Skip to main content
x

शिवणकर, वसंत सदाशिव

संत सदाशिव शिवणकरांचा जन्म हिंगणघाट येथे झाला. त्यांची आई बालपणीच वारली. वडील इलेक्ट्रिशिअन, मेकॅनिक होते. त्यांच्या घराण्यात संगीत नव्हते; परंतु वसंत शिवणकरांना उपजत गायन-वादनाची आवड होती. शालेय शिक्षण चालू असतानाच ते राष्ट्रसंत तुकडोजींच्या भजन मंडळात सामील झाले, त्यांच्या  संगतीत ४-५ वर्षे राहून गायन-भजन म्हणणे, हार्मोनिअम, खंजिरी, झांज वाजवून दौऱ्यात जाणे या उपक्रमांमुळे ते भजनमंडळीतले एक घटक बनले.

शुक्ला गुरुजींच्या मोलाच्या सल्ल्याप्रमाणे ते नागपूरला आले आणि त्यांनी नृत्याभ्यासाचा शुभारंभ केला. संधी साधून जयशंकर, शंभू महाराज व बिरजू महाराजांसारख्या श्रेष्ठ कलाकारांकडून मिळाले तेवढे ज्ञान त्यांनी संपादन केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची नृत्याची ‘संगीत अलंकार’ ही पदवी त्यांनी मिळवली. खैरागडच्या इंदिरा कलासंगीत विश्वविद्यालयाची ‘मध्यमा’ नृत्य परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.

शिवणकरांनी १९५६ साली इंडियन क्लासिकल डान्स अकादमीच्या नागपूर शाखेतून भरतनाट्यम, मोहिनीअट्टम नृत्यम्, कथकली नृत्याभ्यास पूर्ण केला.  भारतीय कलानिकुंज संस्थेतून त्यांनी लोकनृत्य, नृत्यनाटिका, नृत्यांचे बोल व रचनांचे अध्यापन केले. संस्थाप्रमुख माणिकराव मुखर्जी यांनी ठिकठिकाणी नृत्य कार्यक्रम  घडवून आणले. ‘कुमारसंभवम्’मध्ये त्यांनी शिवाची भूमिका केली. तसेच रामायण, महिषासुरवध इ. बर्‍याच नृत्यनाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. वसंत शिवणकरांनी बर्‍याच नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले. गांधर्व महामंडळाचे ते परीक्षक होते.

त्यांचा १७ जून १९५३ रोजी चांद्याचे बालाजी तोडकर यांच्या कन्येशी विवाह झाला. स्थानिक डी.ए.ए.पी.टी. कार्यालयात ते केवळ कर्मचारीच नव्हते, तर कलाग्रणी व कार्यालयाचे भूषण होते. ज्योती वरखेडकर, शोभा वकील, मृणालिनी दामले इ. विद्यार्थिनींना नृत्यशिक्षण देऊन त्यांनी तरबेज बनवले. स्वत:च्या मुलीलाही तयार करून मंचावर तिचे कार्यक्रम केले. ते गायक, नृत्यकार असून व्हायोलिन, हार्मोनिअम, तबला, मृदंग, बुलबुलतरंग वादक होते.  अभिनय, मुद्रा, अर्थभावानुकूल शास्त्रीय कलात्मक नृत्याभिनय करण्यात ते वाकबगार होते.

सेवानिवृत्तीनंतर नृत्यशाळा काढून अभिजात संगीत नृत्याचा चांगला प्रसार करावे असे त्यांच्या मनात होते. त्यांनी त्यासाठी वाद्ये, पोशाख, साहित्य जमविले होते व पूर्वतयारी केली होती. पण ५ मार्च १९७३ या दिवशी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित नृत्य-नाट्य-संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात नृत्यप्रस्तुती करत असताना रंगमंचावरच त्यांचे निधन झाले.

वि.ग. जोशी

शिवणकर, वसंत सदाशिव