Skip to main content
x

राजवाडे, राजाराम प्रभाकर

राजा राजवाडे

     विनोदी लेखक म्हणून अधिक लोकप्रिय असलेल्या राजा राजवाडे यांनी कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, ललितलेख इत्यादी वाङ्मय-प्रकारही लीलया हाताळले. राजा राजवाडे यांचा जन्म देवरूखजवळच्या (जिल्हा रत्नागिरी) निवे या छोट्या गावी झाला. त्यांचे वडील प्रभाकर राजवाडे यांचे देवरूखच्या बाजारपेठेत छोटेसे हॉटेल होते.

     देवरूखच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून एस.एस.सी. झाल्यावर ते मुंबईला खालसा महाविद्यालयात दाखल झाले. तिथे बी.ए. करून त्यांनी महानगरपालिकेत नोकरी मिळवली आणि पुढे सिडकोमध्ये ते प्रसिद्धी अधिकारी म्हणून रुजू झाले. तेथून ते प्रमुख जनसंपर्क अधिकारी म्हणून निवृत्त झाले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. याच संस्थेची सभा आटोपून येत असताना पनवेलजवळ त्यांचे अपघाती निधन झाले.

     गिरगावमधील वाङ्मयीन वातावरण, प्रगत साहित्य सभेमधील मित्रपरिवार व चांगले वाचन यांचा परिणाम म्हणून महापालिकेत नोकरी करीत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांचे प्रारंभीचे लेखन सामाजिक जाणिवांनी प्रभावित झालेले आहे. त्यांच्या प्रारंभीची दीर्घ कविता ‘किलावेनमानीची रात्र’ (१९६९), त्याचप्रमाणे ‘धुमसणारं शहर’ (१९७५), ‘कार्यकर्ती’ (१९७९), ‘अस्पृश्य सूर्य’ (१९७८) ‘दुबई दुबई’ (१९८०) या कादंबर्‍यांचा त्या दृष्टीने उल्लेख करता येतो.

     एकाच वेळी कथा, कादंबरी, विनोदी लेख, विनोदी कादंबर्‍या, स्तंभलेखन, ललित-गद्य, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, कविता असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करणार्‍या राजवाड्यांनी चित्रपटकथा नाटक व लोकनाट्य यांसारखे प्रयोगशील प्रकारही हाताळले आहेत. राजवाड्यांनी लहानमोठ्या अशा जवळपास ७६ पुस्तकांचे लेखन चाळीस वर्षांत केले. उच्च मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय जीवनाचे स्त्री-पुरुषांच्या जीवनातील ताणतणाव, नोकरी करणार्‍या विवाहित व अविवाहित स्त्रियांचे प्रश्न, त्यांची नोकरीत होणारी कुचंबणा, प्रेमी युगुलांचे प्रणयाराधन, बलात्कारित व फसवणूक झालेल्या असाहाय्य अबलांची दुःखे, सिने व नाट्यसृष्टीतील स्त्री-पुरुष कलावंतांच्या जीवनातील संघर्ष इत्यादींचे चित्रण राजवाडे यांच्या लेखनात प्रामुख्याने आढळते.

      त्यांनी विविध विषयांवर चटपटीत स्वरूपाचे रंजनपर लेखन केले असले तरी लक्षवेधक लेखनही केले आहे. ‘दोस्ताना’ (व्यक्तिचित्रे), ‘डॉग व्हॅन’ (कथा, १९८९), ‘घर आमचं कोकणातलं’ आणि ‘माणसं आमच्या कोकणातली’ (ललित लेख, १९९० व १९९८) अशा काही पुस्तकांचा व लेखांचा उल्लेख या संदर्भात करता येतो.

     - अशोक बेंडखळे

राजवाडे, राजाराम प्रभाकर