Skip to main content
x

उमाळे, शंकर रामचंद्र

        शंकर रामचंद्र उमाळे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जीगाव येथील शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीपासूनच त्यांना कृषीची आवड होती, म्हणून त्यांनी मॅट्रिक झाल्यानंतर अकोला येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९६४ मध्ये ते बी.एस्सी. (कृषी) प्रथम श्रेणीत तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९६६ मध्ये त्यांनी नागपूर येथून कृषी रसायन व मृदाशास्त्र या विषयांत एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत घेतली, तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून कृषी रसायनशास्त्रामध्ये बियांचे सबळीकरण यावर संशोधन करून १९७९ मध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ३५ संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी एम.एस्सी.च्या व पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेे.

    डॉ. शंकर उमाळे यांनी बियांच्या सबळीकरणाची प्रक्रिया करून उगवणशक्तीत २५ टक्के वाढ करून देणारी पद्धत संशोधनाद्वारे विकसित केली. त्यांनी बियांवर चुंबकीय प्रक्रिया करण्याची पद्धत एका चुंबक यंत्राद्वारे (मॅग्नोफर्ट) विकसित केली. १९७५ मध्ये त्यांनी मॅग्नोफर्ट या यंत्राचे एकस्व (पेटंट) क्रमांक १४३६५४ मिळवले. डॉ. उमाळे यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठात जागतिक अन्न व कृषी संघटनेद्वारे बोलवण्यात आले होते. तेथे त्यांनी पाणलोट प्रशिक्षणही घेतले. 

    डॉ. उमाळे यांनी अकोला येथे अ‍ॅग्रो आयुर्वेद सेवा संस्था स्थापन केलेली आहे. डॉ. उमाळे यांच्या बी-सबळीकरणाच्या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांच्या पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांनी ज्वारी, मका, गहू व बाजरी या पिकांवर बीज सबळीकरणाचे प्रयोग केलेले आहेत. तसेच एरंडी, सागवान व चिंच या जातीच्या टणक बियांवरही सबळीकरणाचे प्रयोग केलेले आहेत. सबळीकरण केल्याबरोबर बियांची पेरणी करणे किंवा बिया सहा महिने जतन करून पेरणी करणे, दोन्हीही फायदेशीर आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नात जवळपास १३ ते २० टक्के वाढ होते.

    जी.के.व्ही.के. बंगलोर, तामिळनाडू कृषी विद्यापीठ - कोईमतूर, मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये बी-सबळीकरणाचे प्रयोग झालेले आहेत व त्यामध्ये २२ ते २५ टक्के उत्पन्नात वाढ दिसून आलेली आहे. त्यांनी शेतकर्‍यांच्या शेतावरही बी-सबळीकरणाचे प्रयोग केले आहेत व त्यांना जवळजवळ २० ते ६० टक्के उत्पन्नात वाढ दिसून आलेली आहे.

- डॉ. प्रकाश पुंडलिक देशमुख

उमाळे, शंकर रामचंद्र