रसाळ, सुधीर नरहर
सुधीर नरहर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य-विश्वातील एक व्यासंगी व परखड समीक्षक. ‘कविता आणि प्रतिमा’ ह्या काव्यविषयक सैद्धान्तिक समीक्षाग्रंथांचे ते कर्ते आहेत. मराठवाडा विद्या-पीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख असल्याने त्यांनी दीर्घकाळ अध्यापन, संशोधन व संपादनकार्य केले. औरंगाबादजवळील गांधिली हे रसाळ घराण्याचे मूळ गाव होय. वडील नरहर माणिक कुळकर्णी व आई इंदिराबाई. गावचे कुळकर्णीपद असल्याने वडिलांनी कुळकर्णी हे आडनाव लावले, परंतु इतर सर्व जण रसाळ हेच आडनाव लावीत. सुधीर रसाळ ह्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे झाला. त्यांचे बिगरीपासून मॅट्रिकपर्यंतचे पूर्ण शिक्षण औरंगाबादच्या सरस्वतीभुवन हायस्कूल येथे झाले. पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेजचे (मिलिंद महाविद्यालय) पहिल्यावहिल्या फळीचे ते विद्यार्थी होते.
बी.ए.ची पदवी १९५४मध्ये प्राप्त करून पदव्युत्तर शिक्षणासाठी ते हैद्राबाद स्टेटच्या उस्मानिया विद्यापीठात दाखल झाले व एम.ए. मराठी प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकासह उत्तीर्ण झाले (१९५७). अध्ययनानंतर औरंगाबादच्याच शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात तीन वर्षे अधिव्याख्यातापदावर त्यांनी अध्यापन कार्य केले. १९५९मध्ये मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग सुरू झाला, तेव्हा पहिल्याच वर्षी सुप्रसिद्ध समीक्षक वा.ल. कुलकर्णी व यु.म. पठाण यांच्यासमवेत त्या विभागात रसाळ हे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. त्यानंतर निवृत्त होईपर्यंत, ऑगस्ट १९९४पर्यंत याच विभागात अधिव्याख्याता- प्रपाठक- प्राध्यापक अशा पदांवर ३४ वर्षे कार्यरत होते. वा.ल. कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘काव्यातील प्रतिमासृष्टी: मराठी काव्याच्या संदर्भात’ ह्या विषयावर त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन केले. ह्या पीएच.डी.प्राप्त प्रबंधाचे संस्कारित रूप म्हणजे ‘कविता आणि प्रतिमा’ हा गाजलेला काव्यविषयक मीमांसा-ग्रंथ होय. जून १९८२मध्ये तो ग्रंथ मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला. गुरुवर्य म.भि.चिटणीस यांना अर्पण केलेला हा मराठी साहित्यसमीक्षेतील काव्यविषयक सैद्धान्तिक विवेचनाचा एकमेव ग्रंथ कवितेचे स्वरूप शोधण्याच्या प्रेरणेतून सिद्ध झाल्याचे लेखक सांगतात. ‘प्रतिमा’ ही संकल्पना आणि तिचे काव्यातील महत्त्व व कार्य ह्यांची सांगोपांग मांडणी करणारा असा ग्रंथ मराठीत दुसरा नाही.
या ग्रंथाच्या चार भागांपैकी पहिल्या भागात कवितेचे स्वरूप, दुसर्या भागात भाषा व तिची निर्मितिप्रक्रिया, तिसर्या भागात प्रतिमेचे स्वरूप व चौथ्या भागात विविध काव्यप्रकार आणि त्यांतील प्रतिमा अशी विस्तृत, संदर्भसंपन्न मांडणी करण्यात आली आहे. कविता व प्रतिमा यांचा सांगोपांग विचार मांडतानाच कथात्म वाङ्मय आणि नाटक या प्रकारांतील प्रतिमेच्या कार्यावरही ते विवेचक प्रकाश टाकतात. भारतीय आणि पाश्चात्त्य मतांतरांचा परामर्श घेत, अनेक गुंतागुंतींची उकल करीत, कठीण विषय सुगम पद्धतीने समजावून सांगण्याची रसाळांची समीक्षाशैली ह्या ग्रंथरूपाने आदर्श म्हणून स्थापित झाली. ह्याशिवाय त्यांचे ‘काही मराठी कवी: जाणिवा आणि शैली’ (१९८४) हे काव्यसमीक्षेचे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रमुख संपादित ग्रंथांमध्ये ‘साहित्य: अध्यापन आणि प्रकार’ (वा.ल. कुलकर्णी गौरव ग्रंथ, सहकार्याने संपादन, १९८७), ‘गंगाधर गाडगीळ: निवडक समीक्षा’ (१९९६), ‘दासोपंत: गीतार्णव’ (मराठवाडा विद्यापीठ) यांशिवाय जवळजवळ दीडशेवर समीक्षालेख विविध वाङ्मयीन नियतकालिकांतून व काही संपादित ग्रंथांतून प्रसिद्ध आहेत.
