Skip to main content
x

तिनईकर, सदाशिव शंभूराव

         दाशिव शंभूराव तिनईकर हे भारतीय प्रशासन क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. त्यांचा जन्म बेळगावनजीक असलेल्या खानापूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण खानापूर येथेच झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ते मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा वरच्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबई येथील विल्सन महाविद्यालयात दाखल झाले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी तत्त्वज्ञान हा विषय निवडला. १९५२ मध्ये बी.ए. आणि १९५४ मध्ये एम.ए. ह्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.

       मॅट्रिकपासून उच्च श्रेणी मिळविलेले हुशार विद्यार्थी तेव्हा प्राय: भारतीय प्रशासन सेवेत जाण्यासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेची संधी घेत. सदाशिव तिनईकरांनीही ती संधी घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिनईकर अखिल भारतात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५६ च्या निवड तुकडीतील आय.ए.एस. अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांची पहिली नेमणूक सुरत येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. लवकरच म्हणजे, १९५७ मध्ये मधुमती बोरकर उर्फ मायावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर फाउण्डेशनची शिष्यवृत्ती मिळवून ते जपान, युरोप व अमेरिकेला जाऊन आले.

        १९६०मध्ये झालेल्या जनगणना उपक्रमात ते महाराष्ट्राचे जनगणना निरीक्षक होते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होत असताना झालेली जनगणना विशेष महत्त्वाची होती. तरुण आय.ए.एस. अधिकारी सदाशिव तिनईकर यांनी जनगणना निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली.  मनमिळाऊ प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यानंतर तिनईकर यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईमध्ये विविध अधिकारपदे भूषविली.

        १९६३-६४ मध्ये तिनईकर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकासाचा प्रश्न फारच ज्वलंत होता. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकालातच तिनईकर यांनी आदिवासी विकासाबाबत महत्त्वपूर्ण धोरण राबविले. किंबहुना आदिवासी विकासाचा प्रश्न मार्गी लागण्याची सुरुवात ही तिनईकर यांनी त्या धोरणाची केलेली अंमलबजावणी होती असे म्हणणे अगदी योग्य ठरेल.

       नाशिक येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक होण्याचा मानही तिनईकरांना मिळाला. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला हा उद्योग चालविण्याची जबाबदारी ह्या तरुण प्रशासकावर होती. 

       शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना तिनईकर यांना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा, मुंबईपुरत्या मर्यादित असलेल्या शिवसेना या संघटनेची नुकतीच स्थापना झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेगळ्या राजकारणशैलीची सुरुवात झाली होती. शिवसेनाप्रमुखांशी म.न.पा. अध्यक्षांचे जेव्हा अनेकदा मतभेद झाले तेव्हा त्यातून तिनईकर यांनी मार्ग काढला. तसेच मुंबईच्या प्रश्नांच्या संदर्भात शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची राजकीय प्रशासकीय कला त्यांनी आत्मसात केली असे म्हटले, तर ते अयोग्य ठरणार नाही.

         मुंबई महानगरातील महत्त्वाकांक्षी ‘मलनिस्सारण प्रकल्पा’ला त्यांच्या कारकिर्दीत सुरुवात झाली. पण तो पुढे काही कारणाने रखडला. विदेशी कंपनीची कोणतीही निविदा स्थायी समितीपुढे पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ पडून राहिली तर ती मंजूर करण्याचा अधिकार स्थायी समितीला न राहता, पालिका आयुक्तांच्या अधिकारात ती आपोआप मंजूर होते, हा राज्य सरकारने केलेला कायदा वापरणारे तिनईकर हे पहिले आयुक्त ठरले.

         महापौरांच्या निवडणुकीची आधीची पद्धत बदलून त्यांनी एका वेळी एकानेच मतदान करायची पद्धत आणली. या निर्णयामुळे त्यांना राज्यकर्त्यांशी बऱ्याच प्रमाणात संघर्ष करावा लागला. महापौर त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी महानगरपालिकेच्या खर्चाने जवळजवळ हजार लोकांना जेवण देत असत. ही पद्धत तिनईकरांनी बंद केली. महापौरांना पालिकेतर्फे दिले गेलेले वाहन त्या शहराच्या बाहेर घेऊन जाण्यास परवानगी नसते. पण बरेच महापौर ही प्रथा पाळत नाहीत. मुंबई महानगरपालिकेत तिनईकरांच्या पुढाकाराने याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. पालिकेच्या विविध समित्यांच्या बैठका मुंबईबाहेर रम्य ठिकाणी आपआपल्या कुटुंबासह व्हायच्या. ही प्रथाही त्यांनी बंद पाडली.

