Skip to main content
x

पट्टेकर (गुप्ते), गजानन केशव

      गजानन केशव पट्टेकर हे ठाणे येथील संत गजानन महाराज पट्टेकर किंवा अण्णासाहेब पट्टेकर या नावाने ओळखले जातात.

पट्टेकर यांचे मूळ आडनाव गुप्ते. छत्रपती शिवरायांच्या काळात नाशिक, नगर आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पट्टा या नावाचा किल्ला होता. किल्ला आणि आजूबाजूचा परिसर औंढा पट्टा या नावाने ओळखला जात असे. गुप्ते घराणे या औंढा पट्ट्याचे सरकारी अंमलदार होते.

इंग्रजी राज्य आल्यावर किल्ल्यांचे महत्त्व संपले. तेव्हा गुप्ते मंडळींनी पट्ट्याहून ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे स्थलांतर केले. हे शहापूर मुंबई-नाशिक महामार्गावर आहे.

अण्णासाहेबांचे वडील केशवराव हे मामलेदार व मॅजिस्ट्रेट होते. अण्णासाहेबांच्या आई सत्यभामाबाई या शिवभक्त होत्या. त्यांनी सोळा सोमवार व्रत ओळीने पाच वर्षे केले होते. एकंदर पट्टेकर मंडळी वणीची सप्तशृंगीदेवी आणि श्री त्र्यंबकेश्वर यांची भक्ती करीत असत. केशवराव पट्टेकरांचे बंधू आत्मारामपंत पट्टेकर हे शहापुरात साधू म्हणूनच प्रसिद्ध होते. अशा भगवद्भक्त घराण्यात, श्री गजाननाच्या कृपेने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर गजानन महाराज ऊर्फ अण्णासाहेब यांचा जन्म झाला.

तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या विजयदुर्गपासून साधारण दहा कि.मी. अंतरावरील पाटगाव या छोट्याशा खेड्यात बाळकृष्ण केशव गोळपकर वैद्य हे राहत असत. लोक त्यांना दत्तसंप्रदायातील सत्पुरुष परमपूज्य दादामहाराज पाटगावकर या नावाने ओळखत असत. हे दादामहाराज अण्णासाहेब पट्टेकरांचे गुरू होत. गुरूंच्या आदेशानुसार अण्णासाहेबांनी लष्करात नोकरी धरली. तो दुसर्या महायुद्धाचा काळ होता.

पुढे सैन्याशीच संबंधित, पण नागरी क्षेत्रात अण्णासाहेबांना बढती मिळाली. त्यांच्या अधिकारपदाला गॅझेटेड सिव्हिलियन सिक्युरिटी ऑफिसरअशी संज्ञा होती. आपल्या नोकरीच्या कालखंडात अण्णासाहेबांनी सगळ्याच वरिष्ठ अधिकार्यांकडून शाबासकी मिळविली. त्यांपैकी महत्त्वाचे नाव म्हणजे जनरल राजेंद्रसिंहजी. हे राजेंद्रसिंहजी पुढे भारताचे सरसेनापती झाले.

अण्णासाहेबांना एकूण सहा भाऊ आणि तीन बहिणी. कौटुंबिक जबाबदार्यांमधून मोकळे झाल्यावर १९५२ साली अण्णासाहेबांनी नोकरीचा राजीनामा दिला. लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही, हे त्यांनी अगोदरच ठरवले होते. नोकरीतून मुक्त झाल्यावर त्यांनी देशभर उदंड तीर्थयात्रा केल्या. या सगळ्या कालखंडात त्यांची आध्यात्मिक साधना दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत गेली.

ठाण्याला टेंभी नाक्याजवळ पट्टेकर कुटुंबीयांचे घर होते. जवळच अण्णासाहेबांचे बालमित्र भगवान तेली व जगन्नाथ तेली यांचे घर होते.

अण्णासाहेब दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेपाच या काळात तेलींच्या घरी जात असत. तेली बंधूंच्या भगिनी मथुराबाई यांनी एकदा त्यांच्यावर ओढवलेल्या आकस्मिक संकटाबद्दल अण्णासाहेबांना उपाय विचारला. त्यांनी तो सांगितला आणि मथुराबाईंना त्याचा गुण आला

ही वार्ता तोंडातोंडी पसरत गेली. हळूहळू अण्णासाहेबांना उपाय विचारण्यासाठी येणारे लोक वाढू लागले. अण्णासाहेब लोकांना प्रथम नामघेण्यास सांगत आणि मग अगदी साधा, सोपा असा एखादा उपाय सुचवत. लोकांना गुण येत असे. यातूनच हळूहळू लोक अण्णासाहेबांना गजानन महाराजम्हणू लागले.

अडल्या-नडलेल्यांच्या समस्या सोडवीत असताना त्यांचा प्रवासही सारखा चालू असे. ठाणे आणि मुंबई व आसपासच्या अनेक ठिकाणी, अनेक भक्तांच्या घरी ते केव्हाही जात आणि राहत असत.

महाराज स्वत: अनेक संत-सत्पुरुषांच्या भेटी आवर्जून घेत असत. तसेच, कित्येेक संत स्वत: होऊन त्यांना भेटायला येत असत. यांतली काही ठळक नावे म्हणजे, धामणगावचे प.पू. मुंगसाजी महाराज, गगनगिरी महाराज, वज्रेश्वरीचे स्वामी नित्यानंद आणि स्वामी मुक्तानंद, संत गाडगे महाराज, बेळगावच्या प.पू. श्री कलावतीदेवी, रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री गोळवलकर गुरुजी, इत्यादी.

पट्टेकर महाराज जेव्हा तीर्थयात्रा करीत वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये जात असत, तेव्हा त्यांच्या बरोबरच्या भक्त-मंडळींना त्या-त्या स्थानातल्या देव-दैवतांची दिव्य दर्शने प्रत्यक्ष घडत असत, असा अनेकांचा अनुभव आहे.

रंजल्या-गांजल्या गोरगरीब जनतेप्रमाणेच समाजातील प्रतिष्ठित लोक, मोठे अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू अशी मंडळीही महाराजांकडे येत असत. त्यांपैकी काही ठळक नावे म्हणजे सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, प्रख्यात वकील आणि काँग्रेस नेते प्रभाकर हेगडे, शिवसेना नेते आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इत्यादी.

गजानन महाराज पट्टेकर यांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी महानिर्वाण झाले.

  - मल्हार कृष्ण गोखले                             

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].