Skip to main content
x

टिळक, नारायण वामन

रेव्हरंड

    नारायण वामन टिळक जन्मापासून वयाच्या नवव्या वर्षापर्यंत कोकणात आजोळी करजगावला राहत होते. शिकण्यासाठी ते कल्याणला आणि नाशिकला आले. पहिल्या चार इयत्ता व इंग्रजीचे थोडे शिक्षण पार पडल्यावर त्यांनी नाशिक येथील गणेश शास्त्र्यांकडे संस्कृतचे शिक्षण आठ वर्षे घेतले. गणेशशास्त्री लेले व्युत्पन्न पंडित होते. कालिदासाच्या मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय नाटकांची मराठी भाषांतरे त्यांनी केली होती. त्यांनी काव्यशास्त्र  हे पुस्तक लिहिले होते. सरदार विंचुरकरांनी केलेल्या तीर्थयात्रांच्या टिपणांच्या व डायर्‍यांच्या आधाराने लेल्यांनी ‘तीर्थयात्राप्रबंध’ नावाचे प्रवासवर्णन मराठी भाषेत विंचुरकरांसाठी लिहिले होते. त्यांनी टिळकांना जुन्या परंपरागत पद्धतीने संस्कृत शिकवले. व्याकरण, काव्य, नाटक, धातुरूपावली, अमरकोश इ. पण त्याचा टिळकांवर इतका खोलवर संस्कार झाला की टिळक काव्यात रमू लागले.

वयाच्या १८व्या वर्षी (१८७९) टिळकांचे लग्न झाले आणि त्यांचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांनी नाशिक सोडले आणि खानदेश, वर्‍हाड, पुणे, मुंबई, कल्याणजवळचे मुरबाड, नाशिकजवळ वणी (सप्तशृंगीचे ठिकाण) ह्या ठिकाणी पुराणिक प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षक असे व्यवसाय करून उदरनिर्वाह केला. ह्या भटकंतीतच त्यांना लोकांचा विविध तर्‍हेचा अनुभव आला. समाजाच्या वृत्ति-प्रवृत्तींचे जवळून दर्शन झाले. १८९१मध्ये, वयाच्या तिशीत त्यांच्या आयुष्यात एक निराळाच योग आला. नागपूरच्या सरदार बुटींनी त्यांना बोलावले ते वेद, उपनिषदे इत्यादी संस्कृत ग्रंथांचे संशोधन आणि संपादन करण्यासाठी! इथेच ते सरदार बुटींसमोर वेदान्तविचाराचे निरूपण व विश्लेषण करू लागले. त्याच वेळी ‘ऋषी’ या नियतकालिकाचे संपादन करून त्यात ते लेखनही करीत असत. त्याच वेळी केशवसुतही नागपूरला होते. टिळकांचा संबंध त्यांच्याशी आला. दोघेही काव्याचे भोक्ते! केशवसुतांच्या वाचनात ‘दि गोल्डन ट्रेझरी’ असे. काव्य, काव्यनिर्मिती त्यांवर दोघांचे बोलणे होई. दोघेही कविता करू लागले होते, त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या कवितेसाठी हा सहवास प्रेरक ठरला. केशवसुतांवर टिळकांच्या विचारांचा, रचनेचा थोडासा प्रभावही पडला. टिळक पुढे नोकरीसाठी नागपूर सोडून राजनांदगावला आले. तिथे जात असताना प्रवासात एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी गाठ पडली. बोलताना त्या धर्मोपदेशकाने ख्रिस्ती धर्माबद्दल विचार मांडले. टिळकांच्या मनात नवधर्माच्या स्थापनेबद्दल जे विचार होते, ते त्यांनी बोलण्याच्या ओघात मांडले. ते ऐकून ‘तुम्ही लवकरच ख्रिस्ती होणार’ हे भाकीत त्या धर्मोपदेशकाने मांडले. पण टिळकांनी स्वच्छ नकार दिला; वादविवाद, विरोध केला. पण अंतरी मात्र ते बोलणे घोळत राहिले. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास सुरू केला. मन, विचार पालटू लागले आणि १८९५ मध्ये मनाशी संघर्ष करता-करता अखेरीस त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. राजनांदगावहून ते निघाले. १८९५ ते १९१७ ह्या काळात त्यांनी अहमदनगर येथे वास्तव्य केले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई १९००मध्ये ख्रिश्चन झाल्या. १८८५ ते १९०० ह्या पाच वर्षांच्या कालावधीत ते विभक्त राहिले होते. १९१७ ते १९१९ टिळक धर्मगुरू झाले. १९१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

