Skip to main content
x

वाडकर, सुरेश

सुरेश वाडकर यांचा जन्म मुंबईतील एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांना गोड गळ्याची उपजत देणगी लाभली. अवघ्या चार वर्षे वयाच्या सुरेश यांनी नाट्यगीत म्हटले तेव्हा वडिलांनी त्यांना पार्श्वनाथ डिग्रजकर या भजन गायकाकडे सोपवले. त्यांनी चार वर्षे सुरेशला गाणे शिकवले. आचार्य जियालाल वसंत यांनी सुरेश वाडकरांच्या पुढील संगीत शिक्षणाची, तसेच शालेय शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्याकडे वाडकरांनी गायनाचे व तबलावादनाचे धडे घेतले. त्यांनी अलाहाबादच्या प्रयाग संगीत समितीची गायन-तबलावादनाची पदवी मिळवली. त्यांनी सतारवादन व कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर गुरुजींच्या कन्या प्रेम वसंत यांच्याबरोबर युरोपच्या दौर्‍यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.
युरोप दौर्‍यावरून आल्यावर वाडकर हरिदास संगीत संमेलनात शास्त्रीय संगीत गायले. याच सुमारास सूर सिंगार संमेलनाचे ब्रिजनारायण यांनी पहिल्याच चित्रपट  संगीत संमेलनात त्यांना आमंत्रित केले आणि त्यांना ‘मदन मोहन श्रेष्ठ पुरुष गायक पुरस्कार’ मिळाला. संगीतकार रवींद्र जैन यांनी १९७७ मध्ये वाडकरांना राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘पहेली’ या चित्रपटात गायनाची संधी दिली. पार्श्वगायक म्हणून सुरेश वाडकर हे नाव रुपेरी पडद्यावर झळकले. पाठोपाठ १९७८ मध्ये संगीतकार जयदेव यांच्या ‘गमन’मध्ये ते गायले. ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है’ या गाण्याने पार्श्वगायन क्षेत्रात सुरेश वाडकर हे नाव सर्वतोमुखी झाले.
त्यानंतर वाडकरांना लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळाली. लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार जोडीने ‘क्रोधी’ या चित्रपटातले ‘चल चमेली के बाग में’ हे द्वंद्वगीत लता मंगेशकर-सुरेश वाडकर यांच्याकडून गाऊन घेतले. खय्याम, कल्याणजी-आनंदजी यांनी वाडकरांना गाण्यासाठी बोलावण्यास सुरुवात केली, तर मराठीत सुधीर फडके, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, श्रीकांत ठाकरे इत्यादी संगीतकारांनी त्यांना गायनासाठी बोलाविले. संगीतकार श्रीधर फडके यांच्या ‘ओंकार स्वरूपा’ या ध्वनिफितीने सुरेश वाडकरांना रसिकांची मोठी प्रशंसा मिळाली. कवी सुरेश भट यांच्या गझला व संगीतकार रवी दाते यांच्या स्वररचना, संगीतकार प्रभाकर पंडितांनी स्वरबद्ध केलेल्या चाली सुरेश वाडकरांनी गायल्या. त्याही लोकप्रिय ठरल्या.
‘ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था’, ‘विठ्ठल प्रेमभाव आवडी’, ‘विरले सगळे सूर तरीही’, ‘आता जगायचे असे माझे किती क्षण’, ‘दयाघना तुटले घर, ते’ अशी मराठी गीते, तसेच ‘सांज ढले गगन तले हम कितने एकाकी’ हे ‘उत्सव’ चित्रपटातले गीत, ‘सदमा’ या चित्रपटातील ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ हे गीत सुरेश वाडकरांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात.
महाराष्ट्र राज्याचे अकरा, गुजरात राज्याचे तीन, तर पंजाब राज्याचे दोन पुरस्कार ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ म्हणून त्यांना मिळालेले आहेत.२००४ साली ‘लता मंगेशकर पुरस्कार’,२०११ साली ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातील गीतासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार,२०१७ साली कै.सदाशिव अमरापूरकर पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. याखेरीज २०२० मध्ये 'पद्मश्री' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.    आपल्या गुरूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना संगीत शिकविण्यासाठी वाडकरांची ‘आजीवासन’ ही संस्था कार्यरत आहे. त्यांनी स्थापन केलेली ‘श्रीमती सावित्री वसंत हायस्कूल’ ही शैक्षणिक संस्था मुंबईत कार्यरत आहे. दूरदर्शनच्या मालिकांची शीर्षक गीते, भक्तिगीतांच्या, स्तोत्रांच्या, मंत्रांच्या सीडी, मंच सादरीकरण, संगीत विद्यालयाचे अध्यापन यांत व्यस्त असलेले सुरेश वाडकर पार्श्वगायनाच्या सुवर्णयुगाच्या सरत्या कालखंडात पुढे आलेला एक महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जातात.

सुलभा तेरणीकर

वाडकर, सुरेश