Skip to main content
x

तेंडुलकर, शांता सावळाराम

           जानकी मोरेश्वर तेंडुलकर आणि त्यांच्या भगिनी शांता सावळाराम तेंडूलकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजे या छोट्याशा गावात आपली हयात खर्ची घालून निष्ठेने व श्रद्धेने जे कार्य केले त्यांची ‘समर्पित जीवन’ ही सत्यकथा मनोहर साखळकर यांनी शब्दबद्ध केल्यामुळे समाजापुढे येऊ शकली आहे.

     राजापूर तालुक्यातील पाथर्डे नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सिनकर कुलातील या दोन कन्या. त्यांच्या वडिलांचे नाव पर्शराम. ते पोलिस खात्यात होते. त्यांना आठ अपत्ये होती. जानकी आक्का या सगळ्यात मोठ्या. १९१२ मध्ये जानकी आक्कांचा जन्म झाला. चार इयत्तांपर्यंत शिक्षण झाले व वयाच्या १२-१४ व्या वर्षी लग्न झाले. आक्कांचे यजमान मोरेश्वर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने आक्का एकुलत्या एक मुलाला कडेवर घेऊन माहेरी आल्या. ते मूलही काळाने ओढून नेले. त्यांचे मामा दिनकर साखळकर आणि राजापूर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी उत्तेजन देऊन त्यांना पुढे शिक्षण घेण्यास सांगितले. कन्याशाळेतून त्या सहावी म्हणजे फायनल परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

      एक वर्षात इंग्रजी १ ते ३ इयत्ता इंग्रजी शाळेत करून १९३७ मध्ये आक्का मॅट्रिक झाल्या. त्याच वर्षी आक्कांनी राजापूर येथील मंदिरात सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ करून सर्वांना चकित केले. या उपक्रमात त्यांची मैत्री कुसुमताई वंजारे व नाना वंजारे यांच्याशी झाली व अखेरपर्यंत ती टिकली. नंतर काही दिवस या मैत्रिणी वर्धा येथे आश्रमात राहून परतल्या त्या खादीचे व्रत घेऊनच. स्वातंत्र्यासाठी आक्कांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना अटक होऊन तुरुंगवासही घडला. हिंडलग तुरुंगात त्यांनी आयुर्वेदीय औषधोपचाराचा अभ्यास केला. दोन अडीच वर्षांनी त्या तुरुंगातून  सुटल्या.

       लांजे येथे कुसुमताई वंजारे यांच्या घरी आरोग्यकेंद्र सुरू केले. आप्पासाहेब पटवर्धन हे त्यांचे गुरू. डिसेंबर १९४५ ते मे १९४६ या अवधीत सासवड तालुक्यात पिंपळ येथे प्रेमाताई कंटक यांनी स्त्रियांचा शिक्षणवर्ग सुरू केला. आक्का व कुमुदताई रेगे यांनी तेथे शिक्षण घेतले. ग्रामसेवा केंद्रे सुरू झाली. त्यातूनच ४ जून १९४६ रोजी लांजे येथे कस्तुरबा ग्राम केंद्रातर्फे आक्का व कुमुदताईंनी शिक्षण, आरोग्यसेवा प्रचारासाठी कुंभारवाड्यात  व चांभारवाड्यात बालवाड्या सुरू केल्या. मुलांना विहिरीवर आंघोळी घालणे, दात स्वच्छ ठेवणे, कपडे नीटनेटके व स्वच्छ ठेवणे व इतर सवयींचे संस्कार सुरू झाले. कुंभारवाड्यात बालवाडीसाठी इमारत मिळाली. गुराख्यांच्या मुलांसाठी एक ते चार इयत्तांचा वर्ग एका गोठ्यात सुरू केला. प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी सुरू केलेल्या शिक्षण वर्गात ३५ ते ४० लोक येत. त्यांना स्वच्छतेचे धडे देण्याबरोबर किरकोळ औषधेही दिली जात. घर व अंगण कसे स्वच्छ राखावे याची प्रात्यक्षिके करून दाखविली जात. जानकी अक्कांच्या भगिनी शांताताई यांनी लांजे येथे आपली संस्था स्थलांतरित केल्यावर या दोघी भगिनी एकत्र येऊन कार्य करु लागल्या. जानकी आक्कांची सावली बनून अथक काम करुन शांताताई कर्करोगाने १८ ऑगस्ट १९८१ रोजी दिवंगत झाल्या. जानकी आक्काही कर्करोगाने १६ जुलै १९८२ रोजी दिवंगत झाल्या.

