पवार, बाळासाहेब रामाराव
बाळासाहेब रामाराव पवार यांचा जन्म औरंगाबाद तालुक्यातील कन्नड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अनुसया होते. त्यांचे शिक्षण इंटरमिजिएटपर्यंत झाले. पुढे त्यांनी घरच्या पारंपरिक शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली. शेती करतानाच ते स्थानिक पातळीवरील राजकारण व समाजकारण यात उतरले. पवार यांच्याकडे औरंगाबाद तालुका मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद सलग 13 वर्षे होते. तसेच ते तालुका सहकारी बाजार समितीचेही अध्यक्ष होते. त्यांनी 1969 ते 1971 व 1979 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बाजार समितीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. पवार यांनी कन्नड, जालना, वैजापूर गंगापूरचा साखर कारखाना उभारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. किंबहुना गंगापूरचा खाजगी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्याचे पहिले काम त्यांनी केले. विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षणसंस्था नावारूपाला आणण्याचे कामही त्यांनीच केले. त्यांनी या शिक्षणसंस्थेचे सचिवपद सांभाळले.
पवार 1967 ते 1977 या काळात महाराष्ट्र विधानसभा सदस्य होते. ते 1980-1984 या काळात सातव्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
जिल्हा पक्ष प्रमुख म्हणूनही पवार कार्यरत होते. ते जालना सहकारी साखर कारखाना, जालना सहकारी सूत गिरणी या संस्थांचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य बँकेचे उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. पवार यांनी कृषक भारती सहकारी मर्यादित, भारतीय शेतकरी फर्टिलायझर्स को-ऑप.लि., महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशन या संस्थांचे संचालकपद सांभाळले होते. त्यांनी औरंगाबाद जिल्हा खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. ते छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
पवार 1974 मध्ये मराठवाड्यात झालेल्या विकास आंदोलनामध्ये अग्रेसर होते व त्यांच्या निग्रही भूमिकेमुळेच त्यावेळेस मराठवाड्याला मुख्यमंत्रिपद मिळाले होते. पवार यांचे वयाच्या 68 व्या वर्षी दिल्लीमध्येराहणार्याआपल्यामुलीकडेहृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
- संपादित