Skip to main content
x

पुरंदरे, निर्मला बळवंत

     निर्मला पुरंदरे यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. निर्मलाताईंच्या बालपणीच त्यांचे कुटुंब साताऱ्यात स्थायिक झाले. निर्मलाताई सोळा वर्षांच्या होत्या आणि दहावी इयत्तेत शिक्षणही घेत होत्या तेव्हा, बळवंत उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतर १९५१ मध्ये निर्मलाताई दहावी उत्तीर्ण झाल्या.

     तरुण वयातच थोर नेत्यांची आणि संतांचीही चरित्रे त्यांच्या वाचनात आली. त्यामुळे त्यांच्यावर गाडगे महाराज, समर्थ रामदास, महर्षी कर्वे, ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव पडला. नंतर १९५२ पासून निर्मलाताईंनी त्यांच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या मुलांना शिकवायला सुरूवात केली. त्यांच्यासाठी त्या वेगवेगळ्या स्पर्धा घेत. हे काम सुरु असतानाच त्यांचे बंधू श्रीकांत माजगांवकर यांच्या माणूस साप्ताहिकात त्यांनी सहाय्यक संपादक या पदावर काम करायला सुरूवात केली. त्याचवेळी श्रीकांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेली ग्रामायन चळवळ आणि त्यांच्या इतरही चळवळी बघून निर्मलाताईंना त्यातून समाजासाठी काम करायची प्रेरणा मिळाली.

      याच काळात ताईंची विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कामाशी ओळख झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करणारी ही संस्था होती. त्यांची विद्यार्थी सहाय्यक समितीवर विश्वस्त म्हणून नेमणूक झाली. मग त्यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संपर्क येऊ लागला. विद्यार्थ्यांची वागणूक, त्यांच्या अडचणी बघून मग ताई त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करु लागल्या. ‘इनव्हेस्टमेंट इन मॅन’ या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करताना त्या ग्रामीण भागातील मुलींच्या संपर्कात आल्या. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की ग्रामीण भागातील मुलींचे चांगले व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी त्यांच्यात आधी आत्मविश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे. मग त्यांना ग्रामीण भागातील रोजच्या आयुष्यातले प्रश्‍न आणि गरजा समजून घेता आल्या. या आधी त्या फ्रेंडस् ऑफ इंडिया सोसायटीकडून फ्रान्सला जाऊन आल्या होत्या. तिथे त्यांना पथनाट्य, व्यक्तिमत्व शिबिराचे प्रशिक्षणही घेता आले. त्याचाच उपयोग त्यांना या शिबिरांसाठी करता आला. ग्रामीण भागातल्या काही समस्यांचा त्यांनी अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की गावांमध्ये लहान मुलांचे शिक्षण म्हणजे बालशिक्षण ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित झालेली आहे. तसेच शाळा अर्धवट सोडणाऱ्या मुलांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे त्यांना जाणवले.

      पालकांशी बोलून त्यांनी बालवाडीची गरज त्यांना सांगितली. बालशिक्षणाचे महत्त्व गटचर्चा घेऊन पटवून दिले. १९७७ मध्ये लोणीकंद गावात पहिली बालवाडी निर्मलाताईंनी सुरु केली. मग १९७८ मध्ये जवळपास १० गावांमधून बालवाडी सुरु करण्याविषयी मागणी झाली. मग मात्र त्यांनी बालवाडी शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करायचे ठरविले. सहा महिन्यांचा पहिला वर्ग शिरुर तालुक्यात सुरू करण्यात आला. शिरुर, ठाणे, हवेली, खंडाळा, पारनेर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तालुक्यांमध्ये एकूण ३६ बालवाडी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.

       १९८१ मध्ये निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र स्थापन केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करायचा हे वनस्थळीचे ध्येय होते. वनस्थळीच्या स्थापनेनंतर १९८१ पासून जवळपास १० हजार ग्रामीण महिलांनी सहा महिन्यांचे बालवाडी वर्गाचे प्रशिक्षण घेतले.

      निर्मला पुरंदरे यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कोल्हापुरच्या पॉवर ट्रस्टचा सन्मान, इंटरनॅशनल माँटेसरी मंडळ,  सेवासदनचा देवधर स्मृती ट्रस्ट पुरस्कार असे काही पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. 

      - वर्षा जोशी-आठवले

संदर्भ
१.      एक्सप्लोरिंग फेमिनिस्ट व्हिजन्स केस स्टडीज, श्रीवाणी अ‍ॅण्ड इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल्स ऑफ सोशल वर्क, व्हिएन्ना, ऑगस्ट, १९९०.१
पुरंदरे, निर्मला बळवंत