Skip to main content
x

फेणे, वसंत नरहर

     वसंत नरहर फेणे यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले. मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेची आणि नंतर पुणे विद्यापीठाची कला शाखेची पदवी त्यांनी संपादन केली. त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्र राज्य परिवहन खाते येथे आणि नंतर गृहनिर्माण मंडळात नोकरी केली.

     ‘मी पुरुष-पूर्ण पुरुष’ (१९७३) हे नाटक, ‘वैताग वानोळा’ (१९८०) विनोदी लेख, ‘साम्यवाद ः एक अभ्यास’ हा अनुवाद असे प्रकार त्यांनी हाताळले असले, तरी कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ते ओळखले जातात.

     ‘काना आणि मात्रा’ (१९७२), ‘पाण्यातली लेणी’ (१९७८), ‘सावल्यांची लिपी’ (१९८१), ‘निर्वासित नाती’ (१९९७), ‘पिता-पुत्र’ (१९९५), ‘नरजन्म’ (१९८९), ‘ज्याचा-त्याचा कु्रस’(१९९५), ‘मुळे आणि पाळे’ (१९९९), ‘शतकान्तिका’ (१९९९), ‘मावळतीचे मृद्गंध’ (२००१) असे त्यांचे कथा-संग्रह आहेत.

     ‘हे झाड जगावेगळे’ (१९७९), ‘पहिला अध्याय’ (१९८०), ‘सेंट्रल बस स्टेशन ’ (१९८०), ‘अजोड’ (१९८३), ‘संदर्भ’ (१९८४), ‘र्‍हासपर्व’(१९८४), ‘विश्वंभरे बोलविले’ इत्यादी कादंबर्‍या असे त्यांचे लेखन आहे.

     माणसाच्या मनाचा व मानवी संबंधांचा खोलवर जाऊन वेध घेणार्‍या त्यांच्या कथा ‘दीपावली’, ‘सत्यकथा’, ‘किस्त्रीम’, ‘केसरी’, ‘प्रतिष्ठान’, ‘मराठवाडा’ इत्यादी अंकांतून प्रसिद्ध झाल्या. ‘निर्वासित नाती’मध्ये ‘नाती’ हे एकच सूत्र खेळवले असले, तरी इतर कथांमधूनही रक्ताची नाती, प्रीती-मैत्री, नीती, मूल्य, जन्मभू आणि ‘स्व’शी असलेली नाती ते प्रकाशझोतात आणतात. कधी त्या नात्यांमधली समृद्धी दिसते तर कधी त्यातले वैफल्य.

     त्यांच्या कथांमध्ये मध्यमवर्गीय जीवन जास्त असले, तरी त्यांच्या अनुभवविश्वाचा परीघ विस्तीर्ण आहेच. माणसाच्या मनाच्या समुद्रात  ते खोलवर अवगाहन करतात. मानवी नात्यातली निरर्थकता-अर्थपूर्णता, दुरावा-जवळीक, मोहकता-कुरूपता अशी दोन्ही रूपे ते रंगवितात; त्यामुळे एकांगी होत नाही. तुटत, विरत, विटत जाणारी नाती तर कधी नात्याला प्राप्त झालेली श्रीमंती ते दाखवतात. ‘वाघाचे पंजे’मधील ‘ती’ ज्याच्यावर प्रेम केले, ज्याच्यासाठी आई-वडील, करिअर हे सोडले त्याच्याच शेवटच्या श्‍वासाची कामना करते आणि हा प्रवास लेखक भेदकपणे मांडतो. तर ‘घनाची गोष्ट’मध्ये बायको हाकलते तरी पुनः पुुुुनः तिच्याकडे याचना करत राहणारा घनश्याम, ‘करविता धनी’मधील रहिमतबी-खुशरू-धरमाप्पा आणि त्यांचे संबंध, ‘आकाशपुष्प’मधील संजीवीच्या एका नकाराने सगळे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेला गुणाकर, त्याचे इंजिनिअरिंगमधील सर्वोच्च यश, केवळ तिच्यासाठी केलेली संगीतातली कारकीर्द, मातीमोल होऊन एक वेडा गोळा बनून राहतो.

     ‘पिता-पुत्र’ संग्रहात हेच एक सूत्र घेतलेल्या कथा आहेत. बाप-मुलाच्या नात्याला असणारी अनेक परिमाणे त्यातून दिसतात. कारखान्यातला संप, युनिअनची हुल्लडबाजी, धमक्या, पैशाचा अभाव; या तणावांनी बाप-लेकाचे नाते कसाला लागलेले आहे. यातून मार्ग काढताना  बाप-लेकाची होणारी कुतरओढ आणि नात्याला विरताना पाहणे क्लेशदायक आहे. तर ‘बाप-लेक’मधला बाप, श्रीमंत असूनही कुठलीही जबाबदारी न घेणार्‍या मुलाकडे अधिक ओढ घेतो. आणि खस्ता खाणारा मुलगा-सून सालस असूनही त्यांच्याबद्दल आकस बाळगतो. यातलेही सुरुवातीचे दीर-भावजयीचे गोड नाते, भांडणे नसतानाही हळूहळू कोमेजून जाते.

