Skip to main content
x

वाडीलाल, शिवराम नायक

पंडित वाडीलाल शिवराम नायक यांचा जन्म उत्तर गुजरात येथील सिद्धपूर या गावी झाला. त्यांच्या मातुःश्री काशीबाई व पिता शिवराम यांना दोन मुले होती. मोठा वाडीलाल व धाकटा केशवलाल. सन १८९१ मध्ये वाडीलाल नऊ वर्षांचा असताना त्यांच्या मातुःश्रींचे निधन झाले. सन १८९२ मध्ये शिवराम यांनी वाडीलाल याला मुंबई येथील ‘दी बॉम्बे गुजरात नाटक मंडळी’ या नाटक कंपनीत अभिनय व गाणी शिकण्यासाठी पाठविले. परंतु वाडीलाल याला शास्त्रीय संगीताचे नैसर्गिक आकर्षण असल्याकारणाने नाटकात अभिनय करणे किंवा नाटकातील गाणी गाणे यांत त्याचे मन रमले नाही.

लहानपणापासून नैसर्गिक उत्कृष्ट अनुकरणशक्ती असल्यामुळे कोणतेही गाणे ऐकून तो लगेच ते हुबेहूब गात असे. या उत्तम आकलनशक्तीमुळेच वाडीलाल यांना त्या काळातील भेंडीबाजार घराण्याचे सुप्रसिद्ध गायक  उस्ताद नजीर खाँसारखे उत्तम गुरू लाभले.

वाडीलाल यांच्या १८९७ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा पूर्वीच्या नाटक कंपनीत स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी व लहान भावाच्या पालनपोषणासाठी नोकरी करावी लागली. उ. नजीर खाँ यांच्या तालमीत वाडीलाल यांची संगीतात फारच वेगाने व उत्तम प्रगती झाली. त्यामुळे या वेळेस नाटक कंपनीत त्यांना दिग्दर्शक , संगीत निर्देशक आणि गीतरचनाकार म्हणून काम करण्याची उत्तम संधी मिळाली. गीतरचनाकार म्हणून त्यांचे नाव गुजराती रंगभूमीच्या इतिहासात अजरामर झाले आहे. ‘जुगल-जुगारी’, ‘मधुबंसरी’, ‘राइनो पर्वत’ इत्यादी नाटकांना त्यांचे रसाळ संगीत व उत्कृष्ट लोकप्रिय रचनांचे योगदान गुजराती रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिले गेले आहे.

संगीताच्या शिक्षणाबरोबर वडिलांच्या इच्छेनुसार व स्वत:लाही आवड असल्यामुळे वयाच्या जवळजवळ अठराव्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर भागात एका संस्कृत पाठशाळेत त्या वेळचे प्रतिष्ठित संस्कृत पंडित जीवराम शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जुन्या वैयाकरण पद्धतीने, संस्कृत व्याकरण व साहित्याचा सखोल अभ्यास करण्याचे भाग्य लाभले. संगीताव्यतिरिक्त वेदान्त, न्याय आणि व्याकरणशास्त्रात त्यांना अतिशय बौद्धिक आनंद मिळत असे.

पं.भातखंडे व उ.नजीर खाँ यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असल्याने नजीर खाँ यांनी वाडीलाल नायक यांचा भातखंडे यांच्याशी परिचय करून दिला. वाडीलाल यांचा संस्कृत भाषेचा व्यासंग व रागदारी संगीत शिकण्याची उत्कट इच्छा यांमुळे पं. भातखंडे यांच्या सहवासात त्यांना संगीतावरील सर्व संस्कृत ग्रंथांचे सखोल अध्ययन करण्याची संधी मिळाली. वाडीलाल यांनी पं.शारंगदेव लिखित ‘संगीत रत्नाकर’मधील ‘स्वराध्याय’ व ‘रागविवेकाध्याय’ यांचे गुजराती भाषेत भाषांतर करून ते प्रकाशित केले.

पं.भातखंडे यांनी जवळजवळ दीडशे प्रसिद्ध व अप्रसिद्ध  रागांतील अनेक धृपदे, धमार व विलंबित-दु्रत ख्यालांच्या बंदिशी वाडीलाल यांच्याकडून दीडेकशे वर्षांपूर्वी ज्या प्रकारे बंदिशी गायल्या जात असत, तशा हुबेहूब प्रत्येक कण, स्वरासकट घोटवून घेतल्या होत्या. पं. भातखंडे यांच्या गायनशैलीतील कणयुक्त राग-आलाप व विस्तार, रागवाचक स्वरांचे लगाव आणि विश्रांतीस्थाने वाडीलाल यांच्या गाण्यातून दिसत असत. विशेषत: बंदिश पेश करण्याचा भावपूर्ण ढंग व बंदिशीला लयीच्या माध्यमाने सौंदर्ययुक्त सजविणे आणि चिजेच्या तुकड्यांना कलात्मकरीत्या जोडणे ही वाडीलाल यांची खासियत होती.

संगीताचे शास्त्रीय ज्ञान व सूक्ष्मरीत्या केलेल्या चिजांच्या अभ्यासामुळे, संगीताच्या कलात्मक स्वरूपाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे कोणी काहीही आक्षेप पं.भातखंड्यांच्या सिद्धान्तांवर केले, तर त्यांवर मुद्देसूद चर्चा करून व प्रत्यक्ष चिजांची उदाहरणे गाऊन दाखवून वाडीलाल आक्षेपांचे निरसन करीत. भारतीय संगीतातील शास्त्रीय व प्रात्यक्षिक विषयांवर विद्वानांशी चर्चा करण्यात ते अत्यंत कुशल असे संगीतज्ञ मानले जात असत.

वाडीलाल नायक यांना धृपद गायनशैलीचे विशेष आकर्षण होते. त्या वेळचे सुप्रसिद्ध आलाप व धृपद गायक, उदयपूरचे उस्ताद जाकिरुद्दीन खाँ यांच्याकडून खास ‘नोम्-तोम्’ आलापाची तालीम व धृपद गायनशैलीची वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केली. वाडीलाल नायक अतिशय परिणामकारक आलाप व धृपद गायन करीत असत.

त्यांनी काही वर्षे गुजरात राज्यातील ‘वनस्थळी राज्य संगीत विद्यालय’ येथे ‘प्राचार्य’ या पदावर राहून विविध प्रकारे संगीताची नि:स्वार्थ सेवा केली. वाडीलाल यांनी आपल्या गुरूंच्या अमूल्य कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झाले. अहमदाबाद येथील ‘संगीत केंद्र’ या ध्वनिसंग्रहालयाच्या संचालिका गीता साराभाई - मेयर या त्यांच्या शिष्या आहेत.

प्रा. यशवंत महाले

वाडीलाल, शिवराम नायक