Skip to main content
x

टोपे, अंकुश रावसाहेब

     अंकुश रावसाहेब टोपे यांचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे झाला. त्यांचे तिसरी पर्यंतचे शिक्षण पाथरवाला बुद्रुक येथे झाले; तर चौथी ते नववी पर्यंतचे शिक्षण त्यांनी जालना येथे घेतले. दहावीपासून पुढील शिक्षण त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय व माणिकचंद पहाडे कायदा महाविद्यालयात घेतले. त्यांनी 1964 मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर नामवंत विधिज्ञ होण्याचे स्वप्न मनात बाळगून औरंगाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयांत खटले चालवले. जिद्द, चिकाटी, परिश्रम व प्रामाणिकपणा यांच्या बळावर त्यांनी वकिली व्यवसायात अल्पावधीत चांगला नावलौकिक मिळविला. टोपे यांना 1967 साली काँग्रेस पक्षाने औरंगाबाद जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.  तेव्हापासून खर्‍या अर्थाने त्यांची राजकारणाशी नाळ जोडली गेली. त्यांना 1972 मध्ये अंबड विधानसभेची उमेदवारी मिळाल्याने 26 जानेवारी 1972 हा औरंगाबाद  न्यायालयातील वकिली व्यवसायातील त्यांचा शेवटचा दिवस ठरला. अतिशय अटीतटीच्या लढतीत विजय होऊन ते आमदार झाले.

     स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जालना जिल्ह्याचा परिसर निजाम राजवटीखाली येत असल्यामुळे तेथे शैक्षणिक सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. ग्रामीण जनता शिक्षणाच्या संधीपासून वंचितच होती. जनतेला शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून त्यांनी प्रथम अंबड तालुक्यात वडीगोद्री, अंबड, औरंगाबाद येथे मराठा शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी 1974 मध्ये जालना जिल्ह्यासाठी मत्स्योदरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज मोठ्या प्रमाणावर संस्थेचा विस्तार झाला असून संस्थेच्या 40 शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शारीरिक शिक्षण अध्यापक महाविद्यालय, ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, बी.सी.ए., एम.बी.ए, सैनिकी शाळा इ. शिक्षणाच्या सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत.

     जायकवाडी धरण 1978 ला पूर्ण झाले होते. अंबड तालुक्यातील शेतीला पाणी मिळू लागले. जायकवाडीच्या लाभ क्षेत्राखाली 90 हजार हेक्टर जमीन आली. अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले. मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ लागली. पुढे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अडचणी सोडविण्यासाठी व शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी  टोपे यांनी साखर कारखाना निर्मितीचा ध्यास घेतला व 10 फेब्रुवारी 1982 मध्ये ‘समर्थ सहकारी साखर कारखाना म., अंकुशनगर’ अस्तित्वात आला. टोपे यांना 1991 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी मिळाले व निवडणुकीत विजयी होऊन ते पहिल्यांदा खासदार झाले. पुढे घासावांगी तीर्थपुरी परिसरातील जनतेच्या सोयीसाठी 1 जून 2001 रोजी ‘सागर सहकारी साखर कारखाना मर्यादित’ तीर्थपुरीची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही साखर कारखाने चांगल्याप्रकारे चालू आहेत.

     2000-2001 करिता समर्थ सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाबद्दल वसंतदादा साखर कारखाना, पुणेच्या वतीने उत्तर विभागातील पहिले व उत्कृष्ट तांत्रिक क्षमतेचे दुसरे पारितोषिक देण्यात आले.

     अंबड घासावांगी तालुक्यात जिरायत शेती करणार्‍या शेतकर्‍यांपैकी बहुसंख्य कापूस उत्पादक आहेत. त्यांच्या कापसाला योग्य भाव देता यावा, कापूस संकलन केंद्रावरील फसवणूक व गैरसोय टाळता यावी या हेतूने 6 ऑगस्ट 1991 ला ‘यशवंत सहकारी सूतगिरणी मर्यादित, अंबड’ व 26 ऑक्टोबर 1999 ला ‘यशवंत सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था, अंबड’ या संस्थांची स्थापना करण्यात आली. गरजू शेतकरी ऊस उत्पादक, लहानमोठे व्यावसायिक यांच्यासाठी पतपुरवठ्याची सोय व्हावी या हेतूने 1999 मध्ये ‘समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना’ची स्थापना करण्यात आली. या बँकेच्या अंकुशनगर, तीर्थपुरी, घासावांगी या ठिकाणी शाखा आहेत. शेतकर्‍यांचा विकास व्हावा, शेतकरी व शेतमजूर यांना दुधाचा पुरक व्यवसाय करता यावा यासाठी त्यांनी 2003 मध्ये ‘समर्थ दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्यादित, अंबड’ची स्थापना केली. परिसरातील पाणीवाटपावर होणारे संघर्ष टाळण्यासाठी, पाणीवाटपाच्या योग्य व्यवस्थापनासाठी व कालव्यातील पाण्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ व्हावा या हेतूने समर्थ साखर पाणी वाटप सहकारी संस्था समितीची स्थापना केली. या परिसरातील साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँका जिनिंग प्रेसिंग संस्था इ. सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

     जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, जालना; यशवंत सहकारी सूतगिरणी मर्यादित, अंबड; समर्थ सहकारी साखर कारखाना मर्यादित, अंकुशनगर; सागर सहकारी साखर कारखाना मर्यादित, तीर्थपुरी; यशवंत जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित, अंबड; समर्थ दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ मर्यादित, अंबड; समर्थ सागर पाणी वाटप सहकारी संस्था समिती मर्यादित, अंबड; समर्थ सहकारी बँक मर्यादित, जालना; महाराष्ट्र राज्य सहकारी हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मर्यादित, मुंबई; महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, मुंबई; या सर्व संस्थांचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान अंकुश टोपे यांना मिळाला.

     त्यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी तांत्रिक अभियंता पदवी प्रथम श्रेणीत मिळवली असून सध्या ते महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांची मुलगी डॉ. वर्षा एम.बी.बी.एस. असून अमेरिकेत वास्तव्याला आहे.

- संपादित

टोपे, अंकुश रावसाहेब