रेव्हरंड टिळक आणि काव्य निर्मिती यांचे नाते अतूट असे होते. त्यांनी गद्यलेखन केलेले असले, तरी काव्यरचना हा त्यांचा स्थायीभाव होता. टिळकांची कविता भाग १ आणि  भाग २ मध्ये संग्रहित केलेली आहे. त्याशिवाय त्यांनी ‘अभंगांजली’ निर्मिली. गोल्डस्मिथच्या ‘डेझर्टेड व्हिलेज’वरून ‘माझा ओसाड पडलेला गाव’ रचले. भजने रचली. ख्रिस्त जयंती, वर्षप्रतिपदा ह्यांवर गीते केली. ‘ख्रिस्तायना’ची रचना करायला प्रारंभ केला. पण ‘ख्रिस्तायन’ काव्य म्हणून उभे राहण्यात कमी पडू लागले. अनेक वर्षांच्या परिश्रमांतून त्यांनी ११ अध्यायांची रचना कशीबशी पूर्ण केली आणि त्यांना मृत्यू आला. (लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ जवळपास पूर्ण केले तरी शेवटचा अध्याय त्यांचा मुलगा देवदत्त नारायण टिळक ह्यांनी रचला व ‘ख्रिस्तायन’ पूर्ण झाले.) ‘ब्रिटानिया’ हे खंडकाव्य, ‘शीलं परं भूषणम्’ ही नाटिका, ‘आनंदीबाई’, ‘आमच्या विधवा’ अशीही त्यांची आणखी रचना आहे.

टिळकांच्या कवितेची भाषा साधीसुधी असली, तरी ती प्रसाद आणि माधुर्य ह्या गुणांनी ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या संस्कृतमधल्या व्यासंगाचा त्या कवितेवर प्रभाव आहे. अलौकिक प्रतिभा, मानुषता, सामाजिक सुधारणेची आंतरिक तळमळ ह्यांबरोबरच निसर्गावरचे उदंड प्रेम, स्त्रीबद्दलची उदार दृष्टी, प्रेमभावनेचा आत्मनिष्ठ आविष्कार, क्वचित गूढगुंजन अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यांच्या कवितांपैकी केशवसुतांवर त्यांनी केलेल्या तीन कविता; ‘माझी भार्या’सारखी पत्नीला- लक्ष्मीबाईंना उद्देशून केलेली कविता (त्या काळात अशी कविता प्रथमच केली गेली.); ‘माझ्या जन्मभूमीचे नाव’ ही भारताविषयीच्या अनन्य प्रेमाने आणि भक्तीने ओथंबून आलेली कविता; ‘पाखरा, येशिल कधी परतून?’ ही बालकवींना उद्देशून केलेली कविता; ‘केवढे हे क्रौर्य’ ही क्रौंचवधावेळच्या ‘मा निषांद प्रतिष्ठां’ उद्गारांची आठवण जागी करून देणारी पक्षिणीच्या मरणाची उदास करून टाकणारी ‘क्षणोक्षणी पडे, उठे परी बळे’, ‘मातीत जे पसरले अतिरम्य पंख। केले उदर वरी पांडुर निष्कलंक। चंचू तशीच उघडी पद लांबविले। निष्प्राण देह गमला श्रमही निमाले।’ ही करुणरम्य कविता; ‘कुणास्तव कुणीतरी’ ही पति-पत्नीची प्रेमकविता; ‘अभंगांजली’तील तुकारामाची आठवण करून देणारे ‘दंभस्फोटाचे अभंग’, ‘पर्वतारोहण’ कविप्रतिभेसंबंधीची रूपकाश्रयी कविता; ‘रानात पडलेले फूल’, ‘रणशिंग’, ‘माझी ताई’, ‘वनवासी फूल’ ह्या कवितांची आठवण कधीच कोमेजून जाणार नाही. त्या कविता नित्य ताज्या टवटवीत अशा आहेत; अस्सल, उत्कट आहेत. ‘वनवासी फूल’ हे दीर्घकाव्य फूल आणि कवी ह्यांच्या संवादाच्या निमित्ताने प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्यांमधील सनातन संघर्ष रेखाटते. कविता तत्त्वज्ञानपर चर्चा असूनही अजिबात नीरस नाही. कवी आणि फूल ह्यांची व्यक्तित्वे चित्रदर्शीपणे रेखाटणारी अशी आहेत. निसर्गप्रीती, जनसेवा, सांसारिकाची लोलुपता, संसारातील हर्षामर्ष असे कितीतरी विषय ह्या दीर्घकाव्यात आविष्कृत झालेले आहेत. रेव्हरंड टिळकांचे व्यक्तिमत्त्व थेटपणे ह्या कवितेत उतरले आहे. आत्मनिष्ठ कवितेचे रूप धारण केले गेले आहे. विषय वेगळा असूनही! भारतावर प्रेम करणारे टिळक ख्रिश्चन झाले असले आणि ‘बापाचे अश्रू’सारखी विलापिका सिद्ध करूनही, त्यांच्या बाबतीत तरी ‘धर्मांतर म्हणजे देशांतर’ नव्हे ह्याची प्रचिती येते.

