Skip to main content
x

शिलेदार, जयराम यशवंत

यराम यशवंत शिलेदार यांचा जन्म बेळगाव येथे झाला. आई अहिल्या व वडील यशवंत मार्तंड शिलेदार यांच्या सोबत बेळगावच्या शहापूर भागात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या घरात फोनो होता. नटसम्राट बालगंधर्व, मा. दीनानाथ, नारायण व्यास अशा अनेक दिग्गज कलावंतांच्या तबकड्या त्यांनी लहानपणापासूनच ऐकून पाठ केल्या. घरात गाण्याचे वातावरण नव्हते, तरी त्यांच्या आईला मात्र गाणे आवडायचे. शिलेदारांचे संगीत शिक्षण बेळगावात कागलकरबुवांकडे झाले.

शिलेदारांचे शालेय शिक्षण सातवी म्हणजे इंग्रजी चौथी झाले. त्यांचा गाण्याकडे असणारा स्वाभाविक कल ओळखून त्यांच्या वडिलांनी लहानपणापासूनच त्यांना नाटक कंपनीत पाठविले. त्यातूनच रघुवीर सावकारांच्या ‘रंगदेवता हिंदी-उर्दू नाटक कंपनी’त त्यांचा प्रवेश झाला. त्यांचे संगीत शिक्षण नाटक कंपनीत असताना शिवरामबुवा चिखलीकर यांच्याकडे झाले. 

जयराम शिलेदारांच्या रंगभूमीवरील वाटचालीला ‘संशयकल्लोळ’ या नाटकापासून सुरुवात झाली. ‘सौख्यसुधा वितरो सदा नव’ या नांदीत ते सहभागी झाले. रघुवीर सावकारांकडून त्यांना तालीम मिळाली. पुढे ‘सुनहरी मछली’, ‘शिरीन फरहाद’, ‘साध्वी मीराबाई’ अशा हिंदी-उर्दू नाटकांतील स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘संगीत मानापमान’मधील ‘धैर्यधर’ साकारला. याच काळात त्यांनी बहुतेक सर्व संगीत नाटकांमधून निरनिराळ्या भूमिका वठवल्या. त्यांतील वि.वा. शिरवाडकरांच्या ‘दुसरा पेशवा’मधील ‘बाजीराव’ आणि वि.रा. हंबर्डे यांच्या ‘संगीत बाजीराव-मस्तानी’मधील ‘बाजीराव’ या दोन्ही भूमिका रंगभूमीवर वेगळाच ठसा उमटवून गेल्या. बालगंधर्व, विनायकबुवा पटवर्धन, गणपतराव बोडस, चिन्तूबुवा गुरव, चिंतामण कोल्हटकर यांसारख्या महान कलावंतांचे मार्गदर्शनही शिलेदारांना लाभले.

जयराम शिलेदारांनी अठ्ठेचाळीस नाटकांतून शंभरच्या आसपास भूमिका केल्या. यांत अगदी छोट्या भूमिकांपासून ते नायकांच्या भूमिकांपर्यंत समावेश आहे. निसर्गदत्त निकोप आवाज आणि काळी चारच्या पंचमापर्यंत पोहोचणारा खणखणीत आवाज ही त्यांच्या आवाजाची खास वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांचे गाणे अधिकाधिक समृद्ध झाले.

संगीत नाटकाच्या उत्कर्षासाठी त्यांनी १ ऑक्टोबर १९४९ रोजी पुणे येथे ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी केवळ संगीत नाटकालाच वाहिलेली ही संस्था स्थापन करण्यामागे जुन्या संगीत नाटकांचे संवर्धन व्हावे व नव्या संगीत नाटकांची निर्मिती हा हेतू होता. त्यामुळे १९४९ पासून केवळ संगीत नाटकांसाठीच आयुष्य वेचणार्‍या शिलेदार कुटुंबीयांचे संगीत नाटक क्षेत्रातील हे बहुमोल योगदान अत्यंत महनीय, विलक्षण ठरले. सर्व जुन्या संगीत नाटकांच्या प्रयोगांबरोबरच ‘एखाद्याचं नशीब’ : बाळ कोल्हटकर, ‘अभोगी’ : चिं.त्र्यं. खानोलकर, ‘बाजीराव-मस्तानी’: वि.रा. हंबर्डे, ‘रूपमती’ : विद्याधर गोखले, ‘गा भैरवी गा’ यांसारखी एकंदरीत २२ नवीन संगीत नाटके ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेतर्फे सादर झाली.

‘संगीत रंगभूमी’ बरोबरीनेच चित्रपट क्षेत्राशीही त्यांचा संबंध आला. व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’कडून  त्यांना ‘राम जोशी’ या चित्रपटासाठी बोलावले गेले. ‘राम जोशी’ या चित्रपटामुळे जयराम शिलेदार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. ‘राम जोशीं’च्या लोकप्रियतेमुळे हिंदी चित्रपटातील संधी त्यांना चालून आल्या; परंतु संगीत नाटकाच्या प्रेमामुळे त्यांनी त्या नाकारल्या. बोलपटांमुळे रंगमंदिरांचे चित्रपटगृहांत रूपांतर झाले, त्यामुळे नाट्यगृहांची चणचण भासू लागल्यावर शिलेदारांनी संपूर्ण कापडी थिएटर उभारले. ‘जयराम मंडप’ असे त्याचे नाव होते. त्या कापडी नाट्यगृहात त्यांनी नाटकांचे प्रयोग सादर केले.

जयराम शिलेदारांनी जीवनाच्या आरंभापासून अंतापर्यंत संगीत आणि संगीत नाटकच केले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट’ची स्थापना केली गेली. या ट्रस्टतर्फे बरेच नवनवीन उपक्रम सातत्याने राबविले जातात, त्यांमध्ये संगीतनाट्यप्रवेश स्पर्धा, नाट्यसंगीत स्पर्धा, संगीतनाट्य विषयक शिबिरे, संगीत नाटकांविषयीची सप्रयोग व्याख्याने यांचा समावेश असतो. तसेच, नवीन तरुण पिढी संगीत नाटकांकडे आकर्षित व्हावी या दृष्टीने ही संस्था सातत्याने कार्यरत आहे. ‘सूरसंगत’ हे आत्मचरित्रही त्यांनी लिहिले आहे.

जयराम शिलेदारांना ‘विष्णुदास भावे’ सन्मान, तसेच ‘बालगंधर्व’ सुवर्णपदक प्राप्त झाले. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे, तसेच वाशिम, नागपूर येथेही मानपत्रे देऊन त्यांचा सन्मान केला गेला.

धनश्री खरवंडीकर

शिलेदार, जयराम यशवंत