Skip to main content
x

ताकवले, मुरलीधर गोविंद

     डॉ.मुरलीधर गोविंद ताकवले यांचे बालपण अतिशय लहान अशा हरगूड गावामध्ये व्यतीत झाले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्या गावाला शिक्षणाची एक परंपरा होती. त्यामुळे बालवयातच त्यांच्यावर शिक्षणविषयक चांगले संस्कार झाले. त्यानंतरचे त्यांचे शिक्षण पुण्यामध्ये फर्गसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे झाले. त्यांनी भौतिकशास्त्रात ‘एक्स-रे क्रिस्टलोग्रफी’ या विषयात पीएच.डी. मिळविली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात व्याख्याता, प्रपाठक आणि प्राध्यापक या पदांवर काम केले. सतत कार्यरत राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

     इ.स. १९७० ते २००० अशी ३० वर्षे त्यांनी विद्यापीठात पदव्युत्तर स्तरावर सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स, सरफेस सायन्स, ऊर्जा अभ्यास, संगणक प्रणाली, पर्यावरण विज्ञान असे विषय शिकवले. त्यांनी संशोधन व विकासाचे पंचवीस प्रकल्प पूर्ण केले. मटेरियल सायन्स, प्रकाश संवेदक पदार्थ (फोटोव्होल्टाईक मटेरियल), सूर्यउष्णता पद्धती, बायोगॅस, बायोमास गॅसिफीकेशन, पवनऊर्जा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

     त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस विद्यार्थ्यांनी पीएच.डी. आणि तीस विद्यार्थ्यांनी एम.फिल. ही पदवी मिळविली. एक्स-रे क्रिस्टलोग्राफी या विषयात केलेल्या संशोधनानंतर त्यांनी ऊर्जाविषयक संशोधनाला सुरुवात केली. डॉ. वि.ग. भिडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले. पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा प्रणालीचा विकास घडविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. विशेषत: या विषयातील औष्णिक गुणधर्मावर आधारित सोलर कुकर, ड्रायर, त्याचप्रमाणे विद्युतनिर्मिती या विषयात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करणारी उपकरणे बसविण्यात आली. या विषयाच्या संशोधनामध्ये त्यांनी नवीन प्रकारची सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे विकसित केली. त्यामध्ये पॅराबोलिक रिफ्लेक्टरचा विकास हे एक महत्त्वाचे योगदान आहे.

     डॉ. मुरलीधर ताकवले यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांमध्ये कुलसचिव, अधिष्ठाता- विज्ञान विद्याशाखा- पुणे विद्यापीठ, कुलगुरू-शिवाजी विद्यापीठ, आणि कुलगुरू-प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांचा उल्लेख करता येईल.

      ग्रमीण भागातून आल्यामुळे डॉ. मुरलीधर ताकवले यांचा ग्रमीण विद्यार्थ्यांकडे नैसर्गिक ओढा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रमीण भागांतील विद्यार्थ्यांनी संशोधन करून एम.फिल. आणि पीएच.डी. पदवी मिळविली.

डॉ. मुरलीधर ताकवले यांचा स्वभाव शांत, राहणी साधी आणि विचारांत स्पष्टपणा असल्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांना जिव्हाळा वाटतो. समाजवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे समाजाच्या विकासाची कामे करण्याकडे आणि त्याला पूरक असे संशोधन करण्याकडे त्यांचा सतत ओढा राहिला आहे. त्यांनी केलेल्या योगदानाची दखल अनेक संस्थांनी घेतली असून त्यांना ‘गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार’ त्याचप्रमाणे ‘सूर्या पुरस्कार’ यांसारखे पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण, संशोधन आणि ज्ञानविस्तार या तिन्ही क्षेत्रांमध्ये तेवढ्याच हिरिरीने काम केलेल्या डॉ. मुरलीधर ताकवले यांनी आपल्या कार्याचा ठसा विज्ञान क्षेत्रामध्ये निश्चितपणे उमटविलेला आहे.

डॉ. पंडित विद्यासागर

ताकवले, मुरलीधर गोविंद