Skip to main content
x

पुंडलिक, विद्याधर गंगाधर

     विद्याधर पुंडलिक यांचा जन्म जळगाव येथे झाला. ते एम.ए. (समाजशास्त्र१९५१), पीएच. डी. होते. ‘Religion in the life of college teachers in Poona’ हा प्रबंधाचा विषय (डॉ. इरावती कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली) घेतला. (पुणे विद्यापीठ १९७२) प्रारंभी काही शाळांमध्ये शिक्षक, पुढे समाजशास्त्राचे प्राध्यापक, विजय महाविद्यालय, विजापूर (१९५३-१९५४), सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई (१९५४-१९६१) व समाजशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ (१९६०-१९८४), शेवटी प्रपाठक म्हणून निवृत्त झाले.

त्यांनी जवळपास ६० कथा, ५ एकांकिका, ‘माता द्रौपदी’ (१९७२) व ‘चार्वाक’ (१९७९) ही दोन प्रकाशित व दोन अप्रकाशित नाटके इत्यादींचे लेखन केले. याव्यतिरिक्त ‘आवडलेली माणसे’, (१९७६) हे व्यक्तिचित्रण व ‘शाश्वताचे रंग’ (१९८६) हे समीक्षालेखन प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर समाजशास्त्रीय आणि अनुवादित लेखन त्यांच्या नावावर आहे. तथापि कथाकार आणि एकांकिकाकार म्हणून त्यांनी त्या-त्या प्रकारावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे. ‘बारा वर्षांनंतर’ ही त्यांची पहिली कथा ‘सत्यकथा’ मासिकाच्या १९५१च्या अंकात प्रसिद्ध झाली. ‘वॉर्ड नं. ७’ या त्यांच्या कथेने त्यांना कथाकार म्हणून नाव मिळवून दिले. ‘या कथेत माझा आदिस्वर मला सापडला’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘जिथे जाईन तिथे मी चमकेन’ या अनावर आकांक्षेतून त्यांचे लेखन झाले. डॉ.पु.ग. सहस्रबुद्धे, डॉ.के.ना. वाटवे, प्रा.रा.रा. मालेगावकर या प्राध्यापकांच्या अध्यापनातून मुळातील साहित्यविषयक आस्थेला खतपाणी मिळाले. श्री.पु. भागवत व राम पटवर्धन यांच्या चिकित्सक संपादक दृष्टीने त्यांची कथा संस्कारीत झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा.भावे यांच्या नवकथेच्या भराच्या काळात त्यांना कथालेखनाची प्रेरणा आणि आदर्श गवसले. ‘मराठी नवकथेने आणि नवकवितेने उंच डोंगरमाथ्यावरील भणाणत्या वार्‍यासारखे स्वातंत्र्याचे आणि प्रयोगशीलतेचे एक उन्मेषशाली वातावरण त्या काळात निर्माण केले. कथेच्या आशयावर, भाषेवर, तंत्रावर, घडणीवर कसलेच बंधन नाही. कोणत्याही - अक्षरशः कोणत्याही विषयाला कथा कोणत्याही तंत्राने गवसणी घालू शकते- ही कलेतील स्वातंत्र्याची प्रेरणा आणि प्रचिती हे नवकथेचे खरे देणे होय’, असे त्यांचे नवकथेसंबंधीचे आकलन स्पष्ट व स्वच्छ होते.

‘पोपटी चौकट’ (१९६२), ‘टेकडीवरचे पीस’ (१९६९), ‘माळ’ हे कथासंग्रह, ‘देवचाफा’ (१९७९) पाच दीर्घकथांचा संग्रह, ‘फॅन्टशिया’ (१९९४) हा फॅन्टसीजच्या अंगाने जाणार्‍या कथांचा संग्रह हे सारे त्यांचे कथात्म लेखन आहे. यातून ‘वेचक पुंडलिक’ (१९८५) हा त्यांच्या निवडक कथांचा संग्रह सिद्ध झाला आहे.

