Skip to main content
x

शेंबेकर, गणेश गोपाळ

दादासाहेब शेंबेकर

        णेश गोपाळ ऊर्फ दादासाहेब शेंबेकर यांचा जन्म बारामती येथे झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील वारुळ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथेच झाले. वयाच्या बाराव्या वर्षी ते सातवीची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. घरची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने पुढच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाला म्हणून ते घरच्या मळ्यातच काम करू लागले. त्यानंतर काही काळातच त्यांना नगरपालिकेत नाकेदाराची नोकरी मिळाली. ही नोकरी सांभाळत त्यांनी मळ्यात काम सुरू ठेवले. त्यांना १९२०मध्ये सरकारी सिंचन विभागात सात रुपये पगारावर पाटकऱ्याची नोकरी मिळाली. त्याच वेळी द्वारका काशीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सणसर, निंबूत, खुडवा अशा गावी बदली होत शेवटी चेकर इन्स्पेक्टर म्हणून उरळीकांचनला त्यांची बदली झाली. नोकरी चालू असली तरी त्यांचा शेतीकडे जास्त ओढा होता. त्यामुळे त्यांनी १९२०मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या काळात त्यांनी कृषीविषयक ज्ञानही मिळवले होते. तसेच बागायतदारांशी चर्चाही केली होती. त्यांनी पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. घरचा मळा अपुरा होता. म्हणून त्यांनी आतेभाऊ केशव पराडकरांची तीन एकर जमीन कसायला घेतली. त्यानंतर काही वर्षांतच म्हणजे १९१२-१३च्या आसपास त्यांनी पराडकरांची जमीन सोडवून बारामतीतील सावकार गंगूशेट गुजरांकडून दहा एकर जमीन खंडाने घेतली. त्यांनी या जमिनीची उत्तम मशागत करून ऊस लावला. शेती आणि बागायतीच्या तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी त्यातले दोष हेरले आणि नवी पद्धत स्वीकारली. त्यामुळे त्यांना चांगला फायदा झाला. त्यांनी वेळोवेळी तज्ज्ञांकडून ऊस लागवडीतील नवनवे शोध, आधुनिक तंत्र शिकून घेतले. त्याला स्वतःच्या कल्पकतेची जोड देत त्यांनी पुंड्या उसाऐवजी नव्या जाती लावल्या. यातूनच त्यांना अधिक हुरूप येऊन त्यांनी आणखी जमिनी खंडाने घेतल्या.

        सासवडचे माळी १९१४मध्ये बारामतीतील ऊस-शेती खंडाने घेऊन गुळाचा व्यापार करत असत. कालव्याच्या पाण्यावरचा मऊ पांढरा पुंड्या ऊस तयार व्हायला बारा महिने लागत. मात्र उंची वाढून पाने जमिनीवर लोळल्याने उसातील साखर व गुळाचे प्रमाण कमी होई. उसाच्या मऊपणामुळे कोल्ह्यांचाही उपद्रव होई. हे टाळण्यासाठी त्यांनी एच एम ५१४ सारख्या किफायतशीर जाती लावण्यात पुढाकार घेतला.

        बेणे लावल्यावर प्रथम, खोडवा, निडवा आणि रोडवा अशी चार पिके घेतल्याने जमिनीचा पोत बिघडून कायमचे नुकसान होण्याची शक्यता असे. त्यामुळे पिकांवर रोग पडतो अशा बाबी त्यांनी इतर बागायतदारांनाही समजावल्या. उसाच्या पाणीपुरवठ्यासाठी लिफ्ट इरिगेशन स्वीकारण्यात ते अग्रेसर होते. त्यांनी सुरतहून मोठ्या पोहर्‍याचे नुरियो रहाटगाडे मुद्दाम बनवून आणले होते. कोईमतूरच्या सरकारी फार्मची पाहणी करून त्यांनी नव्या जाती महाराष्ट्रात आणल्या व स्वतः त्यांची लागवड करून पाहिली. शेतीविषयक चर्चा करणे, माहिती जमवणे, तिचा वापर करणे यामुळे त्यांची ऊस शेती चांगली झाली. त्यातच १९१४मध्ये झालेल्या महायुद्धामुळे गुळाचे भाव तेजीत आले आणि त्यांना फायदा मिळाला. पुढे १९१८मध्ये आलेल्या अवर्षणामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यानंतर १९१९च्या जुलै महिन्यात भरपूर पाऊस झाला, पण ऊस लागवडीचा हंगाम डिसेंबर-जानेवारीतला. हा वेळेचा मेळ न जमल्याने शेतकरी त्रस्त झाले, पण शेंबेकर यांनी मात्र उसाची लावणी, काढणी, वाढीला लागणारे ३६-४० सें. तापमान उष्णता आणि हवेतील आर्द्रता यांचा विचार केला. जावामध्ये जर ऊस बारमाही पिकून गुऱ्हाळे चालतात तर मग भारतातही ते शक्य आहे या विचाराने त्यांनी एक योजना अमलात आणली. त्यांनी नव्या पद्धतीने उसाची लागवड केली व या पद्धतीच्या उसालाच पुढे आडसाली ऊस असे नाव पडले. या प्रयोगामुळे दसऱ्यालाच नवा गूळ बाजारात आला. वेळेआधी आलेल्या या गुळाच्या ढेपेला ५-७ रुपयांवरून एकदम ४५ रुपये भाव मिळाला. या यशस्वी प्रयोगानंतर गणेश शेंबेकर यांची कृषितज्ज्ञांमध्ये गणना केली जाऊ लागली.

