Skip to main content
x

तय्यब, मोहम्मद अब्दुल

          मोहम्मद अब्दुल तय्यब यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील कवठाळ येथे झाला. त्यांनी १९५४ मध्ये बी.एस्सी. (कृषी)ची पदवी प्राप्त केली. १९५६ला कानपूर येथील कृषी महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्रातील एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९६५ मध्ये मोहम्मद अब्दुल तय्यब यांनी प्रतिनियुक्तीवर भा.कृ.अ.सं.तून वनस्पती पैदास या विषयातीवरील पीएच.डी. ही पदवी संपादन केली.

          डॉ. तय्यब यांनी डॉ. पं.कृ.वि. व कृषी विभाग यांमध्ये संशोधन आणि शैक्षणिक पदांवर काम केले. त्यांनी अकोला येथे वरिष्ठ कापूस-पैदासकार म्हणूनही काम पाहिले. त्यांनी कपाशीवरील नवीन वाण तयार करण्याचे काम केले. त्यांनी १९७५मध्ये ए.के.एच. ४ आणि डी.एच.वाय. २८६ या दोन वाणांवर काम केले. तसेच १९८१-८२ या वर्षात ए.एच.एच.४६८ (पी.के.व्ही.२), आय.बी.एच. ४२०८ व ए.के.एच. ५ हे कपाशीचे वाण निर्माण करण्याचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले. विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांना कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादनाची क्षमता असलेला एच.एच. ४६८ हा वाण १९८१मध्ये प्रसारित केला. या वाणात किडी व रोग यांची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच देशी वाणामध्ये ए.के.एच. ४ हा वाणही अधिक उत्पन्न देणारा असल्यामुळे त्याच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ झाली. त्यांनी कपाशीच्या बियाण्यावर प्रक्रिया करण्याची सोपी व स्वस्त पद्धत तयार करून त्यासाठी यंत्रही तयार केले. त्यांच्या १९६८-६९मधील बियाणे चाचणीच्या कार्याची प्रशंसा सरकारने केली. १९७२मध्ये डॉ. पं.कृ.वि.चे, डॉ. के.जी. जोशी पारितोषिक त्यांना मिळाले होते. कृषि-वनस्पतिशास्त्रातील त्यांचे २० संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्काराने गौरवले आहे.

- संपादित

तय्यब, मोहम्मद अब्दुल