त्यांच्या कथांमधून लहान मुलांना आवर्जून स्थान मिळाले आहे; जवळजवळ एक तृतीयांश कथा लहान मुलांसंबंधी आहेत. ‘आजी शरण येते’, ‘त्याला मिळाला वनमाळी’, ‘मी आणि पेंडसे’ या कथांमधून म्हातारे-म्हातार्‍यांची चित्रे आली आहेत. ‘प्रवास’, ‘वाटा’, ‘वेडीवाकडी लालरेषा’, ‘सती’ या कथांची बीजे काही ख्यातनाम राजकारणी व्यक्तींच्या जीवनातील आहेत. ‘वॉर्ड नं. ७’, ‘हाडशीर’, ‘एका मांजरीची कथा’, ‘ठिबका’, ‘मी आणि पेंडसे’, ‘पुत्र’, ‘गाय’ व ‘ऐलतीर’ या कथांमधून मृत्यूचे चित्रण आढळते. हिंदू संस्कृती-परंपरांचे ‘माळ’, ‘त्याला मिळाला वनमाळी’, ‘विपरीत काही झालं नाही’, ‘दवणा’, ‘अपार’ व ‘अर्धूक’ या कथांतून चित्र येते. ‘दवणा’मध्येे तर लोककथेचा सुंदर वापर त्यांनी केला आहे तर कानांवर काही ऐकण्यात आलेले, कुठेतरी ग्रंथांमध्ये वा वृत्तपत्रात वाचलेले असे काही विषय त्यांच्या कथांचे विषय झाले आहेत.

आगगाडीच्या प्रवासात कुणीतरी बाईने मुलाला दिलेला जन्म या वृत्तपत्रातल्या बातमीवर त्यांनी ‘प्रवास’ ही कथा लिहिली. एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा खून करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, असे नक्षलवादी तरुण त्या अपत्यजन्मप्रसंगी आगगाडीच्या डब्यात असतात; अशी विरोध नाट्यात्म जोड त्यांनी त्या बातमीला दिली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या बुद्धीमान तरुणाला हॉकी खेळताना मार लागतो आणि गुडघ्याची वाटी कायमची कामातून गेल्याने अपंगत्व येते. त्या तरुणाचे आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या तरुणीचे अनोखे, काव्यपूर्ण तरीही कारुण्यजन्य चित्रण हा ‘सामोरी’चा विषय आहे.

कथाकार म्हणून पुंडलिकांची दोन सामर्थ्ये जाणवतात. एक: अर्थपूर्ण अनुभवांची निवड व स्वीकृत अनुभवांना हळवेपणा, भावविवशता व कमालीचा एकांगीपणा येऊ न देण्याचे भान; समाजशास्त्राच्या व्यासंगाने व तत्त्वज्ञानाची बैठक लाभल्याने अनुभवांना गहिरी अर्थवत्ता कशी प्राप्त होईल, यावर असलेला कटाक्ष; यांमुळे त्यांचे लेखन क्वचित कोरडे वाटण्याची शक्यता असते. पण या कोरडेपणात कलाप्रकाराविषयीची एक अभिजात नि प्रौढ तात्त्विक जाणीव कार्यरत असते. त्यांच्या कथांतून दिसून येणारी तरल पारदर्शकता, जीवनविषयक अनुभवांचे सहज सुंदर आविष्करण, व्यक्तींमधील नात्याच्या अन्वयार्थाने सूक्ष्म व मृदू विश्लेषण, कथान्तर्गत व्यक्तींच्या स्वभावांचे चैतन्यपूर्ण कंगोरे, कथारचनेच्या संदर्भातील डोळस प्रायोगिकता, कथावस्तूचा झुळझुळणारा प्रवाहीपणा, विशिष्टलक्षी, अर्थगर्भ, प्रत्ययकारक शब्दशैली, मर्मस्पर्शी, भेदक व संयमी निवेदन-पद्धती व सर्वांत महत्त्वाची म्हणजे त्यांची मनःपूर्वकता यामुळे त्यांचे लेखन लक्षणीय ठरते.

