सडोलीकर-काटकर, श्रुती
जयपूर-अत्रौली या घराण्याच्या गायिका म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील वामनराव व काका मधुकर सडोलीकर यांना उ. अल्लादिया खाँ व भुर्जी खाँ यांच्याकडून जयपूर घराण्याची अस्सल तालीम लाभली होती. संगीताची अशी समृद्ध पार्श्वभूमी असल्याने वडील पं. वामनरावांकडून अगदी लहान वयापासून, घरातूनच त्यांना जयपूर-अत्रौली परंपरेचे शिक्षण मिळाले. नंतर सुमारे बारा वर्षे पं. गुलूभाई जसदनवालांकडूनही त्या शिकल्या व नंतरही त्यांनी बाबा अजिजुद्दीन खाँ यांचे मार्गदर्शन घेतले.
मुंबईच्या श्री.ना.दा.ठाकरसी विद्यापीठातून त्यांनी संगीतात एम.ए. केले व हवेली संगीतावर संशोधन केले. त्यांनी एन.सी.पी.ए.कडून भाभा पाठ्यवृत्ती, केसरबाई केरकर पाठ्यवृत्ती मिळविली. हवेली संगीतातून जयपूर घराण्यात आलेल्या बंदिशींवर त्यांनी विशेष कार्यक्रम केला. मोकळा, ढाला, काहीसा अनुनासिक असा सडोलीकरांचा आवाज आहे. आपल्या परंपरेनुसार चुस्त अशा बंदिशी त्या मांडतात. त्यांच्या रागबढतीत कण, खटके आणि न्यासाची विपुलता आहे. त्या अत्यंत शिस्तबद्ध अशी बढत करतात. आपण जे काही मांडतो आहोत, त्याबद्दलची स्पष्टता आणि आत्मविश्वास हे त्यांच्या गायकीत पुरेपूर आढळते. जोडरागांवरचे त्यांचे प्रभुत्व त्यांच्या बुद्धीमत्तेची साक्ष देते. श्रुती सडोलीकर- काटकरांनी जयपूर घराण्याच्या गायकीतील बुद्धीप्रधानता जपलेली आहे. ख्याल, ठुमरी, भजन हे सर्व गानप्रकार त्या समर्थतेने सादर करतात.
आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार असलेल्या श्रुती सडोलीकरांनी आकाशवाणी संगीत संमेलने व दूरदर्शनच्या माध्यमातून, तसेच भारतासह अमेरिका, कॅनडा, युरोप, पश्चिम आशियाई देशांतील अनेक महत्त्वाच्या रंगमंचांवरून आपल्या कलेचा आविष्कार मैफली आणि कार्यशाळांद्वारे सफलतेने केला आहे. नेदरलँडमधील ‘रॉटरडॅम कॉन्झर्व्हेटरी ऑफ म्युझिक’ मध्ये त्या भारतीय संगीताच्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांची अनेक व्यावसायिक ध्वनिमुद्रणे प्रसिद्ध आहेत. ‘षण्मुख संगीत शिरोमणी’, ‘गोपिनाथ सरकार’ पुरस्कार, ‘डागर घराणा’ सन्मान (महाराणा मेवाड फाउण्डेशन, उदयपूर), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना लाभले.
गोविंदराव टेंबे यांच्या ‘संगीत तुलसीदास’ या नाटकात वामनराव सडोलीकर यांनी काम केले होते. म्हणूनच श्रुती सडोलीकर यांनी वडिलांच्या आठवणीप्रीत्यर्थ १९९९ साली या नाटकाची पुनर्निर्मिती केली. तसेच टेंबे यांच्या जन्मशताब्दीत ‘गोविंद गुणी रंगले’ हा विशेष कार्यक्रमही त्यांनी सादर केला. मराठी नाट्यसंगीतातील पदे ज्यांवर आधारित आहेत असे मूळ ठुमरी-दादरे व ती नाट्यपदे, असा कार्यक्रम त्यांनी सादर केला.
डॉ.अशोक दा. रानडे यांनी सादर केलेल्या बैठकीची लावणी, देवगाणी, चंद्रभैरवी, इ.अनेक संकल्पनाधिष्ठित मैफलींत त्यांचा सहभाग होता. संगीत रिसर्च अकॅडमी, कोलकाता येथे गुरू म्हणून श्रुतीताईंची नियुक्ती झाली होती. २०२०पर्यंत त्यांनी लखनौच्या भातखंडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी काम पाहिले.