        एकदा लागवड केलेल्या जमिनीतला खार गेल्याने टाकाऊ आणि टणक झालेल्या जमिनीत शेंब्या, चाऱ्यासाठी ज्वारी किंवा खपला घास ही पिके घ्यावी लागत. खतांचा मारा केला व शेणखत घातलेल्या जमिनीत सी.ओ.२९० ही जात लावली तर त्याच जमिनीत पुन्हा ऊस लावता येतो हे शेंबेकरांनी प्रयोगान्ती सिद्ध केले. त्यांची १९१४मध्ये आणि फलटणच्या उपळेकरांची भेट झाली. ते आपल्या शेतावर द्राक्ष, पपई, हळद, ऊस, पेरू, तोंडली, परवर आणि चिकू इत्यादी पिकांवर विविध प्रयोग करत. त्यांच्याकडून शेंबेकरांना भरपूर शिकायला मिळाले. त्यांच्याकडच्या इंग्रजी पुस्तकातील माहितीही शेंबेकर समजावून घेत. त्याचबरोबर त्यांचे शेती खात्याच्या प्रयोगांकडेही लक्ष असे. डॉ. जी.एस. चिमा, हरिभाऊ परांजपे, दाणी यांच्याशी सल्लामसलत करून शेंबेकर आपले शेतीविषयीचे ज्ञान वाढवत असत. त्यांनी १९२७मध्ये पुण्यात कोथरूड येथे आणखी जमीन विकत घेतली. तेथे विहिरीच्या पाण्यावर पानमळे, भाजीपाला आणि केळी यांची उत्पन्ने काढली. त्यानंतर त्यांनी नीरा स्टेशनजवळ नीरा नदीतले ३० एकरांचे बेट २३ वर्षांच्या कराराने घेतले. तेथील जमीन लागवड योग्य करून दोन एकरांत बटाटे लावले. उत्कृष्ट पीक आलेल्या बटाट्यांचे प्रदर्शन भरवले. तसेच त्यांनी संत्री, मोसंबी, तंबाखू, चिकू, पेरू, नारळ, आंबा, पपई, डाळिंब आणि अंजीर अशी विविध पिके घेतली. पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मॅन यांनी निंबूत येथे त्यांच्या शेताला भेट दिली. तेव्हापासून निंबूत हे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहलीचे आदर्श ठिकाण झाले. यानंतर गणेश शेंबेकर द्राक्ष शेतीकडे वळले. त्यांनी १९२४मध्ये द्राक्षाचे पीक घेतले. सुरुवातीला उसाचेच खत-पाण्याचे धोरण स्वीकारल्याने पीक अगदीच कमी आले. मग द्राक्ष पिकाविषयी शास्त्रोक्त माहिती मिळवून त्यांनी बेतशीर खत, नियमित वेळी पाणी आणि औषध फवारणी असे धोरण स्वीकारले. दोन वेलींतील अंतर कमी केले. वेली पांगाऱ्यावर चढवण्याऐवजी तारांवर चढवल्या. विविध जाती लावल्या. या पद्धतीमुळे मात्र त्यांना फायदा झाला. मग ते जनावरांच्या धंद्याकडे वळले. तिथेही अनेक प्रयोग करत तो धंदाही यशस्वी केला. पुढे वालचंद हिराचंद यांनी त्यांच्या कंपनीत शेंबेकरांना सल्लागार म्हणून काम करण्यासाठी बोलावून घेतले. त्याचबरोबर त्यांना १०० एकर जमीन कसायला दिली. सात वर्षांसाठी ११ रुपये टन भाव ठरवला. तेव्हा मांजरी फार्म व हरेगाव फॅक्टरीतून त्यांनी बियाणे आणून लावले. ते पी.ओ.जे. २८८३ एक डोळ्याची जात म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी पी.ओ.जे. २८७८ हे नवे बियाणे तयार केले.

        शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी स्वतःच्या जमिनी कारखान्याला खंडाने द्यायला त्यांनी प्रवृत्त केले. त्यामुळे वालचंदनगरच्या साखर कारखान्याचा पाया मजबूत झाला आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा झाला. मुंबई सरकारच्या सिंचन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अध्यक्ष सर विश्‍वेश्‍वरय्या यांच्यासमवेत काम करून जमिनीचे तुकडे, बांध आणि मोरंबे यांच्या ठरावीक मापाचा जाचक आणि अव्यवहारी नियम सरकारला रद्द करायला भाग पाडले. पाणीपट्टी वाढवल्यावर ३०,००० एकर क्षेत्रांतील लोकांनी त्याविरुद्ध अर्ज केले. त्या वेळी त्यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवले. त्यानंतर मात्र तीनच दिवसांत सरकारने दरवाढ रद्द केली. त्यांनी आपल्या कामगारांसाठी निवृत्ती वेतन सुरू करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यानंतर १९३९मध्ये इंग्रज सरकारने त्यांना रावसाहेब किताब देऊ केला. त्यानंतर दोनच वर्षांत १९४१मध्ये रावबहादूर पदवीही त्यांना देण्यात आली. त्यांनी १९४८मध्ये कृषि-संचालकांच्या समितीमार्फत द्राक्ष उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी खास स्पर्धा ठेवल्या. त्यांनी १९४९मध्ये इंग्लंड, पॅरिस, डेन्मार्क, झुरिच, जर्मनी आणि कोपेनहेगेन इत्यादी ठिकाणी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी तिकडची शेते, फळबागा, डेअरी फार्म्स, सरबतांचे कारखाने यांसारख्या ठिकाणांना भेटी दिल्या व त्याची अभ्यासपूर्ण माहिती मिळवून परत आल्यावर त्याचा उपयोग केला. 

        डॉ. शुभलक्ष्मी भालचंद्र जोशी

शेंबेकर, गणेश गोपाळ