१९६० नंतर मराठी साहित्यिकांना महाभारताचे प्रलोभन पडले. दुर्गा भागवत (व्यासपर्व), इरावती कर्वे (युगान्त) हे त्यांपैकी काही लेखक. दुर्गाबाईंचा दृष्टीकोन भावात्मक तर इरावतींचा बुद्धीनिष्ठ. ‘युगान्त’चे लेखन होताना इरावतीबाई आपला सहकारी आणि विद्यार्थी विद्याधर पुंडलिक यांच्याशी चर्चा करीत असणारच. त्याचा परिणाम असा झाला की, पुंडलिकांनी ‘अखेरची रात्र’ ही कथा महाभारतातील अंतिम युद्धाच्या आदल्या रात्री कृष्ण-कुंती-कर्ण यांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी व त्यांना गवसलेल्या या प्रसंगाचा अन्वय स्पष्ट करण्यासाठी लिहिली. इतकेच नव्हे तर पुढे ‘सुडाचे हे चक्र कुणीतरी आपला हात घालून थांबवायला हवे होते’ ही द्रौपदीला जाणीव होते याचे चित्रण करणारी ‘चक्र’ ही एकांकिका त्यांनी लिहिली. एकांकिकेच्या छोट्याशा अवकाशात पुंडलिकांनी शांततेचे व मानवतेचे एक महत्त्वाचे सूत्रच जणू मांडले, आणि एकांकिकाकार- समर्थ एकांकिकार म्हणून त्यांचे नाव झाले. त्यानंतर त्यांनी ‘प्रार्थना’, ‘पैल तो गे काऊ’, ‘रंग’ व ‘अललऽऽडूर’ या चार एकांकिका लिहिल्या. त्या ‘चौफुला’ (१९७६) संग्रहात एकत्र प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यांतील प्रत्येक एकांकिका लक्षणीय आहे, पण त्यातही ‘रंग’ ही एक असाधारण एकांकिका आहे. आयुष्यभर रंगभूमीवर नट म्हणून वावरणार्‍या आणि नेहमीच दुय्यम भूमिका कराव्या लागणार्‍या व अव्वल दर्जाची भूमिका लाभल्यावर आपल्या अभिनयाच्या मर्यादा जाणवल्याने पराभूत नि व्यथित झालेल्या नटाचे दुःख, ही एकांकिका विलक्षण ताकदीने मांडते.

पुंडलिकांनी मोजकीच नाटके लिहिली. ‘माता द्रौपदी’ (१९७२), ‘चार्वाक’ (१९७९) ही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत तर ‘श्रद्धा’ (२०००), ‘कुणीकडून कुणीकडे’ (२०००), ‘दिवस फार चांगले आहेत’ व ‘धन्य मी’ ही अप्रसिद्ध नाटके आहेत. त्यांपैकी शेवटचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोगासारखे डॉ.श्रीराम लागू यांच्या सूचनेवरून त्यांनी लिहिले. ‘चक्र’ या एकांकिकेच्या यशानंतर पुंडलिकांना या अनुभवाने बेचैन केले. त्याचा परिणाम असा झाला की जिचे पाचही पुत्र अश्वत्थामाने सुडाने मारले त्या द्रौपदीच्या वंचित मातृत्वाचे दुःख आणि एकूणच मानवी संहारातील दाहकतेची द्रौपदीला झालेली जाणीव व त्यातून अश्वत्थाम्याच्या भळभळणार्‍या जखमेत त्याची वेदना शांत व्हावी म्हणून तिने तेल घालणे इतक्या तिच्या जाणिवांचे विस्तारलेले क्षितिज चित्रित करून पुंडलिकांनी मानवी दुःख आणि त्याची जाणीव यासंबंधात व्यक्त केलेली संवेदनशीलता मोलाची होती. ‘एकांकिके’चे नाटक करण्याचा व वाङ्मयप्रकारांतील अनुभवांतराचा त्यांनी केलेला हा प्रयोग होता. समीक्षकांना तो फारसा आवडला नाही. ‘श्रद्धा’ हे अणीबाणीच्या पार्श्वभूमीवर दोन पिढ्यांतील संघर्षाचे चित्रण समर्थपणे करणारे नाटक अलक्षितच राहिले. भारतीय तत्त्वज्ञानातील चार्वाकदर्शन हे नास्तिक समजले जाते. पुंडलिकांच्या प्रारंभीच्या काळात एकदा आचार्य अत्रे यांनी या विषयावर लेखन व्हायला हवे असे म्हटले होते. चार्वाक तत्त्वज्ञानाची उपलब्ध सुक्ते आणि सदाशिव आठवले यांनी लिहिलेले त्यावरील एक पुस्तक एवढेच मराठीत उपलब्ध लेखन असताना पुंडलिकांनी चार्वाक ही एक व्यक्ती होती आणि तिचे बंडखोर विचार तत्कालीन समाजाला पटले नाहीत, यातून तिची शोकांतिका झाली या सूत्रावर नाटक लिहिले होते. त्यांनी ज्या काळात नाटके लिहिली, तो काळ प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा भराचा काळ होता. प्रायोगिकतेचे व यशाचे प्रलोभन त्यांना पडले नाही.