बहुतेक प्रमुख व गाजलेल्या चर्चासत्रांतून त्यांनी महत्त्वपूर्ण वाङ्मयीन विषयांवर निबंधलेखन केले आहे. विविध ललितसाहित्यकृतींच्या समीक्षणांप्रमाणेच मराठी भाषेची सद्यःस्थिती, मराठी साहित्याचे अध्यापन, वाचनसंस्कृती, मराठीच्या पीछेहाटीची कारणमीमांसा इत्यादी विषयांवर डॉ. रसाळांनी महाराष्ट्रभरातील विविध व्यासपीठांवरून मौलिक चिंतन मांडलेले आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधनिबंध लेखांमध्ये ‘मराठी समीक्षा’ (मराठी: साहित्य प्रेरणा आणि स्वरूप, पॉप्युलर प्रकाशन, १९८६), ‘ललित साहित्याचे अध्यापन: उद्दिष्टे व स्वरूप’ व वा.ल. कुलकर्णी: साहित्यसमीक्षक व अध्यापक’ (साहित्य: अध्यापन आणि प्रकार, १९८७) ‘कविता’ (वाङ्मयीन शैली आणि तंत्र, संपादक: हातकणंगलेेकर), ‘एक शून्य बाजीराव’ (प्रतिष्ठान नाट्यविशेषांक, १९७१), ‘वाचनसंस्कृती’ (युगवाणी, ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर २००६) इत्यादी काही उदाहरणादाखल सांगता येतील.
रसाळांच्या प्रसिद्धिविन्मुख वृत्तीमुळे इतके महत्त्वपूर्ण समीक्षालेखन मराठीच्या अभ्यासकांना अजूनही ग्रंथरूपात एकत्रपणे उपलब्ध झालेले नाही. १९६०पासून जवळजवळ पुढली २० वर्षे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी केलेले कार्यही वाङ्मयीन क्षेत्रातील साक्षेपी व रचनात्मक कार्याचा नमुना ठरावा. त्यांनी आपले बरेचसे समीक्षालेखन ‘प्रतिष्ठान’च्या निमित्ताने केलेले आहे. ना.धों.महानोरांसारख्या प्रथितयश कवींच्या कविता प्रारंभी ७०च्या दशकात ‘प्रतिष्ठान’मध्येच प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
मराठवाडा साहित्य परिषद, मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी, इत्यादी विविध संस्थांमध्ये अध्यक्ष, सचिव व प्रमुख पदाधिकारी आदी पदांवर त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. मराठवाडा विद्यापीठांतर्गत मराठीविषयक विविध समित्यांवर, अभ्यासमंडळांवर ते कार्यरत राहिले.
पीएच.डी. आणि एम.फिल. ह्या पदव्यांसाठी अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या रसाळ ह्यांना १९९२चा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ‘कविता आणि प्रतिमा’ या ग्रंथाला ‘रा.श्री. जोग पुरस्कार’ व ‘महाराष्ट्र शासन साहित्य पुरस्कार’ असे पुरस्कार मिळून सर्वस्तरीय मान्यताही प्राप्त झाली आहे.
विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी आणि मूल्यवेधी अशी निर्मळ, निकोप, पारदर्शक व वस्तुनिष्ठ दृष्टीची रसाळांची समीक्षा आहे. वाद-विचारांनी डागाळलेल्या, दुराग्रही-आक्रस्ताळ्या व कंपूबाजीत गुरफटलेल्या एकूण मराठी समीक्षेच्या गजबजाटात स्वतःच्या पृथगात्म तेजस्वितेने ती उठून दिसते. सर्वसाधारण निरपेक्ष वाङ्मयाभ्यासकाला आधार, दिलासा आणि निर्मळ दृष्टी देणारी त्यांची ही समीक्षाशैली आहे.
२. पवार, हातणंगलेकर, संपादक; ‘मराठी साहित्य: प्रेरणा व स्वरूप’; पॉप्युलर प्रकाशन; १९८६.
३. खोले विलास; ‘विसाव्या शतकातील मराठी समीक्षा’; प्रतिमा प्रकाशन, पुणे; २००४