    ‘संसार’ कथेतला आश्रित, कळकट बाबू, हुशारीच्या जोरावर प्राचार्य बनतो आणि पूर्वी आपल्याला तुच्छतेने वागवणार्‍या नलूशीत लग्न करून मग तिच्या छळाची किळसवाणी पद्धत शोधून काढतो. “मला अंधारात तुझा प्रियकर समज”, असे बोलून तिच्यावर तर सूड उगवतोच; पण जो सर्वकाही विसरून आपल्या संसारात रमलाय, त्यालाही हे सांगून आसुरी आनंद मिळवतो. हे कुजलेले नातेही फेणे वाचकाला जाणवून देतात.

     कधी जीवनात घुसमट निर्माण करणारी परिस्थिती, आर्थिक कोंडी, नात्यातले वैय्यर्थ, नात्यातली वीण, अंधार्‍या-कोेर्‍या जागा, तिथे नेमके काय कोरले गेले; याच्याकडे ते प्रकाशझोत टाकतात. वार्धक्य, जगण्यातला पोकळपणा, व्यवस्थेबद्दलचा तिटकारा, महानगरी संस्कृतीचे भयावह आक्रमण, स्वार्थी अन् क्षुद्र वृत्तींचे दर्शन या कथांतून घडते. ‘अंधारकडा’मध्ये विदेशामधील वातावरण, ‘मावळतीचे मृद्गंध’मध्ये तर वृद्धाश्रम, ‘धर्मसंकट’मध्ये राजकीय आणि मुस्लिम धर्मीय वातावरण, कधी ग्रामीण तर कधी शहरी वातावरणाची विविधता आहे. बाह्यजग अनाकलनीय असेल, तर अंतर्गत जीवन त्याहून अधिक गूढ आणि अतर्क्य आहे. याचा ते वेध घेतात. शतकाअखेरीच्या स्त्रीच्या मनोवस्थेचे विविधांगी चित्रण ‘शतकांतिका’मध्ये आहे. ‘सिंगल मदर’, ‘डिंक कपल’, ‘घटस्फोटिता’, ‘पुनर्विवाह’ असे सर्व निर्णय स्वतः घेऊनही आज सुशिक्षित स्त्रीचीही कशी घुसमट होत आहे ते धारिणी, मेघना, रागिणी, यांच्या एकाकीपणातून जाणवते. प्रश्नांची उत्तरे मिळवू पाहताना प्रश्न तसेच शिल्लक आहेत याची क्लेशकारक विदारक जाणीव, तत्त्वज्ञानातील फोलपणाकडे निर्देश करतात.

    ‘पहिला अध्याय’ला १९५० च्या ग्रामीण राजकारणाची पार्श्वभूमी असून पारध्यांची वर येण्याची धडपड दिसते. ‘सेंट्रल बस स्टेशन’ ही कादंबरी वरवर फक्त नाशिकच्या बस स्टेशनवरची वाटली, तरी तिच्यातून भेटणारी वरिष्ठ पदावरील कुचकामी माणसे, प्रतिष्ठेची ओंगळ हाव, पदाचा  दुरुपयोग, दुसर्‍यांची अस्मिता ठेचून मिळणारा आनंद दांभिकपणा ह्यांच्या चित्रणामुळे स्क्रू पिळून आणखी खोलखोल गाभ्यापर्यंत जावे, तसे ते जातात. इवल्याशा माणसांचे इवलेसे जग आणि त्यांची छोटीशी स्वप्ने त्यांनी अप्रतिम रंगविली आहेत. कुर्‍हाडीचे धारदार पाते लख्खन चमकून जावे, तशी त्यांची शैली माणसागणिक बदलतेच; पण कथेप्रमाणे वेगळे रूप धारण करते. ‘जखमी रुसवा’, ‘विचारगर्भ क्षण’, ‘कंगोरेदार द्वैत’, ‘दीड वर्षांची विधवा’ असा विशेषणांचा अतिसुंदर वापर दिसतो, तर कधी उपरोध, छद्म यांचा आधार घेतलेला दिसतो. एकूणच मानवी दुःखांना अनेक अंगांनी स्पर्श करणारे असे त्यांचे लेखन आहे.

     - प्रा. मीना गुर्जर

फेणे, वसंत नरहर