Skip to main content
x

साधू, शंकर धुंडिराज

खंदारकर, शंकर महाराज

        शंकर महाराज खंदारकर हे धर्मव्यवस्थेला मानवतेच्या पातळीवर आणून अर्थशून्य कर्मकांडापेक्षा समता, बंधुभाव, भूतदया, परोपकार, सहिष्णुता या मूल्यांना प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या संतपरंपरेचे पाईक होते. मराठवाड्यातील प्रसिद्ध संत श्री साधुमहाराज (इ.स. १७०८ - १८१२) यांच्या कुळात शंकर महाराज यांचा जन्म झाला. संत एकनाथ महाराजांनंतर लोकजागृतीचे कार्य करणारी जी संतपरंपरा निर्माण झाली, त्यात कंधारचे प्रसिद्ध संत साधुमहाराज हे होते. साधुमहाराजांपासून सातव्या पिढीचे शंकर महाराज यांनी भागवतधर्मपरंपरेला उजाळा दिला.

शंकर धुंडिराज साधू, उपाख्य शंकर महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य ३, शके १८४४ रोजी कंधार (जि. नांदेड) येथे धुंडिराज महाराज व मथुराबाई या धर्मशील दाम्पत्याच्या पोटी झाला. महाराजांचे शालेय शिक्षण अल्पच होते. संस्कृत भाषा, व्याकरण, साहित्य, वेद-वेदान्ताचे त्यांनी सखोल अध्ययन केले. वेदशास्त्रसम्पन्न गोविंदशास्त्री देवणीकर यांच्याकडे महाराजांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर नांदेड येथे महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी काव्यतीर्थही पदवी संपादन केली. संस्कृतच्या अध्ययनानंतर महाराज चतुर्मासात पंढरपूर येथे राहू लागले. तेथे त्यांनी पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्या सहवासात वेदान्त, न्यायशास्त्र, भाष्यग्रंथांचा सखोल अभ्यास केला. संतांच्या साहित्याचा वेद, उपनिषदे, भाष्यग्रंथ व अद्वेैत तत्त्वज्ञानावरील इतर ग्रंथांशी सुंदर समन्वय साधण्याची अभ्यासपद्धती महाराजांना अवगत झाली. वयाच्या तेविसाव्या-चोविसाव्या वर्षापासूनच ते अभ्यासपूर्ण कीर्तने व प्रवचने करू लागले. वेदान्त ग्रंथांबरोबरच महाराजांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांची गाथा या प्रस्थानत्रयीचे सूक्ष्म चिंतन केले.

श्रीसंत साधुमहाराजांपासून पंढरीच्या पायी वारीची परंपरा मध्यंतरी निझामी राजवटीत खंडित झाली होती. ती परंपरा शंकर महाराज व त्यांचे थोरले बंधू सीताराम महाराज यांनी पुन्हा सुरू केली. १९५४ साली कंधारहून पंढरपूरला दिंडी सोहळ्याने पायी वारी करण्याची परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली. या पायी वारीच्या वाटचालीत गावोगावी जाऊन कीर्तन-प्रवचने या माध्यमांतून संतांच्या वाणींचे लोकमानसावर दृढ संस्कार होत असत.

पंढरपूरला महाराजांचे चार महिने वास्तव्य असे. या काळात ते ज्ञानेश्वरीवर नित्य प्रवचन तर करीत असतच, पण त्याचबरोबर पंचदशी’, ‘गीताभाष्य’, ‘भामती’, ‘ब्रह्मसूत्रभाष्ययांसारख्या वेदान्त ग्रंथांवर निरूपण करीत. शास्त्र न शिकलेल्या माणसालासुद्धा कळेल अशा पद्धतीने महाराज कठीण विषय सोपा करून सांगत. महाराजांची स्वतःची अशी एक कीर्तनशैली होती.

कर्म, भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य इत्यादी सिद्धान्तांचा परिपोष साधत ते निरूपण करीत. त्यांच्या कीर्तन-प्रवचनात सप्रमाणता, मुद्देसूदपणा, विनोद, मार्मिकता, सखोल चिंतन असे. त्यांच्या कीर्तनाला पंढरपुरात प्रचंड गर्दी होत असे. चातुर्मास्यानंतर महाराज गावोगावीच्या भ्रमंतीला निघत.

महाराष्ट्राच्या शहराशहरांत व खेड्यापाड्यांत महाराजांनी ज्ञानेश्वरीचा नंदादीप पोहोचवला. कोणतीही दळणवळणाची साधने नव्हती, साधी वीजही नव्हती अशा काळात महाराजांनी लोकांना हरिकीर्तनाचा अमृतरस भरभरून दिला. ते ज्या गावी कार्यक्रमासाठी जात असत, त्या गावाला एखाद्या यात्रेचे स्वरूप येत असे.

वक्तृत्वाबरोबरच महाराजांनी ग्रंथलेखनही केलेे. संतांच्या वाणींचा परिपूर्ण अर्थ लोकांना मिळावा या हेतूने महाराजांनी ज्ञानेश्वरी भावदर्शन’ : दोन खंड, ‘भावार्थ एकनाथी भागवत’ : दोन खंड, ‘श्री तुकाराम महाराज गाथाभाष्य’ : दोन भाग, ‘श्रीअनुभवामृतभाष्य’, ‘हरिपाठभाष्य’, ‘सार्थ एकनाथी भारुडे’, ‘ज्ञानदेवांचे पसायदान’, ‘नामदेवचरित्रविवेचनअसे आठ ग्रंथ लिहिले. संतांच्या साहित्यांचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी महाराजांच्या ग्रंथांचा अतिशय उपयोग होतो. त्यांचे ग्रंथ आजही लोकप्रिय आहेत.

गरीब वारकर्‍यांबद्दल महाराजांना विलक्षण कळवळा होता. मागासलेल्या जातींच्या अनेक वारकर्‍यांना महाराजांनी स्वतःजवळ ठेवून घेतले आणि त्यांना वेदान्तात पारंगत केले. कीर्तन- प्रवचनाची कला शिकविली. त्यांच्या प्रेरणेतून आज असंख्य वारकरी कीर्तन-प्रवचने करून लोकजागृतीचे कार्य करतात. महाराजांच्या सहवासात अनेक कुमार्गी लोक सन्मार्गाकडे वळले. त्यांच्या अनुग्रहामुळे अनेक मूढ व पापी असलेले लोक साधक बनले व साधकाचे सिद्ध झाले. महाराज म्हणजे चालतेबोलते ज्ञानपीठच होते.

साडेतीन तपे महाराजांनी वारकरी संंप्रदायासाठी देह झिजविला व प्रभावी ग्रंथलेखन केले. शंकर महाराज खंदारकरांचे हे निर्मोही व्यक्तिमत्त्व अश्विन वद्य सप्तमी, शके १९०७ रोजी काळाच्या पडद्याआड गेले.

डॉ. यशवंत साधू

साधू, शंकर धुंडिराज