पु.ग.सहस्रबुद्धे, इरावती कर्वे, अनंत काणेकर, श्री.पु. भागवत, प्राचार्य नारळकर, सानेगुरुजी, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वि.दा. सावरकर इत्यादी अकरा जणांवर त्यांनी ‘आवडलेली माणसे’ (१९७६) या पुस्तकात लेखन केले आहे. या सार्‍या माणसांचा या ना त्या कारणाने पुंडलिकांना सहवास लाभला. त्यांच्यातील लहान-सहान सवयी-लकबी, विचारप्रणाली, इतरांशी वागणूक इत्यादी विषयींची पुंडलिकांची सूक्ष्म निरीक्षणे प्रत्ययकारी ढंगात व्यक्त झाली आहेत. ‘व्यक्तिचित्रे’ या प्रकारातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणून त्यांच्या या पुस्तकाकडे पाहिले जाते.

‘दोन अखेरचे निरोप’, ‘प्रिय आना’, ‘प्रिय पराया’, ‘गुडबाय मि. चिप्स’, ‘क्राईम अ‍ॅन्ड पनिशमेन्ट’, ‘डार्लिंग’ ‘प्रिय डॉक्टर’ असे आस्वादक ललितलेखन त्यांनी ‘शाश्वताचे रंग’मध्ये एकत्र केले आहेत. त्यात प्राय: भिन्न-भिन्न पाश्चात्त्य साहित्यकृतींचा त्यांनी घेतलेला आस्वाद आहे. मराठीतल्या आस्वादक समीक्षकांमध्ये पुंडलिकांचे नाव त्यामुळे घेतले जाते.

‘हरी नारायण आपटे’, (१९९२), ‘दलित साहित्य: सामाजिक-सांस्कृतिक अभ्यास’ (सहकार्याने) अशी संपादने त्यांनी केली आहेत. त्यांनी ‘माझी सखी’ (१९६९) व ‘दोन शहरांची गोष्ट’ (१९९६) ही ललित तर ‘अमेरिकन भांडवलशाही’ व ‘अमेरिकेची राजकीय पद्धती’ ही वैचारिक पुस्तके अनुवादित केली आहेत.

उत्तम कथेचे सत्यकथा पारितोषिक (१९५७) ‘आजी शरण येते’ या कथेला, महाराष्ट्र शासनाचा (१९६३) उत्तम कथासंग्रहाचा पुरस्कार ‘पोपटी चौकट’ला, सोव्हिएट लॅन्ड नेहरू पारितोषिक ‘चक्र’ या एकांकिकेला (१९६६) ‘माळ’ या कथेला कॅप्टन गो. गं लिमये पुरस्कार (१९७०), ‘देवचाफा’ला (१९७६) वामन व रेणू देशपांडे पुरस्कार व ‘आवडलेली माणसे’ या व्यक्तिसंग्रहास (१९८०) महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असे पुरस्कार त्यांना लाभले होते. साहित्यलेखनात विद्याधर पुंडलिक यांची वाट स्वतंत्र राहिली.

- प्रा. अनंत देशमुख

पुंडलिक, विद्याधर गंगाधर