Skip to main content
x

शेरीकर, अभया आदिनाथ

         भया आदिनाथ शेरीकर यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत घेतले. त्यांनी १९७५मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच., १९७७मध्ये बा.सा.को.कृ.वि.च्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून एम.व्ही.एस्सी. आणि १९८६मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

         डॉ. शेरीकर यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनकार्याचा प्रारंभ केला. पुढे याच विभागात सहयोगी प्राध्यापक या पदावर आणि यथावकाश प्राध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाली. त्यांचे ६८ संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यांच्या ३२ विस्तार लेखांना विविध मासिकांमध्ये स्थान मिळाले. एका शास्त्रीय संदर्भ पुस्तकाच्या त्या सहलेखिका असून त्या पुस्तकात त्यांनी काही प्रकरणे लिहिली आहेत. आंतरराष्ट्रीय सहकार्याने मंजूर झालेल्या ६ योजना त्यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आल्या. त्यांनी सात संशोधनपर योजनांमध्ये प्रमुख अन्वेषक व सहप्रमुख अन्वेषक म्हणून काम पाहिले. त्यांनी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या २८ विद्यार्थ्यांना आणि पीएच.डी. परीक्षेच्या १२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

         डॉ. शेरीकर यांनी बॅसीलस ब्रॉन्कीसेप्टीका या जिवाणूंचे आणि श्‍वानांमधील पॅरा-इन्फ्लुएंझा या विषाणूंचे प्रथमच वर्गीकरण केले. त्यांनी कुत्र्यामध्ये आढळणार्‍या पाव्हो विषाणूंच्या भारतातील स्वरूपाचे वर्गीकरण आणि गुणवर्णन केले. त्यांनी मांसामधील लाळ खुरकुत रोगाचे विषाणू नष्ट करण्याच्या पद्धती यशस्वी रीतीने विकसित केल्या. जिवाणू व विषाणू लशीमध्ये ड्युटेरियम पाण्याचा वापर केल्यास त्या ४५० सें. तापमानात दोन दिवसांपर्यंत कार्यक्षमतेने साठवता येतात, हे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध केले.

         डॉ. शेरीकर बारा व्यावसायिक शास्त्रज्ञ संघटनेच्या सदस्य आहेत. त्यांना २००४मध्ये अन्न व कृषी संघटनेने (सार्क देश) बर्ड फ्ल्यू या रोगाच्या प्रतिबंधात्मक कार्यासाठी विभागीय समन्वयक म्हणून मान्यता दिली. त्यांना १९९२-२००० या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने अन्न-विषाणूशास्त्रज्ञ म्हणून मान्यता दिली होती. त्यांना २००४मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती महिला कृषिशास्त्रज्ञ तथा संशोधक पारितोषिक देऊन गौरवले. डॉ. शेरीकर २००९मध्ये सेवानिवृत्त झाल्या.

- संपादित

शेरीकर, अभया आदिनाथ