Skip to main content
x

शिरोडकर, मेनका

गोव्यातील फोंडा या गावाजवळील शिरोडा येथे मेनका शिरोडकर यांचा जन्म झाला. त्यांना आरंभीचे शिक्षण त्यांच्या आईनेच दिले. अल्लादिया खाँसाहेबांचे सुपुत्र भूर्जी खाँसाहेब हे मेनका शिरोडकरांचे गुरू होत. मेनकाबाईंनी त्यांच्याकडे जयपूर गायकीचे शिक्षण घेतले. काही काळ त्या आग्रा घराण्याच्या उ. विलायत हुसेन खाँ यांच्याकडेही शिकल्या. परंतु ठुमरी, दादरा, गझल हे प्रकारच मेनकाबाईंनी प्रामुख्याने सादर केले.

बेळगाव येथे घम्मन खाँ यांच्याकडे त्या ठुमरी-दादरा, गझल हे गानप्रकार शिकल्या. अदाकारी करून नृत्यगायन करण्याचा मेनका शिरोडकरांचा व्यवसाय होता. कालांतराने ‘महालक्ष्मी मिल्स’चे मालक मेहता यांच्याशी मेनका शिरोडकरांचा विवाह झाला. त्यांचे ऐश्वर्य जसे मेनकाबाईंनी भोगले, तसेच कालांतराने महालक्ष्मी मिल बंद पडल्यावर आपले सर्व जडजवाहीर विकून त्यांनी कर्जफेड केली व गरिबी पत्करली.

मुंबईत स्थायिक झाल्यावर मेनकाबाईंचे गाणे सर्वदूर पोहोचले. खाजगी मैफली, जलसे, तसेच बिकानेर, डुंगरपूर, जम्मू अशा अनेक संस्थानांतून त्यांना गायनाची निमंत्रणे येऊ लागली. राजे धनराजजी यांच्या हवेलीतील एका मैफलीत विदुषी केसरबाई केरकरांच्या आधी मेनकाबाईंचे गायन झाले व ते इतके रंगले, की ‘‘यानंतर मी काय गाणार?’’, असे म्हणून केसरबाई गायल्या नाहीत अशी एक आख्यायिका आहे. मिनर्व्हा मुव्हिटोनच्या ‘पृथ्वीवल्लभ’ (१९४३) या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी ‘राम नाम धन पाया’, ‘पंछी उड़ चल अपने देस’, ‘खुले स्वर्ग के द्वार’ ही गीतेही गायली. (संगीतकार : सरस्वती देवी व रफिक गझनवी; गीतकार : पं.सुदर्शन.)

‘केसरबाई’ पुरस्काराने मेनका शिरोडकरांचा सन्मान करण्यात आला होता. एकंदर ९३ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मेनकाबाई काहीशा दुर्लक्षित अवस्थेत, फोंडा येथे निधन पावल्या. विख्यात गायिका शोभा गुर्टू या त्यांच्या कन्या व शिष्या होत.

डॉ. शुभदा कुलकर्णी

शिरोडकर, मेनका