        सार्वजनिक संस्थांना देणग्या देण्यासंबंधी निश्चित नियम आहेत. पण ते नियम मोडून ठराविक पक्षांच्या सदस्यांना मदत देण्यात येऊ लागली. तेव्हा ही देणग्या देण्याची पद्धत तिनईकरांनी बंद केली. त्या वेळचे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष पुष्पकांत म्हात्रे यांच्याशी तिनईकरांचा बराच संघर्ष झाला. तरीही म्हात्रे यांनी तिनईकरांनी नगरसेवकांमध्ये व व्यवस्थापनात आणलेल्या शिस्तीचे कौतुक केले आहे आणि त्याचे श्रेय त्यांच्या स्वच्छ व स्पष्ट कारभाराला दिले आहे. तिनईकरांची जेव्हा मुंबई आयुक्तपदी नेमणूक झाली, तेव्हा महानगरपालिकेत अनेक आर्थिक प्रश्न व रेंगाळलेले प्रकल्प होते. पण  त्यांनी महापालिकेला यातून बाहेर काढले.

        १९६६ ते १९७० या कालावधीत कोणाही आय.ए.एस. अधिकाऱ्याला मिळाली नसेल अशा कामाची संधी तिनईकर यांना लाभली. ती म्हणजे, पुणे येथील पशुवैद्यकशास्त्र संस्थेचे संचालक या पदावर नियुक्त झालेले ते पहिलेच आय.ए.एस. अधिकारी म्हणावे लागतील.

        मुंबई महानगरपालिकेत आयुक्त पदावर असताना त्यांनी त्यांचे समकालीन आय.ए.एस. अधिकारी  द.म. सुकथनकर यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसंबंधीचा अहवाल तयार केला होता. परंतु त्यांनी अहवालात केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही.

        १९९० मध्ये  मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना ते निवृत्त झाले.  त्यांच्या सहकाऱ्यांची ते नेहमीच पाठराखण करीत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. त्यांच्या स्वच्छ व स्पष्ट कारभारामुळे राज्य सरकारने तिनईकरांना आयुक्तपदावरून बढती देऊन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नेमले. मुंबई महानगरपालिकेच्या १०० वर्षांच्या इतिहासात अशी बढती मिळणारे तिनईकर हे एकमेव आयुक्त आहेत. त्यांच्यासारख्या समाजाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्याला महानगरपालिकेतून निरोप देताना मुंबईच्या नागरिकांतर्फे त्यांचा भव्य सत्कार झाला ही  त्यांच्यावरील  प्रेमाची पावती होय.

       सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याने काय करावे असा प्रश्न तिनईकर यांना कधीच पडला नाही. मुंबईच्या जसलोक रुग्णालयाचे मानद प्रशासक म्हणून त्यांनी नि:शुल्क काम करायला सुरुवात केली. त्याच काळात ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकात तिनईकर यांनी ‘चालू घडामोडी’ या विषयावर लेखमालिका लिहिली. अरुण टिकेकर हे  त्या वेळी लोकसत्तेचे संपादक होते. त्यांची  ही लेखमाला चांगलीच गाजली.

       तिनईकर हे एक उत्तम चित्रकार होते. सतारवादन व वक्तृत्वकलेत ते प्रवीण होते. आपली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा ते कधीही विसरले नाहीत. सतत समाजाभिमुख राहिले. शासनाकडून त्यांना अनेकदा अडचणी आणि त्रास सोसावा लागला. परंतु सामान्य माणसांनी त्यांच्यावर सतत प्रेम केले. त्यामुळे अर्थातच तिनईकर हे एक आगळेवेगळे प्रशासक म्हणून सदैव लक्षात राहतील.

-  प्रा.डॉ.विजय देव

तिनईकर, सदाशिव शंभूराव