रेव्हरंड टिळक पिंडाप्रकृतीने बंडखोर नव्हते. जाती-पाती, रूढी ह्यांमुळे प्रत्यही घडणार्‍या सामाजिक जाणिवेने ते कष्टी होत, पण केशवसुतांसारखे आक्रमक होत नसत. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांची सेवा करणे हा त्यांचा मार्ग होता. रोग्याची शुश्रूषा करणे ही त्यांची वृत्ती होती. ‘प्रेम नाम जगदीश’ ही त्यांची धारणा होती. दया, सेवा, करुणा त्यांच्या ठायी एकवटल्या होत्या. ते आस्तिक व डोळस श्रद्धाळू होते तरीही त्यांच्या सामाजिक जाणिवा खोट्या नव्हत्या. त्यांच्या मनात नवा धर्म स्थापन करण्याची संकल्पना उगवली होती. ते पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या लोभाने ख्रिश्चन झाले नव्हते. आत्मशांतीसाठी ते ख्रिश्चन झाले होते. त्यांच्या दृष्टीने ‘प्रेम आणि देव हा एक विश्वास। कसा तो विश्वास दूर मानी। दूर तरी विश्वनाथ दूरी। काय सांगू वैरी मीच त्याचा॥’ असे होते. त्यांनी ख्रिस्ती धर्मामध्ये स्वतःच्या काव्यरचनेतून अभंग-ओवीचा प्रवेश करून दिला. उपासनेच्या पद्धतीत भारतीयत्व आणले. मराठी भाषेविषयी आत्मीयता निर्माण केली. दुखवट्याचा काळा रंग वर्ज्य केला. शुभ्र वस्त्रांचा वापर सुरू केला. स्वतःबाबत दफनाऐवजी दहन करून अस्थी ठेवणार त्या स्थानावरील दगडावर मराठी नाव लिहायला सांगितले. देशप्रेम इतके उत्कट की भारत न आवडणार्‍यांना ‘चालते व्हा’ असे सांगितले.

अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकत्वाचा मान निर्विवादपणे केशवसुतांकडेच जातो. पण अर्वाचीन कवींमध्ये जे पाच कवी (केशवसुत, रेव्हरंड टिळक, विनायक, गोविंदाग्रज, बालकवी) ‘कविपंचक’ म्हणून मान्यता पावले, त्यांमध्ये रेव्हरंड टिळक वयाने सगळ्यांमध्ये मोठे आणि बालकवी ठोंमरे सर्वांत लहान होते आणि दोघांमध्ये पिता-पुत्रासारखे नाते निर्माण झाले होते. रेव्हरंड टिळकांनी बालकवींना सांभाळले होते. त्यांच्या कवित्वावर रेव्हरन्ड टिळकांना अतिशय आत्मीयता वाटत होती. केशवसुत मात्र टिळकांचे समकालीन होते. रेव्हरंड टिळकांचा जन्म १८६१चा तर केशवसुतांचा १८६६ मधील. केशवसुत १९०५मध्ये जग सोडून गेले, तर टिळकांचे निधन १९१९मध्ये झाले. बालकवी मात्र त्यांच्याआधी १९१८ मध्ये अपघातात वारले. १९१९ मध्ये गोविंदाग्रज मृत्यू पावले. विनायक १९०९मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी, गोविंदाग्रज ३४ व्या वर्षी, बालकवी २८ व्या वर्षी असे गेले. केशवसुत ३९ वर्षे जगले आणि रेव्हरंड टिळकांना ह्या सर्वांच्या तुलनेत अधिक, म्हणजे ५८ वर्षांचे आयुष्य लाभले. गोविंदाग्रजांचा अपवाद वगळता रेव्हरंड टिळकांची कविता व इतर लेखन तुलनेने विपुल आहे, ह्याचे कारण म्हणजे त्यांना लाभलेले आयुष्य हे आहे.

- डॉ. चंद्रकांत वर्तक

टिळक, नारायण वामन