Skip to main content
x

पवार, शरद्च्चंद्र गोविंद

रद्च्चंद्र गोविंद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात काटेवाडी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव शारदाबाई होते. मोठ्या गोतावळ्यातील त्यांचे घराणे सधन व सुखवस्तू असले तरी लहानपणी त्यांच्या आईने त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार केले. बारामती येथील राजर्षी शाहू विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून 1962 मध्ये बी. कॉम.ची पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याचवर्षी त्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणातल्या मार्गक्रमणास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षीच पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसचे चिटणीसपदही मिळविले. यशवंतराव चव्हाणांसारख्या रत्नपारखींनी शरद पवारांमधला राजकारणी अचूक हेरला होता.

याच काळात चीनने भारतावर आक्रमण केले, त्यावेळी पवार यांनी नागरी समितीची धुरा सांभाळली. तसेच त्यांना युनेस्कोतर्फे निमंत्रितही करण्यात आले होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय युवक परिषदेत घेतलेला सहभाग त्याचप्रमाणे जपान, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड तसेच जर्मनी आदी देशांमधील गाजलेल्या युवक चळवळींचा केलेला अभ्यास यामुळे अल्पावधीतच एक प्रगल्भ राजकारणी तसेच सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेता ही त्यांची प्रतिमा तयार झाली.

राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तीकडे सर्व क्षेत्रांतील तसेच जागतिक पातळीवरील घटना, नीतिनियमांचे आकलन असायलाच हवे याबद्दल पवार आग्रही आहेत. त्यांनी पुण्यात टेल्कोच्या कारखान्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून उद्योगक्षेत्रातील त्यांचे दूरदर्शित्व दिसून येते. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाच्या विषयाचेही सूतोवाच या द्रष्ट्या नेत्याने सर्वांआधी केले होते. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगाची मागणी काय असेल हे हेरून त्यांनी महाराष्ट्रात या क्षेत्रात क्रांतीच घडविली आहे.

‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळख असलेल्या पुणे नगरीला उत्तम आधुनिक शिक्षण सौष्ठव पुरवून त्यांनी झळाळी प्राप्त करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे उद्योजकांशी विकासभिमुख उद्दिष्टांचेच संबंध राहिले आहेत. पुण्यात ‘आयुका’ आणि ‘एनसीआरए’ या विज्ञानविषयक संस्था उभ्या करण्यात पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. उद्योगाप्रमाणेच कृषिक्षेत्राबद्दलचाही त्यांचा अभ्यास आणि आस्था वाखाणण्यासारखी आहे.

आपत्ती व्यवस्थापन या विषयावरही पवार यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात आणि देशातही वेळोवेळी आलेल्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित संकटांच्या काळातील आणीबाणीची परिस्थिती योग्य तर्‍हेने हाताळण्यासाठी त्यांची फार मोठी मदत झाली आहे. त्यांनी केंद्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

विरोधी किंवा सत्ताधारी पक्षात काम करताना त्यांनी राजकीय विरोधामुळे एखाद्या प्रांताच्या विकासामध्ये आप-परभाव कधीच केला नाही. विकासाला प्राधान्य देऊन सार्वजनिक जीवनात काम करण्याची त्यांची पद्धत आहे. विद्यार्थिदशेतच मिळालेला व्यापक सामाजिक कार्याचा अनुभव व अवलोकनामुळे भारतभरातील विविध प्रांतांमधील समस्यांचे स्वरूप भिन्न असते, यांचे आकलन त्यांना आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिपदी काम करतानाच विशेषत: कृषिखाते सांभाळताना शेतकरी, संघटक तसेच समाजशास्त्राचा व्यासंगी असे त्यांचे रूप नेहमीच समोर आले आहे.

पवार यांनी मुंबईच्या नेहरू सेंटरचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांनी रयत शिक्षण संस्था, सातारा; यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन; गरवारे क्लब हाऊस, मुंबई; महाराष्ट्र कुस्तीगार परिषद; मुंबई क्रिकेट असोसिएशन; बारामतीचे विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास सेवाभाव संस्था; वसंतदादा पाटील साखर कारखाना; आंतरराष्ट्रीय शेती व्यापार व शेतीवर आधारित उद्योग केंद्र म्हणजेच ‘सीटा’, रायगड सैनिकी शाळा; तसेच को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया इत्यादी संस्थांमध्ये अध्यक्षपद भूषविले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 

अध्यक्षपदाबरोबरच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचेही आय.सी.सी. अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. चारवेळा मुख्यमंत्रिपद तसेच देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्री अशा जबाबदार्‍या पवार यांनी पेलल्या. लोकसंग्रह हा त्यांच्या राजकारणाची ऊर्जा आहे.

शरद पवार यांना 2001 मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचा कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

- संदीप राऊत

पवार, शरद्च्चंद्र गोविंद