      शांता पर्शराम सिनकर या जानकी आक्का यांच्या धाकट्या भगिनी होत्या. त्यांचा सावळाराम तेंडुलकर यांच्याशी विवाह झाला. शांताताईंनी फायनलच्या परीक्षेनंतर प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. शिक्षिकेची नोकरी करून संसाराला हातभार लावला. शांताताईंनी आपले पती सावळारामभाऊ यांना मुद्रणालय काढण्यासाठी स्वत:चे स्त्री-धन असलेले दागिने दिले. दुर्दैवाने सावळाराम यांचे १४ ऑक्टोबर १९५२ रोजी निधन झाले. नोकरी चालू असताना शांताताईंनी १९५७ अखेर देवरूख येथे अनाथ महिलाश्रमाची स्थापना केली होती. त्या स्वत: आश्रमाच्या संचालिका होत्या. नंतर त्यांनी लांजे येथे आपली बदली करून घेतली व संस्थाही स्थलांतरित केली. आता दोघी बहिणी एकत्र आल्या व त्यांचा ध्येयमार्ग एकच राहिला.  १९६२ च्या आसपास संस्थेच्या नावातला अनाथ हा शब्द काढून ‘महिलाश्रम’ असे सुटसुटीत नाव दिले.  शांताताई शेवटपर्यंत या आश्रमाच्या संचालिका राहिल्या व आक्का कार्यवाह राहिल्या. जिल्हा परिषदेने शांताताईंना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार देऊन गौरविले. नंतर काही वर्षांनी त्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या.

     आता लांज्यांत ग्रामसेवा केंद्राचे महिलाश्रमात विलीनीकरण झाले. सध्या महिलाश्रम जेथे आहे ती जागा प्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांनी भूदान मोहिमेत महिलाश्रमास दान दिली.  निराधार, होतकरू स्त्रियांना थोडे फार शिक्षण देऊन त्यांना स्वाभिमानाने स्वत:च्या पायावर उभे करावे हा महिलाश्रमाचा हेतू आहे. प्रौढ मुलींना नर्सिंगचे शिक्षण दिले जाई. त्यामुळे त्यांना कोठे ना कोठे नोकरी मिळत असे. आक्कांना अनाथ, परित्यक्ता स्त्रियांबरोबर त्यांच्या मुलांनाही आश्रमात घ्यावे लागे. अशा कितीतरी मुलांना आक्का-ताईंनी चांगल्या  मार्गास लावले. त्यांनी मुले दत्तक देण्याची योजना सुरू केली, महिलाश्रमात फायनलचा वर्ग सुरू करून स्त्रियांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली. मुलींना प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी व शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना डी.एड. परीक्षेसाठी पाठविण्याची व्यवस्था केली. अशा किमान ३० स्त्रिया प्राथमिक शिक्षिका व २१ स्त्रिया पूर्वप्राथमिक शिक्षिका बनून सुखी जीवन जगू लागल्या.

      १९८७ सालापर्यंत महिलाश्रमात ६० पेक्षा जास्त विधवा, ९२ हून अधिक कुमारी माता, ९२ प्रौढ कुमारिका, ८४ परित्यक्ता व १७२ निराधार स्त्रिया दाखल झाल्या. शिवाय सुमारे ३५० लहानमोठ्या मुली त्यांच्या आश्रयाला आल्या. त्या सर्वांना माया व सहानुभूती मिळाली. काही  जणींचे विवाह होऊन त्या आपल्या संसारात रमल्या आहेत. आश्रमात येणार्‍या मुली स्त्रियांना वेगवेगळ्या व्यवसायात गुंतवले जाते. उदा. जेवणाचे डबे करून पोहोचवणे, लोणची, पापड, मसाले, कुळथाचे पीठ तयार करून विकणे, बागकाम, गुरे वासरे यांची कामे. आश्रमात वरचेवर आर्थिक चणचण पडे. त्यासाठी वर्गणी, देणग्या मिळवण्याची खटपट व पायपीट करावी लागे. 

      ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांनी आश्रमाला भरघोस देणगी मिळवून देण्यात साहाय्य केले. सरकारी योजनेची आश्रमशाळा महिलाश्रमाने सात वर्षे चालविली. परंतु आर्थिक तूट भरून काढणे अशक्य होऊन आश्रमशाळा बंद करावी लागली.

- वि. ग. जोशी

तेंडुलकर, शांता सावळाराम