्य अभिनेता असल्याचे सिद्ध झाले. चित्रपटाची व्याप्ती मोठी होती. डॉ. आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठातील शिक्षणाच्या दिवसांपासून ते नागपुरात सार्वजनिकरीत्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या प्रसंगापर्यंत त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या सर्व टप्प्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मोठे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासनानेही आर्थिक मदत केली होती. त्याचा पूर्ण फायदा घेऊन, आपल्या मनासारखे योग्य कलावंत, तंत्रज्ञ आणि प्रसंगस्थळे निवडून डॉ. पटेलांनी डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिचित्र अतिशय सखोलपणे सादर केले.

     आपल्या कलावंतीय कारकिर्दीत डॉ.जब्बार पटेल यांनी स्वत: तर उत्कट आणि सर्जनशील कलाकृती तर सादर केल्याच, त्याचबरोबर आपल्या नाटक-चित्रपटांसाठी त्यांनी पारंपरिक, प्रस्थापित कलावंतांना अनेक वेळा बाजूला ठेवून नवनव्या अभिव्यक्तीच्या कलावंतांचा योग्य उपयोग करून घेतला. पं. हृदयनाथ मंगेशकर, ना.धों. महानोर, सुरेश भट, वसंत बापट, सोनाली कुलकर्णी, गिरीश कर्नाड आणि अनेक कलावंत, तंत्रज्ञ, कवी, संगीतकार यांचा डॉ. पटेलांच्या चित्रपटातील सहभाग हेच सिद्ध करतो.

      डॉ. पटेलांना पद्म पुरस्कारासहित, संगीत नाटक अकादमीचा आणि केंद्र/राज्य शासनाचे अनेक पुरस्कार बहाल केलेले आहेत.

- चंद्रशेखर जोशी

पटेल, जब्बार रझाक