Skip to main content
x

पुराणिक, श्रीनिवास गोविंद

     श्रीनिवास गोविंद पुराणिक यांचा जन्म जमखिंडी संस्थानात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीलाच झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून त्यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले. नंतरच्या काळात पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेतील डॉ. धनंजयराव गाडगीळांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

     १९३२ च्या जून महिन्यात पुराणिक नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अर्थशास्त्र व व्यवस्थापन हे त्यांचे अध्यापनाचे विषय. विषयाचा गाढा व्यासंग, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व उत्तम वक्तृत्व ह्यामुळे एक उत्तम प्राध्यापक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. विद्यार्थ्यांचे वाचन केवळ नेमलेल्या पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये यावर त्यांचा कटाक्ष होता. 

     ब्रिटिश अमदानीत एस. आर. पी. म्हणजे आजचे गृहरक्षक दल (होम गार्ड संस्था) सारखीच संस्था - शहरात होती. सरकारने प्रा. पुराणिकांची या दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. या दलाच्या अत्यंत शिस्तबद्ध कार्याचे संचालन ते करीत असत.

     १९५० च्या दशकात व्यापारी वर्ग व सहकारी कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांना सहकार शक्तीची जाणीव झाली होती. मार्केटयार्ड असणार्‍या प्रत्येक गावात सहकारी बँक ही काळाची गरज होती. यातूनच १९५५ मध्ये ‘नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’ची स्थापना झाली व तिचे धुरीणत्व सहकार महर्षी कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे व प्रा. पुराणिक यांचेकडे आले. पुराणिकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या बँकेचा ‘मूळ आराखडा’ तयार केला. ते बँकेचे संस्थापक अध्यक्ष झाले व एका अर्थतज्ज्ञाचे मार्गदर्शन बँकेला लाभले. आज ही बँक नाशिकच्या शहरी व ग्रामीण जीवनातील प्रगतीचे एक अत्यंत भक्कम माध्यम म्हणून कार्य करीत आहे.

     १९५६ मध्ये पुराणिक एच.पी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते उत्तम प्रशासक होते, अत्यंत कडक शिस्तीचे भोक्ते होते. कला विभागात भूगोल या विषयांची तर विज्ञानशाखेत रसायन, पदार्थविज्ञान ह्या विषयांच्या पदवी शिक्षणाची सोय केली. महाविद्यालयाचे ग्रंथालय पुराणिक यांच्या कारकिर्दीतच समृद्ध झाले. मुलांसाठी व मुलींसाठी वसतिगृहे बांधली. परिसरातील रस्ते सुधारून गावातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयापर्यंत वाहतुकीची व्यवस्था त्यांनी करविली. विविध योजनांसाठी त्यांनी सरकारी अर्थसाहाय्य मिळविले. संस्थेचा व्याप वाढत गेला. 

     संस्था आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हावी असे पुराणिकांचे प्रयत्न असत. सिन्नरचे देणगीदार जगन्नाथशेट क्षत्रिय यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मोठी देणगी मिळविली व बी. वाय. के महाविद्यालय उभे राहिले. 

     - प्रा. सुहासिनी पटेल

पुराणिक, श्रीनिवास गोविंद